गुलज़ार: एक स्वप्न

  • by

खूप पूर्वी वाचनात आलं होतं गुलजार म्हणजे फुलांचा बगीचा. गुलजार यांच्या लेखणीने ते खरं केलं. गुलजार हे व्यक्ती नाही भावना आहे, असे मानणारी तरुण पिढी गुलजार साब यांना प्रेमाच्या आणि आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारात जवळ करते. एखाद्या कलाकाराने असंख्य हृदयाचं प्रेम बनणे ही गोष्ट किती भाग्याची असते.


इतरांसाठी कुणीही असो पण माझ्यासाठी उर्दुची डिग्री देणारा हा प्रोफेसर आहे. तो फक्त माझ्यासाठी तसा नाही, तो मीना कुमारी यांच्यासाठी सुद्धा एक उर्दूचा जादूगार होता. अनेकजण एकलव्य होऊन या अवलीयाकडून आयुष्याच्या परे जाऊन काहीतरी शिकतात. जिवंतपणी एवढं भरभरून देणारा हा पहिलाच व्यक्ती असणार. लोकांना मेल्यानंतर वाचलं जात, पण याने प्रत्येक भावनेला न्याय देऊन स्वतःच्या अंतरंगात पाहायला शिकवलं.

गुलजार यांचे खरे नाव संपूरणसिंग कालरा. पेशाने फिल्म दिग्दर्शक, संगीतकार, लेखक, कवी आणि संहिता लेखक असलेला हा शेर भारतीय चित्रपट सृष्टीसाठी वरदान ठरला. पाकिस्तानच्या दिना (पंजाब) येथे जन्मलेला हा शेर भारत-पाक फाळणीनंतर भारताची राजधानी दिल्ली येथे स्थायिक झाला. सुदैव भारतीयांचे की गुलजार यांनी मातृभूमी म्हणून भारताची निवड केली. फाळणीनंतर गुलजार कधीच जन्मभूमीकडे गेले नाही. पण ७० वर्षानंतर त्यांनी दिना या जन्मभूमीला भेट दिली.
याबाबत गुलजार म्हणतात, “लहानपणीचे आठ वर्ष दिनामध्ये घालविल्यानंतर फाळणी दरम्यान आम्ही सुरक्षित भारताची निवड केली. हे आयुष्य चक्र पूर्ण होण्यासाठी शेवटचं ‘दिना’ला जाणे गरजेचे होते. पण कदाचित ही जन्मभूमिला दिलेली शेवटची भेट असेल.”

सुरुवातीच्या मेहनतीच्या काळात त्यांनी गॅरेजमध्ये मेकॅनिकचे काम केले. त्यानंतर त्यांच्या करियरची सुरुवात बंदिनी या चित्रपटाने झाली. मेहनतीच्या काळात त्यांनी चित्रपट सृष्टीला इजाजत, आंधी, कोशिश हे चित्रपट तर, तुझसे नाराज नहीं जिंदगी, मेरा कुछ सामान, जय हो, तेरे बिना जिंदगी से कोई, आनेवाला पल… हे प्रेमाने गच्च भरलेले लेजेंडरी गाणे दिले.
गुलजार यांचे चित्रपट पाहताना लक्षात येते, ते नेहमी ‘फ्लॅशबॅक’चा वापर करतात. याबाबत ते मानतात, आयुष्याप्रमाणे चित्रपटही भूतकाळाशिवाय अपूर्ण आहे. अशा प्रत्येक शब्द, फ्रेम आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाला अर्थ आहे, तो अर्थ म्हणजे या व्यक्तीचं त्याच्या कलेतून व्यक्त होणं आहे.
पण असे म्हणतात, “एक कलाकार कधीच एक फुल-टाईम जीवनसाथी बनू शकत नाही. कारण त्याचं पहिलं प्रेम त्याची ‘कला’ असते, त्यानंतर इतर सगळे…” तसेच राखी मुजुमदार आणि गुलजार या जोडप्याचेही झाले. राखी म्हणजे करण अर्जुनमधील शाहरुख, सलमानची आई…
गुलजार आणि राखी यांचे लग्नानंतर वाद विकोपाला जाऊन त्यांच्यात सेटवरही भांडणे होऊ लागली आणि त्यावेळी गुलजार यांनी राखीवर हातही उचलला होता. त्यातूनच त्या दोघांचा घटस्फोट झाला पण त्यानंतर लगेच एका वर्षाने राखी आणि गुलजार यांचा अंश म्हणून, आपल्या वडिलांची प्रत्येक कला आत्मसात करून आणि वडिलांची भूमिका अधिक ठासून जगासमोर आणणाऱ्या मेघना गुलजार हिचा जन्म झाला.

गुलजार वडील असतील तर हर जर्रा ‘गुलजार’ ही बनेगा।
तीही एक लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता बनली. तिने २०१८ चा अवॉर्ड विनर’ राझी ‘ प्रेक्षकांना दिला. मेघना हिने गुलझार अधिकाधिक कळावे आणि ते जीवंत असतानाच कळावे याकरिता आत्मचरित्र म्हणून ” कारण तो आहे —- (बिकॉज ही इज …) ” हे पुस्तकही लिहिले.

तरीही मी मानते, एखाद्या आवडत्या कलाकाराची फक्त कला पहावी. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावले की वास्तविकता दिसते. पण कलेत त्याचा आत्मा दिसतो, वास्तविकतेत त्याच्या कृतीचे प्रतिबिंब. त्यामुळे,

“किसीको इतना गहराई तक भी ना जानो कि पानी की सुंदरता देखने की बजाए, कुए की बदसूरती दिखाई दे। “

या शायद…

“खूबसूरती ज़र्रे को जानने में हैं, पूरे शरीर की सुंदरता एक दिन खत्म होनी हैं।”

आणि म्हणूनच गुलजार यांच्या जन्मदिनी व्यक्तिशः समजून घेताना वास्तविक आयुष्य कळले पण मला त्या कलाकाराच्या वैयक्तिक गोष्टीवर म्हणजेच कलेवर प्रेम आहे, त्याच्या कुठल्याच वास्तविक घटनेवर नाही.

इसलिए, वो एक उर्दू पढ़ाव हैं, तो शिष्य मैं हूं।
और दुनिया में,
कोई जिंदा ख्वाब हैं तो वो ‘गुलजार’ हैं।

  • पूजा ढेरिंगे
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *