वाऊव! वर्ष झालं सुद्धा?
तो आपला आदर करतो हे त्याच्या कृतीतून जास्त दिसतं आणि इथेच खरंतर विषय संपतो.
लग्नाबद्दल तसही फारस बरं मत नव्हतं माझं. कारण माझ्या आजूबाजूला कुठलच यशस्वी लग्न पाहिलं नव्हतं मी. जर लग्नामुळे उगाच ताण तणाव, नात्यांची ताटातूट पहायची असेल तर त्यापेक्षा न लग्न केलेलं बरं! दोन आयुष्य वाचतील आणि त्यांच्यापासून निर्माण होणारे जीवही …
हे माझे लग्नाआधीचे विचार.
पण त्यांनतर प्रेम झालं. प्रेमात कित्ती ताकद असते हे लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावरच कळली. प्रेम तुमच्या आयुष्यात जे अशक्य आहे ते शक्य करण्यासाठी एक तुमच्या लायक साथीदार पाठवतोच.
जो तुम्हाला अजून जास्त वेळ आरशात निरखून पाहायला भाग पाडतो. जो तुम्हाला रोजच्या आयुष्यात आत्मविश्वास ऍड करून पावलं उचलायला शिकवतो.
मी नेहमीच म्हणत आले, लग्न हा माणसाचा एकाच आयुष्यातला दुसरा जन्म… कारण लग्न झाल्यानंतर, जन्म झाल्यावर जे जे घडतं त्या सगळ्या फेजमधून जावे लागते. पण इथे वाट्याला खूप नवी नाती आणि एक खूप हक्काचं नातं येतं.
त्याने लग्नाआधी सुद्धा मला लग्नानंतर तुला हे करावं लागेल, ते बदलावं लागेल, मग असच राहावं लागेल याबद्दल बोलला नाही. उलट तू तुझ्या करियरवर फोकस करून फ्रिली रहा ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असेल.
लग्नाआधी माझी धारणा होती की, स्त्रीला नेहमी मान खाली घालून सगळी कामं करून, साडी नेसून, गळ्यात मंगळसूत्र घालून, सगळे जेवल्यावर सगळ्यांच्या शेवटी जेवावं लागतं. पण तेव्हाच माझं ठरलही होतं मला कधी या अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं तर मी हे बदलवणार. सुदैवाने खूप गोष्टींना नाही बदलावे लागले. पण ज्या बदलल्या त्यावेळी त्याच्या घरच्यांना त्यामागची कारणं पटवून देऊन बदलल्या. मुळात ज्या माणसांसाठी “नाती” मोठी असतात, त्यांना या समाजात घडणाऱ्या गोष्टी खूप क्षुल्लक वाटतात.
हळूहळू मी स्वतःला सांगितलेला “स्त्री पुरुष समान हक्काचा – वागणुकीचा” धडा, घरच्यांना पटला. त्यांनी तो स्वीकारून गोष्टी खूप सोप्या केल्या. त्या त्यावेळी प्रत्येकाने सामंजस्याने उभं राहून मला सपोर्ट केला. जेव्हा आईंना (सासू) काही पटत नसेल तेव्हा पार्टनर आणि नणंदेने सपोर्ट केला, जेव्हा सासर्यांना काही पटत नव्हतं तेव्हा आईंनी सपोर्ट केला. नात्यात ताणतणाव राहिला की आयुष्य जगावं वाटत नाही, असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. आई नेहमी म्हणतात, संसार दोघांचा आहे. त्यामुळे दोघे मिळून तो सोप्पा करा. त्या गावाकडे राहूनही विचारांच्या बाबतीत खूप क्लिअर आहे. नव्या पिढीला समजून घेऊन पुढे जाणाऱ्या आहेत. नणंदेच्या नात्याने तर मैत्रीण मिळाल्यासारखे आहे. आम्ही अगणित विषयांवर कितीही वेळ गप्पा मारू शकतो.
लग्न होतं म्हणजे ही नवी नाती आपोआप जोडली जातात. प्रत्येकाकडे देण्यासारखं खूप आहे. काही गोष्टींबाबत मतं वेगळी असली तर बसून त्यावर बोललं जाऊ शकतं हे गमक हळूहळू कळू लागलं आहे. त्यामुळे हळूहळू लग्नाबद्दल दूषित झालेले पूर्वग्रह पुसले जाऊ लागले.
या वर्षभराच्या प्रवासात एक गोष्ट कळली होती, तुमच्या दोघांमध्ये एखादी आवड, छंद कॉमन असावा. आमच्या बाबतीत आम्हाला दोघांना फिरायला वेड्यासारखं आवडतं. म्हणूनच १२ महिन्यात १२ ठिकाणं फिरणं हे भारी anniversary गिफ्ट आम्हाला दोघांना आनंदून टाकणारं आहे.

या प्रत्येक प्रवासात आम्ही एकमेकांना वेगवेगळं ओळखत आलो आहे. एकमेकांची स्ट्रेंथ आणि विकनेस पाहिले आहेत. मेन म्हणजे मैत्री नेहमी प्रेमाच्या आधी ठेवली. त्यामुळे कंफर्ट लव्ह हळूहळू गर्द होत गेलं.
जिंदगीभर प्रेम करनेवाला पुरुष मिलना,
सबसे नायाब तौफा होता हैं।
माझ्यासाठी लग्नानंतर जी गोष्ट कधीच बदलायची नव्हती ती म्हणजे फ्रीडम!
त्याने त्या गोष्टीला रिस्पेक्ट करून उलट त्याला पंख दिले.
या वर्ष भराच्या काळात त्याने सांगितलेली एक गोष्ट खूप प्रेरणा देतेय. तो म्हणतो तुझं अवलंबन संपले तरच तू पूर्ण स्वतंत्र होणार. त्यामुळे तू स्वतंत्रपणे निर्णय घ्यायची सवय लाव. त्यामुळे या एका वर्षात मी इतक्या धडाडीच्या गोष्टी केल्या ज्याची कधीच कल्पनाही केली नव्हती.
जबसे पता चला हैं उसे मैं आज़ाद पसंद हूं,
मुझे मेरे होने पर और उनके मेरे जिंदगी में आने पर रोज मोहब्बत होने लगी हैं।