घनदाट पावसाच्या सरी पडत असताना
एखाद तास पावसाला रोमँटिक म्हणणं जमेल,
हात बाहेर काढून पाऊस झेलणं जमेल,
त्याच्या/ तिच्या कुशीत शिरून पाऊस बघणं जमेल,
गरमागरम भजी, चहा जास्तीत जास्त दोन तासात संपेल,
गप्पांचा फड तासभर रंगेल,
तासभर आडोशाला टपरीवर त्याच्या जवळ उभी राहण्याची ऊब हवीशी वाटेल…
एखाद्या पुस्तकाची शंभर दोनशे पानं पावसाच्या जोडीने वाचताना पुस्तकाला नवा गंध देऊन जातील…
पावसात उसंत म्हणून कुटुंबाबरोबर दोन तास सुखाचे जातील,
पण
सतत संततधार कोसळणारा हा घणाघाती पाऊस झेलायला डोक्यावर शाबूत छप्पर हवं!
तरच पावसाला सुख आणि सुखाला समाधानाची जोड लाभते…
नाहीतर पावसात गळक्या छपरात भिजणारी जिवंत माणसं सुखाचा गिल्ट मनात ठेवून जातात…
जेवायच्या ताटात गळक्या छपरातून धार पडू लागते, तेव्हा पावसावर कविता नाही शिवी हासडून मन शांत होतं,
नाहीतर दिवसभर कष्ट करून जीवाला निजायला शांत झोप लागते,
तेव्हा नेमकं पोटावर धार गळू लागते, तेव्हा एका गरिबाला पावसाची अडचण वाटू लागते…
पाऊस रोमँटिक वाटायला डोक्यावर छप्पर असावं लागतं!