काही जमापुंजी आहे पण, त्याला जोडून थकबाकी आहे…
नात्याच्या वीस वर्षाच्या संसाराच्या स्पर्धेत अडकलेल्या दूर फेकून दिलेल्या माझ्या बेफाम ओढणीला एक ठिगळं जोडावं लागेल, थोडी संसाराची जमापूंजी भक्कम करावी म्हणतेय…
म्हातारपणात नाती जपायला जमतात, पण आज नाही जपली तर उद्या कुठलं नात्याचं बुडुक शोधून नातं जपायचं?
वीस वर्षांपूर्वी फिरायला जाताना त्या दूर डोंगरावरच्या गावच्या पारावर कासाराने हातात बांगडी घालताना फोडलेली एक काचेची उसन आहे, ती थोडी निघाली, थोडी उरली होती तरी तेव्हापासून सधन आयुष्याचं सपान मनाशी हाय… सोन्याच्या एका बांगडीचं बिगुल गाठुड्यात ठेवलंय…

थोड्या अपेक्षांचा भार आहे, वीतभर अब्रूची लक्तरे आहे, सांजच्याला बत्ती लावताना तेवढाच ऑफिसातून घरी येणाऱ्या त्याच्या धूसर आकृतीचा थोडा सुगंध हाय…
नेहमीपेक्षा एखाद्या मुडच्या रात्री अलगद हाताला केवळ लागलेल्या कोमल स्पर्शाच्या त्याच्या हातात आमच्या दूरवर क्षितिजापल्याड जाणाऱ्या पाऊल खुणांच सपान मोट्ट हाय…कवा कवा तर म्या पण या अविष्यात पार सगळं इसरून जातेय पण मला कैक जुन्या आठवणींतून आम्ही दोगं सापडत असतोय, पण भराकटाया लागला वाटतंय दोघांचा रानमाळ…
अय मनात बी आणायचं नाय कळल काय… ?
कारण सपनांना पुरा करायला कोण कशाला हवाय, वेशीला स्वप्न टांगलेला माझा ऊर बडा खमका हाय त्यासाठी!
एक पाय त्याचा इकडूंचा तिकडं न्हाय संसारात तरी सुरक्षित संसारात थोडा येळ आता सुखाचा हवाय, त्यामुळं पैशाची जमापुंजी बक्कळ झाली आता…
त्या जुन्या सुखाची थकबाकी रोज रातच्या उशाला येऊन कानोसा घेऊन हुंदके देऊन जाते, वसुलीला दुसऱ्यांची स्वप्न उघड्या डोळ्याने पाहायला लावते….
त्यामुळे आजपासन माझं ठरलंय, सुखाची थकबाकी ठेवायची नाय….
जरा जास्तीची सप्न अस्ताय माजी, त्यो पण सोबतीला बघतो कवातरी… मिळून जवा एखादं सपान रंगवत एखादा शिनेमा पाहून मिठीतल्या काळोखात लपतो ना, तेव्हा प्रेमाच्या कथेचा गाभा मधाळ होत जातो, असा एकल्यालाच साजरा करता येईल असा सण यावा प्रत्येकाच्या नशिबी…