सूर्य मावळतीला जात होता. वातावरण भकास होतं. आयुष्यात सगळं संथ, बोथट आणि नकरवी झालं होतं.
‘कशाला करायचं.?’ या एका प्रश्नचिन्हावर मन अडून होतं. डोकं आजकाल जड खूप पडू लागलं होतं. भलतेच प्रश्नांचे नांगर असे आ करून माझ्याकडे बघत राहतात. त्या लटकत्या प्रश्नचिन्हांकडे दुर्बिणीतून पाहत पाहत दूर अजून कुठल्याशा वातावरणात बहुदा वाळवंटात मन जातं. मग नाही म्हणत उकरून उकरून मला एखादा कोरडा विचार मिळतो,
‘स्साला आम्ही एकमेकांपासून दूरच नको व्हायला होतं.’
मग असं चघळत पार चोथा झालेल्या एका नात्याला अजून बारीक करत मी ‘मैं ढूंढने को ज़माने में वफ़ा निकला’ असं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप वाईट आणि तितकंच अर्थपूर्ण गाणं लावते.
जे ऐकून मला लाज वाटते कि, “स्साला बस कि, नाही करत तू आता प्रेम. फक्त हि भावना तुला पचवता येत नाही कि, ‘तुझ्याकडून एखादं नातं तुटलं गेलय. तुझा खरा गोंधळ हा आहे. त्याशिवाय तुझं सगळं व्यवस्थित चालू आहे. शिवाय आता तर प्रेमच प्रेम आहे आजूबाजूला. तुझं घोड मात्र जे मिस झालंय, मग ते त्या लायकही नसो पण तुला सोबतीला हवं होतं, असंच ना? आणि मागून लगेच अरफ़ात महदूद लिहितो, ‘मैं ढूंढने जो कभी जीने की वजह निकला’ घंटा….. असलं म्हणजे खरच घडल होतं हे सगळं. पण तो एका दिवसाचा खोटा प्रयत्न होता…. मी प्रयत्न केला मनापासून.
कारण काही नाती तोडावीच लागतात. नाहीतर आपण तुटत जातो कणाकणाने.
गाणं काहीस आवडत जातंय.

ए मी बघते तर काय? माझ्या घराच्या समोरच्या त्या ग्रील लावलेल्या अर्धवट तोकड्या खिडकीत दोन सावल्या एक दिसत होत्या, आकृती जरी एक होती, वळणाकृती जरी होती तरी स्तनांच्या खाली तिला भलताच नियंत्रित बांध घातलेला विळखा जो घडला होता. त्या स्तनांच्या दोन टिंबांनी मन मात्र पूर्णविरामात अडकलं.
सावल्या किती गुंतवत होत्या एकमेकांना एकमेकांच्या आकर्षणात. तिची धडपड जणू एक सुंदर नेत्रसुख घडत होतं. ती तिच्या दोन हातांतुन स्वतःला त्याच्या ताब्यातून सोडवून घेत होती. तिची तडफड नव्हती, तिचा अचंबित करणारा तो प्रयास होता, त्याच्या स्वाधीन होण्याचा. ती ज्या अगतिकतेने त्याच्यापासून दूर जाईल तितक्याच अगतिकतेने त्याने तिला जवळ खेचत इतकं जवळ खेचावं इतकाच त्या दूर जाण्याताला प्रामाणिक प्रयत्न होता.
कस्सकन त्या दोन आकृतींची एक कृती घडत जाऊन काय सुंदर कलाकृती डोळ्यांना अनुभवता येत होती.

पाप होतं, पण निसर्गाने तो क्षण माझ्या नावे केला होता. त्याने तिला इतकं जवळ घेतलं कि तिच्या डोक्याने कसलाच कणभर पण विचार करू नाही इतकं जवळ. त्यांचा हा खेळ सावल्यांचा, माझ्याशी एकरूप होत होता. सूर्याने मला दाखवलेला हा वेगळा सोहळा डोळ्यांना अजब विचारचालना देत होता. हात जरी थरथरत होता, मागे विचारात जाऊन मात्र मला आमच्या दोघांतला तो स्पर्श आठवून हळूहळू माझ्या मानेवर, माझ्या केसांत आणि त्याने खेचावं गच्च जवळ तसं माझ्या केसांना खेचत घट्ट ओठांवर. खल्लास !
माझ्या कोरड्या आठवणींत मघाशी माझी लागलेली तंद्री सुखावली होती. सूर्याने मला एक अजब क्षण नजरेस दिला होता.
एका संभोगात घाणेरडेपणा कुठे होता?
त्याने तिच्यावर हक्क दाखवावा, तिच्या शरीराला, तिच्या प्रत्येक त्या भागाला जवळ करावं, त्याला इतकं जवळ करत जावं कि दुसऱ्या क्षणी जेव्हा तो तिथे नसेल, त्याच्या अनुपस्थितीत तिने त्या प्रत्येक भागाला निरखून पाहत, पुनः पुन्हा स्वतःवर प्रेम करत जावं…
मी आठवणीतही स्वतःच्या प्रेमात पडू लागले होते. मी आजही तो क्षण आठवून त्याच्या आठवणीत जात होते.
माझा गाण्याचा स्विच बदलत जातो. मेहबूब आलम माझ्यासाठी लिहित होते, ‘हाय रामा ये क्या हुआ, क्यों ऐसे हमें सताने लगे’ त्या खिडकीच्या काचेवर असलेल्या त्या सावल्यांचा खेळ मात्र बघायचंही मी विसरून जाते. त्या गीतांच्या त्या शब्दांमागे धावत मी स्वतःच्या आठवणींकडे धावू लागते.
आठवणींची दृष्टी खरेच इतकी तीक्ष्ण असते कि, समोर डोळ्यांना दिसणाऱ्या पटलापेक्षा जे दिसत नाही त्यात माणूस निघून जातो. ते डोळ्यांना दिसू लागतं, सामर्थ्य भलतंच आहे, जे नसून असल्यासारखं आहे त्याचं!
प्रेमातील हे क्षण किती भरीव असतात. एखाद्या मंगलमय सोहळ्यासारखे! ज्यात बघितलं तर दोन्ही मनाचं पावित्र्य आणि एकमेकांचं स्वातंत्र्य असतं!
त्या काळामागे धावत गेलेल्या आठवणींच्या झान्गडगुंत्यातून बाहेर पडत स्वतःला शांत करत आमच्यातले क्षण विसरत मी आतून एकदम शांत होऊ लागते. माझं मन त्या क्षणामुळे, त्या आठवणींमुळे सुंदरपणे शांत होऊ लागतं. खिडकीच्या बाहेर पाहत मावळत्या सूर्याकडून थोडस इन्स्पिरेशन घेत नवीन सुरुवात करावी म्हणत बाहेर बघितलं.
त्या सवाल्यांचाही तो क्षण आवरला होता. दोन्हींची एक झालेली ती सावली आता, खिडकीचा तो पडदा, ती काच बाजूला सावरून त्या मादक आकृतीला ओढणीचा स्पर्श देत एक झाली होती. वैयक्तिक अशी एकटीच…!
कॉफीचे दोन मग सावरत हालचालींत अन नजरेत हुरहूर होती, ‘कुणी पाहिलं तर नसेल? …. ‘ मी तिला गाफील ठेवत मागे होत त्या नजरेतील लाजणं आणि सुखद होणं पाहून तिच्या त्या क्षणात माझा क्षण जगल्याची स्वर्गानुभूती घेत तो आनंद माझ्या वाट्याला घेऊन, तो प्रवास केवळ तिच्या नावे करत कॉफीचा तो मग ओठांना लावत,
त्या कपाला विचारते, ‘जे होतं खास होतं ना.? त्यात शंका आहे का.?’
उत्तर येतं, ‘तिळमात्रही नाही.
‘झालं तर मग स्वीकार!’
जो जैसा हैं गुल्फाम (अतीव सूंदर) हैं। उसे खुदखुशी करने का अवसर न दे|
छोड़े बिन छूटेगा नहीं, उसे लहराते रख, सुकून हैं वो सांसो का|
‘हळूहळू मी शांत होत जाते…. मागे हळू आवाजात मीच माझ्या ओळी गुणगुणी लागते , ” जो हो रहा उसे होने दो, ए मोहतरमा मोहब्बत हैं उसे बहाने दे|”