ओढ लावणारं लिखाण लिहायचं, समाधानी असल्याचे अनेक दाखले द्यायचे, मग त्या लिखाणातले प्रसंग आपण फक्त एकदाच कृतीत अनुभवले असले तरीही त्याला पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणायचे.
उदाहरणार्थ, तो एक काळ होता जेव्हा मी रोज पारिजातकाचा सडा पाहायचे आणि रोज देवाला टोपलीभर फुलांचा अभिषेक करायचे. हे असं लिहिलं की वाचक आणि लेखक दोघांनाही अगतिकतेचा अनुभव घेता येतो. जे त्यांच्या वाट्याला यायला हवे होते, ती पोकळी दोघेही तितक्याच आर्जवाने स्वीकारतात. लेखक लिहिताना कल्पनेत ती कृती जगतो आणि वाचक वाचताना…
अजून एक उदाहरण म्हणजे, एखादा गरीब घरातला कर्ता पुरुष लेखणीचा आधार घेतो. ज्याने आतापर्यंत केवळ गरिबी आणि गरिबीचं पाहिली, जगली, अनुभवली. ज्याने श्रीमंतीची फक्त स्वप्न पाहिली. श्रीमंती फक्त चित्रपटांत पाहिली, कल्पनेत जगली आणि अनुभवली तरीही तो त्या कल्पनेतल्या श्रीमंत पुरुषाबद्दल लिहितो आणि ते इतकं देखणं लिहितो की श्रीमंत व्यक्तीला ते अपील होऊन तो जगण्याचं बळ घेतो. त्याचाच नेहमीचा गरीब वाचक त्याच्याच सारखं पुन्हा लिहिलेल्या कल्पनेत जाऊन ती श्रीमंती जगू लागतो आणि यातून लेखकाला शृंगारिक श्रीमंती जगल्याचं आत्मिक सुख मिळतं.
त्यामुळे लेखक आणि वाचकाचे हे घनिष्ट नातं सांगण्याचं नाहीये, बोलून दाखवून या नात्याला छिद्र पाडण्याचं नाहीये. या कठोर आयुष्यात एकमेकांना समजून घेत एकमेकांचा सोबती बनण्याचं हे नातं आहे.
तुम्ही म्हणाल खोटं लिहून मग लेखक फसवणूक करतोय? पण खरं सांगू का ही परिस्थितीची केलेली दिशाभूल आहे. तिने वाट्याला दिलेलं जगणं यातून गत्यंतर नसलं तरीही त्यातून आपल्या मनाचं ‘मनासाठी घर’ शोधणं आपल्या हातात आहे. हे असं घर बहुतेकदा कलेत किंवा निसर्गात सापडतं. आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्याला पाहता तर येते. ते कमीपणा वाटून घेऊन दुःखी होत नाही. आहे त्यात जे जे शक्य ते ते करत राहतात, कला आणि निसर्ग जगणारी माणसं सुखी असण्याचे कारणच हे असते. कारण जे आपल्या वाट्याला आले नाही ते जगण्याची ताकद कलाकार आणि कलाप्रेमींमध्ये असते.
– पूजा ढेरिंगे