ऑफिसला जाताना पैसे, पाकीट, लिपस्टिक, रुमाल, फाईल घेतली का पुन्हा तपासून पाहिलं.
आणि मुलगी?
ती जॉब करते, तोही जॉब करतोय. दोघेही उत्तम भविष्याच्या दिशेने करीयर करत आहे. स्वाभिमान दोघांत काठोकाठ भरलेला. दोघेही यशाच्या पायऱ्यांवर आहे, दोघांनाही त्यांची ध्येय दिसताय. पण त्या दिवशी त्यांच्या शरीराने गतिरोधक दाखवला. झालं असं की, त्यांच्या शारीरिक गरजांमुळे ते नवरा बायको होऊन जवळ आले. इतके दिवस मनाने तर एकमेकांच्या साथीला नव्हते. पण शारीरिक गरजेने नवरा बायको असल्याचं कर्तव्य पूर्ण करत ते त्या रात्री ऑफिसची कामं बाजूला ठेवून वेळात वेळ काढून एकत्र आले. एकत्र आल्यानंतर जे झालं ते अशावेळी रोमँटिक नव्हतं. तुम्हाला प्रेमात पडल्यानंतर एका रात्रीची मजा रोमँटिक वाटते. पण ज्यावेळी त्याचे परिणाम तुमच्या समोर येतात, तुमची इच्छा आणि तयारी नसताना पाळी मिस होते आणि गर्भवती होण्याची शक्यता वाटते. तेव्हा वेगळ्या अग्नी परीक्षेत अडकलेले असतात. त्या दोघांचंही तेच झालं. पण अचानक ते दोघे संपलेल्या रात्रीची आठवण काढून अबोर्शन न करता बाळाला जन्म देऊन वाढवण्याच्या आणाभाका घेतात. तुटलेल्या घरात आनंद नांदू लागतो. नवविवाहीत वधुतून ती आई व्हायला जाते. तिचा उत्सव सुरू होतो… दोघेही भावनिक समाधानाचे सगळे उंबरठे ओलांडून अनेक प्रॉमिसेस करतात. एका चिमुरड्या नाजूक मुलीचा जन्म होतो, मुलगी पाच वर्षाची होत नाही तोवर, आई म्हणून ती पुन्हा तिच्या करीयरच्या वाटेकडे वळते. अन् बाप म्हणून तो आधीपासून घरखर्च निघावा म्हणून ड्युटीवर असतो. दोघेही कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी घराबाहेर पडतात. कुटुंबाच्या भविष्यासाठी प्रयत्न करताना मागे कुटुंब उरतय की नाही हे बघणं पण महत्त्वाचं असतं. पण ते दोघेही जुन्या जोमाने काम सुरू करतात. चार-पाच वर्षाची ती चिमुरडी या धिप्पाड माणसांच्या जगात सैरभैर होते. तिचं मन भक्कम आणि आपला माणूस शोधत रहातं. तिथे तिला आज्जी आजोबा दिसतात पण आई वडिलांना तेही नको असतात. ते दोघे जेव्हा घराच्या बाहेर पडतात, त्या क्षणापासून ते त्या चार भिंतीच्या खोलीत त्या छोट्या बाळाला एकटं ठेवतात. किती वर्षाचं ते बाळ? पाचही पूर्ण नाही! लहान असल्यामुळे ना स्वतःचा विचार ना समाजाची जाण. त्यामुळे त्या चिमुरडीचं मुक्त बागडण तिच्यासाठी खूप वैयक्तिक होतं पण मागच्या लेखात सांगितलं तसं, “तिचं बागडणे ती सोडून अजुनही कोणीतरी बघत असतो.” तो म्हणजे तिच्या परिसरातला एक मानवी राक्षस… रोज तोंडावर दार असल्यामुळे “शेजारी” या नावाचा. तो एक दिवस पाहतो, दुसऱ्या दिवशी पाहतो, त्याला खूप भारी वाटायला लागतं. सापाने भक्षकाजवळ घेरा घालत रहावं, घालत रहावं आणि एके दिवशी मोका शोधून डंख मारावा. एकदा मारून मन भरत नाही म्हटल्यावर एक दोन म्हणत दहा पंधरा दिवस डंख मारून त्या चिमुरडीच्या न वाढलेल्या गुप्तांगाला चोखत, चिरडत रहावं. ती ओरडत राहिली, रडत राहिली, तिचा चिमुरडा आवाज ऐकायला आई वडिलांनी घरात कोणालाच ठेवलं नाही. संपूर्ण घरात तिचा आवाज एका हट्ट केलेल्या बाळासारखा घुमत राहिला. तिला बलात्कार सारखे शब्द माहीत नसतात, पण तिच्यावर दरदिवशी १०-१५ दिवस सलग बलात्कार होत असतो. तिच्या पालकांना याची भणक नसते. तरी ती चिमुरडी आईकडे रडते, ओरडते, पप्पाला समजून सांगायचा मुका प्रयत्न करते. पण ते दोघेही तिच्याकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी जेव्हा तिचा भाचा तिला ‘चांगला-वाईट स्पर्श यातलं अंतर समजावण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा तिची आई तिच्या भाच्याला ओरडायची. म्हणायची, असं काहीही घाणेरडं, भलतं-सलतं तिच्या डोक्यात भरवू नको ‘ ना स्वतः आई म्हणून मुलीवर संस्कार करायचे ना कुणी निस्वार्थ हेतूने करतंय त्याला करू द्यायचं. चिमुरडी रडत राहायची, तिचं सू-शीच्या नाजूक जागेवर खूप दुखायच. अशावेळी तिलाही प्रश्न विचारावा वाटत असेल की,
“कपड़े, गुरूर का कसूर बताते हैं!
पापा, क्या मेरे लंगोट का भी कसूर है?”
तिचं रडणं एखाद्या खेळण्यासाठी नव्हतं. ती स्वतः कोणाच्या तरी हातची खेळणी म्हणून वापरली जात होती… अशा वयात जिथे ती प्रत्युत्तर सुद्धा देऊ शकत नव्हती.
प्रत्येक वर्षाने काळ बदलतो, मी तर म्हणेल दरदिवशी काळ बदलतो. माझं बालपण म्हणजे इतकी बंधनं, हे नको करू ते नको करू, यातच गेलं… शिवाय मुलगी म्हणून माझ्याबाबतीत काही बंधनं लादली, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण माझ्या आईवडिलांनी, मावशीने, मावस भावांनी मला सांभाळताना माझ्या प्रत्येक हालचाली पाहिल्या. त्या हालचाली त्यांच्या तोंडपाठ झाल्या होत्या. म्हणून त्यांना माझ्यातले बदल तातडीने कळायचे… त्यांना माझा राग, रुसवा, हसणं, फिरणं, कळायचं. ते मला सतत पावलापावलावर बोलायचे, “अनोळखी व्यक्तीशी बोलू नको, कोणी तुला चॉकलेट दिल तर खाऊ नको, आपल्या घरातल्या लोकांना सोडून कोणावर विश्वास ठेवू नको, तुला बाहेरचं कुणी काही बोललं तर मला येऊन सांग”पण या घरात आई वडील दोघे जॉब करता आणि सांभाळायला कुणी ठेवावं तर पालकांना आजी आजोबांकडे तिला ठेवायचं नाही म्हटल्यावर तिच्याकडे बघायला कोण उरतं? तो एकटा शेजारी… ? तो परपुरूष… मग तो शेजारी बनतो साप आणि एक, नाही दोन नाही सलग दहा ते पंधरा दिवस तो रोज तिचं लैंगिक शोषण करू लागतो. त्या चिमुरडीला या अवयवांचा वापर सुद्धा माहित नाही, अशा वयात तो धिप्पाड गिधड्या देहाचा मनुष्य तिच्यावर सतत अन्याय करत राहतो… तिचं रडणं रोज कोणी ऐकत नाही… अहो, शरीराच्या अवयवांची अजून वाढ सुद्धा झाली नाही ओ… काय वृत्ती ठेवताय डोक्यात? काय कसलं नेमकं समाधान होतंय हे अस काही करून? तुमच्या लिंगाचं? ज्याने आजपर्यंत ना जाणे कित्येक निष्पाप जीव घेतले.इथे जेवढा गुन्हा त्या उलट्या काळजाच्या शेजाऱ्याचा, त्याच पटीत आई वडिलांचा आहे. जेव्हा पोटात मुल वाढत असतं तेव्हा लग्न झालेल्या बायकोत आईचा जन्म होत असतो. नऊ महिन्यात त्या नव वधूत आई जन्मू लागते. पण इथे तर आई म्हणून मुलीला वाचवायचं सोडा, ना तिचं ऐकुन घेतलं जातंय. तिचा जन्म फक्त तेवढ्या रात्री पुरताच का? स्त्री म्हणून ती तिच्या जन्माचा अंश देऊन त्या जीवाला जन्म देते. पण तिचा अंश कुणीतरी नासवतोय, त्याची चिरफाड करतोय… आई म्हणून तिने लढायला नको का? आणि आई म्हणून ती लढली नाही तर बाप म्हणून त्याने उभं राहायला नको का? जर तिलाही नोकरी करायची आहे तर काही वर्ष तिने नोकरी करावी काही वर्ष ह्याने. पण याचा काही अंशी संबंध इथेही येतो की नवरा बायको म्हणून ते दोघे घरात कसे वागतात. आई वडील म्हणून नवरा बायकोत जे नातं असतं ना त्याचा परिणाम म्हणजे त्यांच्या मुलांवर झालेले संस्कार असतात. मुलांचा लहान वयात आई वडिलांवर सगळ्यात जास्त विश्वास असतो… त्यामुळे त्या दोघांनी जर त्यांच्या कामाच्या वेळा वाटून घेतल्या असत्या, एकाने चार वर्ष दुसऱ्याने चार वर्ष जॉब केला असता तर कदाचित त्या मुलीला चांगली, वाईट माणसं कळली असती. संस्कार झाले असते, तिची घडण झाली असती, तिच्या मनाला सुरक्षित वलय कळलं असतं. पण दोघेही नोकरीला जाऊन कोणत्या कुटुंबासाठी पैसे कमावत होते? जे कुटुंबच उरलं नाही…
ही भारतातली सत्य घटना आहे. आमच्या पिढीतील अनेकांचं लहानपण सुखाच गेलं, ते आमच्या पालकांच्या sacrifice मुळे. बाप कर्तापुरूष म्हणून घराबाहेर गेला तेव्हा आईने गृहिणी होऊन अनेक तडजोडी केल्या. मान्य आहे, त्या पिढीत फक्त नि फक्त आईला sacrifice करावं लागत होतं, तिने केलही. आताच्या पिढीत दोघांनाही स्वतःसाठी जगायचं आहे, हे कौतुकास्पद आहे. पण ती मुलगी कोण्या एकाची जबाबदारी आहे का?… या वयात दोघांनी तिला वेळ देणं, तिच्याशी बोलणं महत्त्वाचं आहे.
लक्षात ठेवा, पुन्हा चक्कर नको व्हायला म्हणून ऑफिसला जाताना फाईल, पैसे, महत्त्वाच्या गोष्टी न विसरता घेऊन मगच घराबाहेर पडतात. तसचं मुल होऊ देण्याच्या मिळून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करताना, रोज घरातून बाहेर पडताना तुमची मुलगी सुरक्षित आहे का याची खात्री करण्याची सुद्धा सवय करून घ्या… कारण पाकीट, पैसे, रुमाल यासाठी दुसरी चक्कर मारता येईलही. पण चिमुरडी एकदा कुणाच्या नजरेत भरली आणि तिच्याकडे दुर्लक्ष झालं तर सगळं संपलेलं असेल.
~ पूजा ढेरिंगे