कालपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या कपड्यांची चर्चा होत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कांस फेस्टिवलमध्ये अमृता ब्लॅक गाऊनमध्ये गेल्या. लोकांच्या नजरा उंचावल्या की, “ही बाई एवढ्या लांब जाऊन देशाची लाज काढते.” दुसरी बाजू अशी की विरोधक विरोध करायचा म्हणून माजी मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत बायकोला काहीही करण्याची मोकळीक दिल्याबद्दल बोलत आहे. त्यांच्याबद्दल माझे राजकीय मत काहीही असले तरी या समाजात वावरताना “बायकोचा पाठीराखा” ही भूमिका समाज नकळत बजावयाला भाग पाडतो. तिथे हा माणूस सॉलिड वाटतो. त्याने तिच्या स्वतंत्र आयुष्याला कधीच स्वतःच्या मालकीची वस्तू म्हणून ट्रीट केलं नाही. जे आपला समाज आजही मनावर बिंबवत आहे.
म्हणजे प्रकरण आहे, बाईने काय घातलं हे पण इथे कित्ती लोकांची मतं आहेत. तिचं मत, तिच्या नवऱ्याचं मत आणि वर बिन बुलाये मेहमान म्हणून तिच्या कपड्यांवरून आपली इज्जत ठरवणार्या समाजाचं मत. एखाद्याने काय घालावं यावर या तीन बाजू निर्माण करण्याची तरी गरज आहे का?
अशा ठिकाणी आपलं मत येऊच कसं शकतं आणि समजा मनाला खरंच खूप काही दुःख झालं तर ते मांडलं जातं आणि याउपर जाऊन त्यावर अपेक्षा पण केल्या जातात. कमाल आहे बाबा!
काही लोक म्हणतात, नवऱ्याला काही अडचण नाही मग समाजाला काय प्रोब्लेम असावा? अरे पण नवऱ्याचं मत बायकोने काय घालावं यावर आधी येतं की बायकोचं स्वतःचं? तिला वाटलं तिने घातलं. लग्न झालं म्हणून तिने काय घालावं हा सुद्धा अधिकार तिला नाही का? एकदा हा प्रश्न शांतपणे स्वतःला विचारून पहा. मनाला लाज नाही वाटली तर मग सांगा.
यावरून एक नुकताच घडलेला किस्सा आठवला,
आपल्याकडे नवीन लग्न झाले म्हणून कुणाच्या घरी गेलं की त्या स्त्रीचं हळद कुंकू लावून साडी देऊन मानपान करतात. तेव्हा पार्टनर म्हणाला, “हळदी कुंकू लावा पण साडी ती घालणार नाही. त्यामुळे साडी देऊ नका.” त्याने बीचाऱ्याने त्यांची एक साडी वाया जाऊ नाही या प्रामाणिक हेतूने सांगितलं. त्यावर सगळे ब्रेकिंग न्यूज असल्यासारखे बघायला लागले. मग मोर्चा माझ्याकडे वळला. प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. विचारलं, “मग कधीच साडी घालणार नाही का?
कधीतरी घालाल ना? असं कसं? कधीच घालणार नाही”
त्यावर मी म्हणाले, “घालणार नाहीच. “
हे दोन शब्द पुरेसे असायला हवे ना?
तर त्यावर नवरा या नात्याने त्याच्याकडे प्रश्नांची सोडवणूक सुरू झाली. त्यांना हवे ते उत्तर आणि हवी ती अपेक्षा पूर्ण होण्यासाठी ती धडपड होती. त्यावर नवऱ्याला म्हणतात, “तू तर आतापासूनच बायकोचं सगळं मान्य करायला लागला.” तो म्हणाला, “तिने कसं राहावं किंवा मी कसं राहावं हे आम्ही एकमेकांना सांगत नाही… तो ज्याचा त्याचा चॉईस आहे.” तो विषय तिथे थांबला असला तरी त्या विषयाने माणसांच्या मानसिकतेची पारख झाली.
असे बिनडोक प्रश्न म्हणजेच ज्याला ना हात ना पैर असे प्रश्न समोर येतात. खरंच तुम्ही कितीही शिक्षण घ्या, कोणत्याही पदावर जा पण हा समाज यातून तुमची सुटका होऊ देणार नाही.
कपडे हा बाईचा for that matter कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तिक मुद्दा आहे. पुरुषाला लग्नानंतर शेरवानी, पायजमा हे घालण्याची बंदी कोणी करतं का? मग बाईलाच का? आजही?
कोणत्या काळात जगतात ही लोकं? हे मागास विचार घेऊन पुढे जातात तर जातात त्याचा त्यांना अभिमान वाटतो, लाज वाटण्यापेक्षा. आपण एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणतोय आणि त्यांना उलट वाटतं तो व्यक्ती तसे वागत नाही म्हणजे त्याच्यावर संस्कार नाहीत. माझे संस्कार आता साडीच्या मापात मोजणार ही लोक? यांना मॉडर्न मुली लागतात, पण तिला स्वतःचे विचार नसले पाहिजे. ते असतील आणि ती मांडत असेल तर तिने ते वैयक्तिक पातळीवर ठेवावे. नाहीतर तिच्या संस्कारांचा पाढा वाचायला तयार बसलेली रिकामी हजार डोकी सहज सापडतात.
मी असं करू शकत होते की त्यांना विरोध न करता ती साडी घेऊन तशीच कपाटात ठेवून दिली असती… पण अशा कित्ती रितींना अंगावर घेऊन मग मनात आणि मग कधीतरी समाज म्हणतोय म्हणून साडीच्या कपड्यात गुंडाळणार? कदाचित पुढे जाऊन मला स्वतःहून साडी घालावी वाटेल सुद्धा. पण तिथे कोणाची सक्ती नसेल, माझी मर्जी असेल. हेच मला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगायचे आहे, सक्ती करण्यापेक्षा त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य हे कायदेशीर पद्धतीने त्या व्यक्तीचं आहे. स्वतःला आवर घाला!
माझा विरोध साडी घालणाऱ्यांना नाही पण त्याची इतक्या तीव्रपणे सक्ती केली जाते त्याला आहे. हा विषय कित्येकदा बोलला गेला आहे. पण तरीही काहींच्या मेंदूपर्यंत ही गोष्ट पोहोचत का नाही की लग्न झाले म्हणून आपण कुणाचे गुलाम होत नसतो. आपल्या नवरा किंवा बायकोने आपल्याला सल्ला द्यावा पण तो ऐकायचा की नाही हे स्वातंत्र्य दोघांनाही हवे. ते नसेल देत तर तुम्ही त्याच पुरुषसत्ताक किडीत खुश आहात.
साड्या घालून राज्य करणाऱ्या अनेक महिला आहेत, तशा इतर कंफर्टेबल कपडे घालून जग गाजवणाऱ्या महिलाही आहेत. त्यामुळे कपड्यांनी गाजावाजा करून तिला मुठीत ठेवण्याचे केविलवाणे प्रयत्न आता बंद करायला हवे. मला मध्यंतरी वाटलं होतं, लोक सुधरत चालले आहे. पण काही ठिकाणचे भाग आणि डोक्याने अधू असलेले महाभाग आजही समाजाच्या इज्जतीला बाईच्या साडीत बांधून ठेवत आहे.
नवरा-बायको दोघेही समान आहेत. आर्थिक, सामाजिक पातळीवर समान भूमिका निभावत आहेत. तरी तिने स्वीकारायचे हे कपडे, दागिन्यांची बंधनं. ज्याला खरंच आवड आहे त्याने त्याची हौसमौज करावी. पण लग्न झालंय तरी साडी नाही, मंगळसूत्र नाही अबब! हे भूत पाहिल्यासारखे एक्स्प्रेशन मिळणं बंद व्हायला हवे. यासाठी एक पाऊल मी उचललं आहे. खूप कठीण जातं अशा लोकांविरुद्ध उभं राहणं. पण स्वतःसाठी सोपं करायला हे जमवायला हवं! आणि नक्की जमतं!
- पूजा ढेरिंगे
अगदी मनातलं.. एकदम भारी. 👌🏻👌🏻
तू बोललीस की कित्येकींच्या मनातील बोलतेस ….प्रश्न आणि त्याच सडेतोड उत्तर….तुझ्याकडून बघून नेहमी एकच लक्षात येतं….#क्रांती…!!!❤️
खरं आहे लग्न झालं म्हणून स्त्रीचं स्वातंत्र्य नवऱ्याच्या हातात गेलं किंवा ते असावं हे पुर्वापार पासुज मनावर बिंबवलं गेलंय आणि मुळात स्त्रीचं असते जी यात स्वतःचा सहभाग नोंदवते. जोवर स्त्री स्त्रीची शत्रू हे समीकरण बदलत नाही तोवर फार कठीण आहे. दुसरी बाजू की पुरुषसत्ताक समाज हे जोवर नष्ट होत नाही तोपर्यंत हे असं ऐकून घ्यावं लागणार पण आपण बोलायचं, लढायचं आपल्या स्वातंत्र्या साठी. (स्त्री बोलली की संस्कार निघतात तिचे हे जुनंच पुढे चालू आहे कारण विरोधकांना लढण्यासाठी दुसरं हत्यारच राहत नाही) पण स्वतःसाठी लढणं हे महत्वाचे संस्कार आहेत आणि ते प्रत्येक मुलीने जपले पाहिजेत
Totally true!