आगळी वेगळी गुरुपौर्णिमा…!

  • by

प्रसन्न वातावरणात आजची सकाळ प्रसन्न झाली.
उठल्या उठल्या एक आळसावलेली जांभई देत बाल्कनीत गेले. सगळं एकदम नेहमीसारखंच होतं. रस्त्यावरची वर्दळ, रोजचं शहारी वातावरण, नोकरीसाठी उशीर झालेले गृहस्थ आणि भाजीवाले काका…..
आजचा दिवस खास करण्याचं ठरलं. त्यामागेही कारण होतं, आज कुठला उत्सव नव्हता पण एक खूप महत्वाचा दिवस होता. ‘घडणारं आयुष्य आणि त्याला घडवणारे हात’ यांचे आभार मानण्याचा दिवस.

पाश्च्यात्य संस्कृतीला बाजूला ठेवत भारतीय पेहराव करून आम्ही सगळे मंदिरात निघालो. खरंतर रस्ताभर ‘गुरुपौर्णिमा आणि मंदिर…?’ हे प्रश्नार्थक सूत मी सोडवत होते, तेव्हा उलगडलं माझे गुरु ‘आई-वडील’ आणि आई-वडिलांचे गुरु ‘परमेश्वर’. म्हणून आज मंदिरात जाण्याचा योग.

प्राचीन दंतकथांना मागे टाकलं तर मंदिराचा उल्लेख एक ‘शांत वास्तू’ म्हणून नक्कीच करेल. मंदिरात येताना लोकं श्रद्धेबरोबर अपेक्षाही घेऊन येतात, म्हणून आताच्या पिढीला तो बाजार वाटणं स्वाभाविक आहे. आस्तिक-नास्तिकाच्या झालरीत मी अडकणार नाही. पण मंदिरात गेल्यांनतर मनाचा भार हलका होतो, हे अगदीच खरं. मग याला कारण तिथले शिल्प असो, तिथला आवार असो वा तिथला निसर्ग असो….
आई-वडिलांची गुरुवंदना झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी गुलाब देऊन आमची गुरुवंदना पूर्ण केली. दोघांचे समाधानी हास्य बघून जीवनात किमान काहीतरी सुंदर घडलंय किंवा घडतंय असं वाटलं.
शाळेत जेव्हा गुरुपौर्णिमा साजरा करायचे, तेव्हा ती शाळेतल्या गुरुंपुरतीच मर्यादित वाटायची.. पण आयुष्याची शाळा सुरु झाली तेव्हा निसर्गातला प्रत्येक चांगला वाईट घटक माझा गुरु बनला. गुरुपौर्णिमेचा दिवस तसा उत्सव मनवण्यासारखा नसतो पण आज जेव्हा आयुष्याच्या समंजस वाटेवर चालत असतो तेव्हा येणाऱ्या समस्या योग्य पद्धतीने हाताळणं ज्या गुरूने शिकवलं त्याचे एकदा आभार मानणं फार महत्वाचं ठरतं. कधीतरी आयुष्यात आपण आपल्याच व्यक्तींना, मग त्यात आपले आई-वडीलही येतात, आयुष्याच्या टप्प्यावर भेटलेल्या असंख्य व्यक्ती येतात. आपण त्यांना गृहीत धरून त्यांचे आभार मानणं विसरून जातो. मुळात ते आभाराची अपेक्षा करत नसतातच पण ही एक पावती असते त्यांच्या प्रयत्नांची.

म्हणून त्यांना सांगावं वाटतं “निस्वार्थ गुरु बनून तुम्ही घडवता माझ्या आयुष्याची शिल्पाकृती …
अभिवादन करते त्या प्रत्येक घडणीला जी हातभार लावते माझ्या सारख्या कोवळ्या शिल्पास….”

– पूजा ढेरिंगे
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *