कुठल्यातरी एका गोष्टीवरून सतत त्रागा करून साचलेल्या डबक्यासारखी स्थिती करून घ्यायची नाही. भूतकाळ स्वीकारायचा, वर्तमानकाळ घडवायचा आणि भविष्यकाळ आखत जायचा. हे मला आज पुण्याच्या रस्त्यावर भेटलेल्या रिक्षाचालकाने शिकवलं.
त्यांची चकाचक आणि हेल्दी रिक्षा पाहून मला त्यांच्याशी बोलायचं होतच. कारण ज्या व्यक्तीला आपलं काम प्रिय असतं ते तो खूप मनापासून करत असतो आणि त्या कामातलं वेगळेपण अधोरेखित होतच असतं. त्यामुळे मनातली उत्सुकता संपवून मी त्यांना विचारलंच, तुम्ही पुण्याचेच का? मग रिक्षा चालवणं परवडतं का? आधी काय करत होते? अशी त्यांच्या उत्तरांना जोडून प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. असं करत करत त्यांचा आयुष्याचा प्रवास ऐकायला मिळू लागला. पुण्याच्या ओळखीच्या रस्त्यांवर नवी ओळख होत होती, अशा व्यक्तीशी ज्याला मी फक्त रिक्षावाला म्हणायचे. पण त्यांच्या कामामागच्या कहाण्या विलक्षण असतात. त्या कहाण्या कळू लागतात त्या ट्रीप खूप अविस्मरणीय असतात.
त्यांचं पहिलं वाक्यच मनावर राज्य करणारं होतं की, “रिक्षाचालक बनल्यामुळे एकतर शहर फिरायला मिळतं, रोज नवं भाडं मिळतं आणि यात मी ‘हॅप्पी’ आहे.” त्या हॅप्पी शब्दामध्ये खूप जागरूकता होती. हॅप्पीचा अर्थ उलगडलेला तो वेगळा रिक्षाचालक होता.
‘खरेखुरे हॅप्पी’ माणसं मला खूप भावतात. त्यामुळे त्यांचा अनुभव ऐकण्यात मजा येऊ लागली होती. ते सांगू लागले, ‘मी आयुष्यात कधीच नोकरी करणार नाही’ या ॲटिट्यूडमध्ये एकोणनव्वद साली दहावी करून शिक्षण सोडलं आणि बिजिनेसचा मार्ग निवडला. त्यांनी पुस्तकी शिक्षण सोडलं पण त्यांनी दुनियेचा अभ्यास खूप चोख केला, याचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक वाक्यात येत होता.
तंत्रज्ञानाच्या फास्ट युगात चौदा वर्ष केलेल्या प्रिंटिंगच्या बिझिनेसला भविष्य नाही हे ओळखून दोन अडीच वर्षांपूर्वी रिक्षा चालवून आयुष्याचा प्रवास सुरू करायचं त्यांनी ठरवलं. कुणीही दिशा न देता हे रियलायझेशन होणं आणि त्याची अंमलबजावणी करणे हे खूप ध्येर्याचे काम असतं. आता ते ओला, उबर, रॅपिडोसारखे सगळ्या ॲपवर रजिस्टर आहेत आणि ऑनलाईन सोयींचा योग्य वापर करताय. पूर्वी एकाच जागी बसून काम करण्यात त्यांना स्थैर्य सापडलं. पण जगाबरोबर पुढे जाणं त्यांनी थांबवलं नाही. ते जगाबरोबर पुढे जाताय पण जे करताय त्यावर त्यांचा मनापासून जीव आहे. ते ग्राहकांना लुटत नाही. त्यांना परवडतं म्हणून ते तो धंदा करत आहे. “ग्राहकाकडून जास्त घेऊन मनाला काय उत्तर द्यायचं?” असा अवघड प्रश्न त्यांना पडेल अशी कामे ते करत नाही.
त्यांच्या मुलीला अभिनयाचे वेड आहे. त्यात शिक्षण घेण्याची इच्छा आहे. पण मी वरती म्हटलं तसं त्यांनी आयुष्याचा नीट अभ्यास केलाय. ते म्हणाले, “काहीतरी स्थैर्य असलेलं शिक्षण घेऊन त्याची डिग्री मिळवून तिने अभिनयाकडे वळावं” असं मी तिला सांगतोय. कारण एक सिनेमा करून आयुष्यभर डिप्रेशनमध्ये गेलेले कलाकार कमी नाही. प्रत्येकालाच नशीब साथ देतं अस नाही. त्यापेक्षा डॉ. निलेश साबळेसारखं आयुष्य जगावं. जर नाहीच अभिनयाने साथ दिली तर तो डॉक्टरकी करेल. पण आयुष्य थांबणार नाही. त्यांचा हा दृष्टिकोन ऐकून खूप समाधान वाटलं. कारण आजच्या फास्ट आयुष्यात बॅकअप प्लॅन असायलाच हवा. आयुष्यात आर्थिक स्थिरता येणं गरजेचं असतं.
त्यांचे विचार पटत होते. मग त्यांना विचारलं, तुम्ही तर डायरेक्ट फिल्डच बदलली. पूर्वी बसून काम आणि आता दिवसभर रिक्षा चालवायची. तुम्हाला सुरुवातीला भीती नाही का वाटली? ते म्हटले अजिबात नाही. मला तर रिक्षा घेण्याआधी चालवता सुद्धा येत नव्हती. पण रिक्षा चालवायची ठरवलं. एकदा काही ठरवलं की ते पूर्ण करायचा कॉन्फिडन्स नेहमीच असतो. त्यामुळे त्या आत्मविश्वासाच्या जोरावर रिक्षा घेतली. ती चालवता येत नव्हती. ती चालवायला शिकलो. मग आता पुणे फिरतोय. हे सगळं ऐकून एखाद्याला वाटेल किती इजी आयुष्य आहे. पण तसं नसतं हो! तक्रारी करायच्या म्हटलं ना आयुष्य कमी पडेल एवढे प्रॉब्लेम्स असतात. पण तक्रारी खोडायच्या ठरवलं की मार्ग स्पष्ट होत जातात.
वाह, एका भेटीत कित्ती शिकले मी!
काही लोकांचं काय होोतं, ते भूतकाळात चुकलेले निर्णय गिरवत बसतात. जर यांंच्याा जागी दुसरा कुणी असता तर, आजच्या महागड्या शिक्षणाच्या जगात दहावीच शिकलो म्हणून पश्र्चाताप केला असता, मग सुरू केलेला धंदा मंदावत आहे हे लक्षात आल्यावर खचला असता आणि आयुष्याने आपल्याच माथी संघर्ष लिहिला म्हणून रोज स्वतःला कोसत बसला असता. पण मी नेहमी म्हणते “तुम्ही हॅप्पी आहात इथेच तुम्ही आयुष्याला हरवलं! …” आज तो रिक्षाचालक माझ्या नजरेत जिंकला होता. कारण त्याने आयुष्याला ओळखलं होतं.
पुण्याच्या रस्त्यांनी नवी कहाणी दिली. तो प्रवास आयुष्याला नवी प्रेरणा देऊन गेला. शहरांच्या वस्तू प्रसिद्ध असतात, तशाच या सर्वसामान्य लोकांच्या असामान्य कहाण्या फेमस असतात. त्या लोकांनी शहर बनतं.
मीटर_सी_जिंदगी
थोडक्यात हेच की आयुष्य जगण्यासाठी शिक्षण महत्वाचं नव्हे.. तुमच्याकडे असणारी कार्यक्षमता, आत्मविश्वास, धाडस हे महत्वाचे आहे.. ❤️खुश रेहने का तरिका धुंड लेना चाहिए.. घुट घुट कें तो सब हीं जी रहें है
व्वा..खूपच सुंदर 💚💚