कुणीतरी हवं!

  • by

उन्मळून पडतो आयुष्याच्या शर्यतीत तेव्हा मिठीत घ्यायला कुणी हवी…
एक घर तुटताना जोडायला कुणी हवं!.

खुप दुर जाऊ शकतो एकटा माणूस,
पण दूरच्या परिसीमा संपल्यावर आपलं म्हणायला कुणीतरी उरायला हवं!

यशासाठी टाळ्या वाजवायला अनेक हात असतात,
उन्मळून पडल्यावर दोन हातांची मिठी मारणारं कुणी हवी!

हृदयाचे झटके का उगाच येत असतील कोणत्याही वयात कुणाला,
हृदयावर होणारे आघात मोजायला आपलं असं कुणी हवं…

डूबत्याला आधार देतो, अंधळ्याला हात देतो,
मनाचा आजार झालेल्याला न दिसणारा उपाय देणारा कुणी हवा!

बिपीची मॅरेथोन सुरू असणाऱ्या शरीराला एक हात नॉर्मल करणारा हवा,
मनाला अन् शरीराला सुखावणारा एक पर्सनल माणूस प्रत्येकाला हवा!

वेड्याची इस्पितळ बनतात, भेटायला कुणी नसतं,
वेडं होण्याआधी कोलमडणार्याला सावरायला कुणी हवं…

रस्त्यावर पिऊन अथवा न पिऊनही निश्चिंत निद्रस्त झालेल्या माणसाला,
एक हक्काचं मन हवं, अपेक्षा करता येईल असं एक घर हवं…

एका घरात चार दारं, चारी दारं मिटून जातात,
चार दारात चार माणसं, एकमेकांना कोणी उरत नाही…
घराला चार माणसं हवी, माणसांना चार आधार हवे,
दगड झालेलं मन फुटावं, आधार देण्या धजावावं…

डोळ्यांचा शोध संपत नाही, मनाची अस्थिरता थांबत नाही,
त्या कोवळ्या हृदयाला,
वेड्या होणाऱ्या मनाला,
रस्त्यावर लाचार होणाऱ्या माणसाला तसं होण्याआधी एक माणूस भेटावा…
तो माणूस तुम्ही बनावं,
नाहीतर तुमच्या वाट्याला तो माणूस यावा!

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *