हास्याचा खटला!

दारावरची बेल वाजली. पुन्हा वाजून आई उठू नये म्हणून मी पळत जाऊन दार खोललं. बघते तर काय दारात मावशी उभी.
तिचं असं अचानक येणं मला कळेना. तसं बाकीच्या नातेवाईकांसारखं ही ‘बिन बुलाए मेहमान’ कधीच नसायची म्हणून खरंतर मी शॉकमध्ये होते. कदाचित याच दुसरं कारण म्हणजे, बाकीच्या गरीब नातेवाईकांपेक्षा ही मनाने नि मायेनेही गडगंज श्रीमंत होती. तिचं असं अचानक येणं मला बुचकळ्यात पाडण्यासारख होतंच पण माझं तिला डायरेक्ट कारण विचारणं चुकीचं ठरलं असतं म्हणून आई झोपेतून उठेपर्यंतचा वेळ जाऊ दिला. तोपर्यंत पाणी देऊन उन्हाचा ओसर गेल्यानंतर तिच्या कपाळाच्या आठ्यांमधली एक रेष हळू पुसट झाली, थोडी शांत झाली ती. तोपर्यंत आई उठली होती.

नेमकं मुद्द्याला हात घालत आईने विचारल्यावर कळलं, ‘मागल्या वर्षीपासून चाललेलं घटस्फोटाचं प्रकरण एकदाचं सोहळा म्हणून पार पडलं. एका वाक्यात तिने येण्याचं कारण स्पष्ट केलं, ‘आमचा काडीमोड झाला’
तारा मावशी. हिला आम्ही ‘जीजी’ म्हणतो.
खूप शांत, तितकीच तडजोडीला नमती.
शिक्षणात ढासळता पाय म्हणून नकळत्या वयात दहाव्या वर्षी लग्न झालं. नवरा अगदी साजेसा तितकाच प्रेमळही मिळाला. मायबाचं ओझं हलकं झालं. पण कळत्या वयात पाय घसरला. पोलिसखात्यात असल्यामुळे दिवसाचा बराचसा वेळ बाहेरच जायला लागला. अशातच बाहेरची लत लागली. आधी एक नंतर अनेकींचा वावर वाढला…एकदा सक्ती देऊन सगळं मस्त आधीसारखा झालं, कोर्टाकडून ६ महिन्याची नोटीस मिळून नवीन प्रयत्नही केला.

पण हातातून साबण पडणारच, नळाचं पाणी बादलीखाली जाणारच आणि भांड्याला भांड लागणारच त्यावर घटस्फोट? प्रयत्न असफल झाला…. यात तिच्या अशिक्षितपणाचा दोष कि त्यांच्या उच्च शिक्षणाचा दोष ? नाही समजलं मला आणि दोष देऊनही फायदा नव्हता, त्यांना हवं ते त्यांनी केलं आणि तिने स्वीकारलं अगदी एक चकार शब्दही न काढता.

आज चाळीस वर्षे झाली या गोष्टीला, अगदी तशीच हसतमुख आहे ती आजसुद्धा.
‘थोडा मनावर परिणाम झाला आहे, हसत असते नेहमी’ असं घरचे म्हणतात. त्यामुळे तिच्याकडे गेल्यावर तिला म्हटलं कि ‘आमच्याकडे चल एकटीच आहेस, आम्हाला काय ओझं होणारे?’ तरी फक्त हसते नि म्हणते, ‘मावशीची काळजी कोण घेणार? घर कोण पाहणार. माझ्याशिवाय कोण आहे या घराला?’ याउपर सगळे कारणं व्यर्थ गेल्यावर एकच म्हणते “माझ्यावर प्रेम करणारी खूप माणसं आहे इथे, खूप प्रेम करतात माझ्यावर, मला नाही येता येणार त्यांना सोडून ….

काय हवय अजून आयुष्यात? अशावेळी मी निशब्द होते कारण एवढं सगळं होऊनसुद्धा, ’प्रेम शोधणं आणि त्यात समाधानी राहणं’ खूप कमी लोकांना जमतं, मावशी त्यातलीच एक. हाच फरक होता मावशी नि काकांमध्ये.
त्यांना बाहेरचं भुरळ घालणार जग दिसलं नि हिला प्रेमाने भुरळ घालणारी मनं. मावशीमुळे मी मात्र माझ्या भविष्याचा आराखडा बनवून पुनःपुन्हा खोडू लागले. आयुष्याच्या सावल्या नि रंग यात गफलत झाली होती, त्याची समिकरणे नोंदवू लागले. तिच्या आयुष्यात सावल्या राहिल्या म्हणून मी माझ्या आयुष्यातले रंग वजा करू लागले होते. तिच्या गुंता सुटण्याच्या क्षणी माझी गाठ सुटली, माझी रांगोळी वेगळी खुलणार हे मी ठार विसरून गेले. तिने मला शिकवलं, प्रेम संपत नसतं. ते कोणत्यान् कोणत्या रूपात आपलं आयुष्य खुलवतंच फक्त ते मनमोकळेपणानं स्विकारता आलं पाहिजे.

मनास हुरहुर आजही आहे,

“त्या कित्येक हास्यांचा कधी खटला भरलाच नाही,
जे स्त्री म्हणून वाट्याला आले. “

Please follow and like us:
error

1 thought on “हास्याचा खटला!”

  1. Hello there, There’s no doubt that your blog could possibly be having browser compatibility problems.
    When I look at your bog in Safari, it looks fine however when opening in Internet Explorer, it has some overlapping issues.
    I simply wanted to provide you with a quick
    heads up! Besides that, great site!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *