कुणीतरी आपल्याला सांगतंय तू फेसबुक, इंस्टाग्राम वापरू नको, व्हॉट्सऍपला एवढ्याच लोकांशी बोल, मुलांशी बोलू नको, असे कपडे नको घालू, तसा पारदर्शक टॉप नको घालू, हा डीपी ठेवू नकोस, या कपड्यात वावरू नको, उगाच लोकांच्या नजरा, मुलगी आहेस तू … तू अस नको करू तसं नको करुस… काय आहे हे? आणि कशासाठी? या गोष्टी ज्याच्या त्याच्या आनंदासाठी असतात ना? सोशल मीडिया, ड्रेस घालणं, मेकअप करणं हे कुठलं काम नाहीये त्यामुळे लोक तिथे वेळ घालवणे पसंत करतात. तो त्यांचा आनंद आहे. आनंद म्हणजे मनाला सुखावणारी निर्मळ भावना! ती भावना ठरवण्याचा हक्क त्या व्यक्तीचाही नसतो, कारण आपल्या आवडी निवडी या आपल्याला मिळणाऱ्या या आत्मिक आनंदाचं प्रतीक असतात.
माझी एक मैत्रीण होती, तिचा बॉयफ्रेंड तिला “फेसबुक, इंस्टाग्राम वापरायचं नाही, आणि वापरलं तर आपलं ब्रेकअप!” अशा धमक्या द्यायचा. असं नाही की त्याला सोशल मीडिया आवडत नव्हता, उलट तो चवीचवीने त्याची मजा घ्यायचा, ॲक्टिव राहायचा.
पण ही कसली इन्सेक्युरीटी? अशावेळी तिचं प्रेम ओसंडून वाहायचं म्हणून ती त्याची ती इच्छा, स्वतःची इच्छा मारून पूर्ण करत बसायची. तिला कितीही वेळा तो कसा चुकीचा आहे हे समजावयाला गेले तरी ती मला म्हणायची, “प्रेम असच असतं. ते टिकवायला एवढीशी गोष्ट केली तर काय होतं.” मान्य आहे प्रेम टिकवायला समजून उमजून घ्यावं लागतं. पण तुमचा बॉयफ्रेंड दुधखुळे हट्ट करत असेल आणि तुम्ही ते मान्य करत असाल तर अशा प्रेमाला पाय जोडून दंडवत घालावा वाटतो. जर एवढीशी गोष्ट आहे तर मग त्यानेही सोशल मीडिया वापरूच नाही ना, साधी गोष्ट असते.
अशा माणसांना उगाच आपली मतं लादून काय साध्य करायचं?
जर कुणी म्हणत असेल की ते मत लादणे नाही तर हक्क असतो. पण तुम्हाला सांगते, हक्क कुणाला बंधनात बांधून ठेवत नाही.
पक्ष्याला पिंजऱ्यात ठेवलं तर त्याला नेहमीच जगाची ओढ राहते. त्याला मुक्त आकाश द्या, त्याला ओढ तुमचीच राहील!
माणूस तर जितका स्वतंत्र तितका तो बांधील असतो..कधी जबाबदारीला, कधी माणसांच्या वचानांना, कधी तत्वांना, कधी समाजाच्या चौकटींना…
आयुष्यात एक पुण्य करायचं, कधीच समाजाची चौकट बनायचं नाही. समाज म्हणजे तुम्ही, मी, आणि तिसरा कोणीतरी. हा समाज कुणाच्यातरी आयुष्यात त्या व्यक्तीला श्वास घेण्यात अडथळा बनत असतो. त्यामुळे आपण याचा भाग बनायचं नाही. कोणाला सांगायचं नाही की असं वाग किंवा तसं वाग. जर त्या व्यक्तीला वाटलं तर तो तुम्हाला स्वतःहून येऊन तुमचं मत विचारेल. तोपर्यंत का हक्काच्या नावाखाली बंधनांची लिस्ट टांगायाची? तुम्ही मानतात त्याच गोष्टी तो मानत असेल हा (गैर) समज मनात वाढूच का द्यायचा? त्याच्या आयुष्याचं डिजाइन पूर्ण वेगळं आहे आणि तुमच्या आयुष्याचं त्याहून वेगळं! तुम्ही तुमचं जगा आणि त्याला त्याचं जगू द्या! मुक्त वावरण्यात सुख आहे, स्वातंत्र्य देण्यात पुण्य आहे…
-पूजा ढेरिंगे
True pooja👍
स्वातंत्र्य देण्यात पुण्य आहे…👌👌❤️❤️