आयुष्याच्या जखमा!

आपल्या भराऱ्या लाख उंच होत जातात.
ख्वाईशे काहीच्या काही पुढे जात राहतात.
मन दरवर्षी वेगळ्याच ध्येयाकडे प्रवास करत राहतं.
मनाच्या संवेदना आयुष्यातल्या अपघातांमुळे बोथट होत जातात.
दरवर्षी आपणच इतके बदलत जातो.
लोकांना ओळखण्याच्या गोष्टी करणारे आपण,
स्वतःला प्रत्येक ठेचेला बदलवत राहतो…
सृष्टीच्या बदलाचा नियम जन्मापासूनच आपल्याला चिकटून येतो, नाकारला तरीही…

या बदलाच्या चक्रात काहीही झालं तरी एक गोष्ट बदलायची नाही,
कुणाच्याही जखमी मनाला कधीच चिघळू द्यायचं नाही!
आधार द्यायचा नसेल तर निघून जाण्याचे उपकार करायचे,
पण उघड्या जखमेला कधीच काचा टोचायच्या नाही…
कारण प्रत्येकाच्या प्रत्येक नव्या भरारीला नवी जखम पंखात लागते,
झाकण्याचे बहाणे शोधून आपण उडण्याची स्वप्नं बळकट करत राहतो…
नादान होत जातो, भराऱ्यांची सवय इतकी लागते की जमिनीवर पडण्याच्या भीतीने आपण जीव मुठीत धरून आकाशात श्वास घेण्याचे कष्ट करू लागतो,
आधी अभ्यासाच्या मग आयुष्याच्या मग दुनियेच्या परीक्षेत स्वतःसह झोकून देतो,
जिथे जिंकण्याची गरज असते पण जिवाच्या किंमती पेक्षा जास्त नाही!


ही गणितं आयुष्याचा गुंता वाढवू लागतात,
सुटायला शेवटचा श्वास उरतो,
अन् गणित सुटतं तेव्हा मृत्यू आपल्याला गाठतो…
एवढाच तर प्रवास असतो,
जिथे स्वतःच्या आयुष्याबद्दल संवेदनशील होत जातो, तिथे मरणाला आपण प्रिय होतो.

-पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

1 thought on “आयुष्याच्या जखमा!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *