पावसाळी दिवाळी!

पुण्याच्या पावसाला मुंबईची सोय नाही, ना इथल्या प्रशासनाला घनदाट सरींची सवय!

अज्ञात, अनभिज्ञ, अटळ असं प्रत्येक पिढीत घडतं काही, त्या सगळ्या पिढ्यांत, सृष्टीच्या रणकंदनात गरीब होतात बेघर आधी!

छप्पर तितके मजबूत नसते,

वस्तू तितक्या टणक नसतात,

दिवाळीच्या तोंडावर दुकानदार नफ्याची स्वप्न पाहत जगत राहतात,

सगळं डोईवरून पाणी जाऊन डोळ्यासमोर वाहून जातं.

मनाच्या नजरेला स्वप्न विस्कटल्याचं चटकन एक छिद्र पडतं.

हफ्ते सुरू असलेल्या गाडी, घराचं नुकसान मनात पुन्हा नवी गरिबी घेऊन येतं, शंभराकडे सुरू केलेला प्रवास पुन्हा चिखलात आणून ठेवतो!

माणूस म्हणून जगतो म्हणून कित्ती नव्या उमेदिंना जन्म द्यावा? नवी सुरुवात केलेल्या मनाने किती काळ अंधार सोसावा?

रातभर हा धुमाकूळ अखंड सुरू राहतो, डोळे थकून जड पडून नकळत रात्रीस डोळा लागतो.

कुठेतरी सकाळी नजरेस गारठलेले घुबड पडते, चिमण्या झाडाखालीच दडी मारून चिडीचूप बसतात, मध्यमवर्गीय गॅलरीत येतात, गरीब लोक घरात साचलेल्या अर्ध्या पाण्यातून अबोल पाहत राहतात.

रात्रभर तग धरून राहिलेला तो झोपडीतला माणूस निराशेने उठतो, इतरत्र न पाहता थेट आभाळाकडे वर पाहतो, त्याचं त्याच्या वाट्याचं दुःख पुटपुटत कुठलातरी करार करतो, कुठलीतरी तक्रार देतो!

दोन तासांच्या त्या पाहण्यातून डोळे उघडताना उमेदीचा दिवस मागून घेतो!

तो हरत नाही, पडत नाही,त्रासतो मात्र पदोपदी,पण धडपडतो मात्र क्षणोक्षणी, पुन्हा नव्याने घर लावतो, पुन्हा फरशी पुसून घेतो, आधीसारखे घर करून कामाला सुरुवात करतो!

तो गरीब आहे,सगळं हरूनही,श्वास जिंकल्याच्या बळावर नव्या लढाईला सज्ज होतो!

– पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

1 thought on “पावसाळी दिवाळी!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *