हॅपी बर्थडे निसर्गा!

  • by

स्वतःच्या अंगा खांद्यावर लिहिण्याची मुभा देतोय जो,
कोणता देखणा पुरुष आहे हा, जो त्याच्या अस्तित्वावर माझं लिखाण ठेवून मला अधिक सुशोभित करतोय…🌼
हॅपी बर्थडे निसर्गा…!  🌿

बंदिस्त या काळात जुन्या कुपीतल्या आठवणी उजळून जिवंत दिवसांच्या मुक्कामांची आठवण येते रे…
तू वातावरणात सहज रंगांचा मऊपणा उधळून दिला की त्या दिवसाचं दिवसपण जगावं वाटतं.
या जगातलं सुंदरपण न्याहाळाव वाटतं.
तुझ्यामुळे मी स्वतःत पारदर्शी भासू लागते.

निसर्गावर सायंकाळी नारंगी लालसर रंगाच आच्छादन टाकलेलं पाहते, त्याने जी डोळ्यांसमोर चित्रफीत तयार होते,
निसर्गा,
तिथे तू मला भलताच मोहक पुरुष भासू लागतो,
ज्याच्या प्रेमात पडण्याच्या परिसीमा मला कणाकणाने मोठ्या करू लागतात… मला तू होण्याची प्रेरणा देतात.
महत्त्वाचं म्हणजे तुझी परवानगी न घेता तुला मी माझा प्रियकर म्हणत स्वतःला स्वाधीन करत जाते तुझ्या पुढ्यात,
तू काहीच उलाढाल न करता, एक उमेदीचा प्रातःकाल सोडून जातो माझ्या मनात…
निसर्गा,
हे जगणं तुझ्यासोबत एक भास आहे स्वतःतच…
या भासाला खरं मानून माझं अस्तित्व जपायला खास जमतं तुलाच…
कित्येक आयुष्यांना मिठी मारून सजवलयं तू तुझ्या असण्याने,
मी तुझ्यावर लिहावं नि तू कागद होऊन ते जगाला दाखवाव… इतकं मोठेपण मलाही निर्माण करायचंय स्वतःत…
पण मला जपणाऱ्या तुला, आता तू स्वतःलाही जपायला हवं…

तुझ्या अंगाला मला वाचवायला हवं,
तुझं गर्भार जपायला हवं,
माझ्यासारखे कित्येक प्रेमी पुजताय तुझ्या असण्याला, देवापेक्षा मानतात तुझ्या निर्मिलेल्या प्रेरणेला,
सुखी होतात तुला बहरताना पाहून…
तुला उध्वस्त करणाऱ्या जगासाठी तू वेगळा न्याय करायला हवा…
जो तुझी कदर करतो, त्याच्यासाठी तू तंदुरुस्त नि हसता खेळता राहायला हवा…

©Pooja Dheringe

#save_environment
#WorldEnvironmentDay

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *