गवतीचहाचा बहाणा!

  • by

पाऊस यावा आणि तो माझ्यासाठी यावा.. स्वार्थी मी व्हावं… या पावसात माझी बरीचशी काळजी सहज ओसरते, अनुभव आहे आतापर्यंतचा. त्यामुळे सगळ्या दुनियेला, त्याच्या मोहमायेला झुगारून मी त्याच्याशी समरूप होते, सगळं दु:ख सांगुन मोकळी होते…!
त्या घट्ट आकाशाच्या काळपट रंगात डोळ्यात डोळे घालून मी म्हटलं, “अब याद नहीं आती उनकी… सच ही तो कह रही हूँ| “
तितक्यात मला आठवलं सोबत मित्रही आहे आणि त्याच्या एका संभाषणाला कंटिन्यू करत तो एकसकट एक वाक्य म्हणाला,

 “जितकं लवकर एखादी भावना स्वीकारशील ना, तितकं तुला सोप्प जाईल त्यातून बाहेर येणं किंवा किमान त्यातून सर्वाइव्ह करणं सोप्प होईल. नाहीतर ती मनात दाबून टाकली कि तिचा विस्फोट होतो… उधाण आलं तरी चालेल, बोलून टाकायला हवं… “

खरं होतं ते?
नेम्मक्क तेव्हा अचानक एखाद्या आठवणीला डोकवायचंच असतं, निमित्ताच्या ती शोधात असते….
आणि यावेळी मित्र म्हटल्याप्रमाणे मी त्या आठवणीला स्विकारून येऊही दिलंच… मलाही निमित्त हवं होतं…
“काय होतंय जास्तीत जास्त…?” म्हणत मी स्वतःलाच प्रश्न केला …
“त्याची कडाडून आठवण येतेय.” उत्तर मिळालं. पण मी चहा ठेवायचा बहाणा करून ते टाळल्यासारखं केलं ..
बाटलीतलं पाणी घटाघटा चहासाठी टाकल. साखर त्याची नि माझी मिळून दोन चमचे टाकली …. त्यात रागारागात गवतीचहा टाकलाच आवर्जून.
रागारागात ज्याची आठवण आली त्याच्याशी संवाद साधल्यासारख करत ध्यैर्याने मी बोलत होते; तुझ्या आठवणी मला आवडत नाहीत. पण गवतीचहाने त्यांना उधाण येणार असतं आणि मला ते उधाण निर्लाज्जसारखं हवं असतं… ‘का हवं असतं?’ हा दुधखुळा प्रश्न तु मला न विचारलेलंच बरं. हक्क तोही नाही तुझा.!
पण तितक्यात तो उकळणारा गवतीचहा विक्षिप्तपणे त्याच्या येणाऱ्या बुडबुड्यांतून मला खॊचकपणे विचारूनच टाकतो, “कुठे, आहे कुठे तो?”
मी त्यालाही टाळल्यासारख करते…

समोर मित्र बसलेला आहे…
गवतीचहाच्या दोन पाती न गाळताच तो कप स्वतःला घेत, दुसरा ‘आज माझ्या हातचा चहा पाजते तुला.’ असं म्हटलेला चहा त्याच्याकडे सरकवते. त्या सरकवण्याबरोबर रिटर्नमध्ये आधीची आठवण बॅकग्राऊंडला सुरु होते.
मित्राची  बडबड चालू असते आणि माझ्या बॅकग्राऊंडला तुझ्या भासांची असंख्य, अखंड बडबड सुरू असते…
“जिथे तु आणि मी असते फक्त.”

जिथे तुझं अस्तित्व नसतं, मला ते नकोही असतं… कारण मला आत्ताचा तू नकोच आहेस… हवा आहे तो व्यक्ती, जो कधीकाळी माझा होता, ज्याच्यात मी होते… ज्याच्यात मी स्वतःला ठेवल्यावर मला कसलीच क्षणभरही काळजी नसायची.. कारण तूच म्हणायचास “मी तुझ्या सोबत नाही, तुझ्या आत आहे.”
मी माझ्यातल्या तुला जोपर्यंत तू ‘माझा’ म्हणून होतास तोपर्यंतच्या आठवणीत जपलंय कारण त्या वेळचा तू दूषित नव्हतास. आणि मला या पावसात शुद्ध गोष्टी आवडतात… त्यामुळे आपल्यातले ‘आपले’ क्षण मी ठेवलेय कि… या सायंकाळच्या पावसातल्या चहासाठी नि बॅकग्राऊंडला असलेल्या तुझ्यासोबत कट्ट्यावर बसून तुझ्यात हरवून जाण्यासाठी. तू असाच तिथे राहा… कधीच जाऊही नको ना येऊही नकोस… 
मी आनंदाने स्वीकारतेय तुझं आठवणींमधलं असणं..
आणि माणसांमध्ये राहूनही स्वतःत जगणं …

  • पूजा ढेरिंगे
Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *