जोडीदार तुमच्या लायक आहे का?

त्याचा, तिचा वाद होतो…
नाही म्हणत म्हणत खूप टोकाला जातो. प्रेम जपायच्या काळात ते कारणं देऊ लागतात. लग्न म्हटलं की आई वडिलांच्या शब्दापुढे जाणार नाही म्हणतो. पण त्या काळात समोर येतं त्याचं दुसऱ्या मुलीबरोबर चाललेलं प्रेम प्रकरण. यावर ती जाब विचारते, तो तिच्यावरच चिडतो. विश्वास, काळजी आणि इमोशनल शब्दांच्या गोजिर्या खोट्या परिकथेत तिला रमवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रेम असल्यामुळे ती हे सगळं ऐकून लगेच निघून जात नाही. ती रागावून शिव्या घालते. त्याला ते अपेक्षित असतं. कारण त्याच्या मनाला सत्य माहित असतं. सत्य कधीतरी समोर येणार असतं, याला गृहीत धरून तो आधीच दोघींना हॅण्डल करण्याचं प्लॅनिंग करतो. एकावेळी दोन व्यक्ती आयुष्यात असल्यावर त्या दोन्ही व्यक्तींना अनभिज्ञ ठेवून तो त्याचा कुलूप चावीचा खेळ सुरू करतो. एकदा एकीचा दरवाजा बंद तर, एकदा एकीचा उघडा. पण त्याला माहित नसतं, वादळाने वाजणारी दारं एकेक नाही तर एकाचवेळी वाजतात. त्यामुळे एक वादळ असं येतं, एकाचवेळी दोघींच्या दरवाजाच्या कड्या वाजतात. त्याचं प्लॅनिंग निकामी होतं. तो बुचकळ्यात पडतो. पण तरी त्याने या घटनेचा विचार आधीच केलेला असतो. तो दोघींना म्हणतो “मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तू कधी माझं व्यसन बनली आहेस मलाही कळलं नाही. मला तू सुद्धा हवी आहे पण मला दुसरी बरोबर रहावं लागेल.” तेव्हा त्याच्या कानामागे देऊन तिथून निघून जाण्याचा शहाणपणा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही त्याचे गुलाम झाले आहात समजून जा. कारण ही सुद्धा हवी आणि ती सुद्धा यात फक्त तो त्याच्या मनाला बिर्याणी, पुलावचे चोचले पुरवत राहतो. तुमच्या भावनांना तो फक्त “मला समजतंय ग तुला कसं वाटतंय किंवा माझ्याशिवाय तुला  कोण समजू शकतं” असे शब्द पेरतो. तेव्हा ठामपणे स्वतःच्या मनाला भविष्यकाळात न्यायचं आणि तिथे तुमचं भविष्य काय असेल याचा शांतपणे विचार करायचा. प्रेम आयुष्यभर टिकवायचं असेल तर भूतकाळातल्या गोष्टींवरून भविष्याचा अंदाज बांधायचा आणि दूरदृष्टी ठेवायची. अजिबात इमोशनल व्हायचं नाही… कारण आपल्याला वाटत असतं की आपल्याला याच्यापेक्षा योग्य कुणी मिळणारच नाही… त्याला आपण कळलो तेवढंच काय ते खरं! पण तसं नसतं. तो इथे नकळत त्याचा मार्ग सोपा करत असतो. कारण या नाजूक काळात आपली मनं गालावरच्या पुळी एवढी नाजूक झालेली असतात. आपण त्यामुळे ते सगळं करतो ज्याने तो आपल्या आयुष्यात राहील. त्याचा शब्द म्हणजे आज्ञा असल्याप्रमाणे वाहवत जातो. पण तो मात्र याची काळजी घेतो की त्या दोघीही आपला सोडून दुसरा कोणाचाच विचार सुद्धा करणार नाही.

शिवाय या दोन्ही प्रेम प्रकरणांचा आणि फसवणुकीचा त्या दोन्ही मुलींना थांगपत्ता लागू नाही म्हणून तो दोघींना सोशल मीडिया बंद करायला सांगतो. काही मुलं जीन्स घालू नको सांगतात, लिपस्टिक लावली म्हणून ओरडतात, मुलांबरोबर न बोलण्याची बंधनं घालतात. पण मुली कोणत्या हक्काने या अशा बिनडोक पोरांचं ऐकतात, हा प्रश्न जरी पडत असला तरी त्या मुलींना हा प्रश्न पडायला हवा, त्याचं सोशल मीडिया चालू असताना माझं सोशल मीडिया बंद का करायला लावत आहे? तो मुलींशी बोलत असताना मला बंधनं का? तो इतर मुलींच्या ट्रेण्डी मेकअपकडे बघून खुश होतो मग मला बंदी का?
आणि हे फालतू रेस्ट्रिक्शन टाकून तो कोणता हक्क दाखवत आहे?  थोडं स्वतःचं डोकं वापरा, उघडा… प्रेमात पडतात म्हणजे कोणाच्या हाताखालचे गुलाम होत नाही.
या जगात असंख्य मुलं सिंगल आहेत. तुमची निवड चुकू शकते हे तुम्हाला स्वीकारायला लागेल. प्रेम करणं चांगली गोष्ट आहेच, पण त्या प्रेमाने जर तुम्ही तुमचं अस्तित्व गमावत असाल आणि त्यातून शंभरवेळा तुम्हीच त्याच्यापुढे नमत असाल तर तुमचं प्रेम हा फक्त एकाच्या फायद्यासाठी, सोयीने केलेला व्यवहार आहे.
जर तुमचे घरचे तुम्हाला प्रेम करण्याची मुभा देताय तर तुम्ही त्यांनी ज्या विश्वासाने तुम्हाला घडवल आहे ते तोडण्याचं पाप करत असतात. तेही अशा व्यक्तीसाठी ज्याला तुमचा वापर फक्त त्याची तात्पुरती गरज भागवण्यासाठी करायचा आहे. आणि घरच्यांचं जाऊद्या, तुमचं मन तुम्हाला प्रेम करण्याचं स्वातंत्र्य देतय तर मनावर प्रेम करणाऱ्या त्या शरीराचं स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारी तुमची आहे.

प्रेम तुम्हाला डीग्निटी म्हणजेच प्रतिष्ठा देतं. तुम्ही स्वतःच्या प्रियकराकडे पाहून सुरक्षिततेच वलय अनुभवतात. ना की असुरक्षितता म्हणून तो सतत आपल्यापासून दूर जाईल या भितीत जगतात. कुणीतरी तुम्हाला एकदा एकटं सोडलं मान्य आहे, दुसऱ्यांदा खूप महत्त्वाची गोष्ट असेल मान्य आहे. पण तिसऱ्यांदा तुम्ही स्वतःला फसवून त्याला स्वीकारत असतात. शरीराची कोणताही अविश्वास, धोका आणि चुकीची गोष्ट पचवण्याची कमाल मर्यादा तीन पर्यंत असते. त्यांनतर तुमच्या मनाने घेतलेले असंख्य विचारांचे ओझे आणि दुःख शरीराला त्रासदायक ठरते. म्हणून प्रेमातून उठलेला व्यक्ती लवकर आयुष्यात आनंदी होत नाही. कारण मनाने केलेलं प्रेम आणि प्रेमात कितिदातरी मातीमोल केलेला स्वाभिमान शरीराला पुन्हा उठण्याचा आत्मविश्वासच देत नाही.
मान्य आहे, आपण खूप विश्वासाने एखाद्या व्यक्तीला आपलं सर्वस्व देऊन प्रेम केलेलं असतं. पण तुमचं शरीर आजही तुमचं आहे. ते तुमच्यासाठी श्वास घेतं, ते तुम्हाला पाहूनच जिवंत आहे… त्यामुळे ते शरीर आजही मनावर प्रेम करतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त विचार करता तेव्हा तुमचं अंग, डोकं दुखायला लागतं. आपल्याला शरीराचं काहीच पडलेलं नसतं. कारण शरीर प्रैक्टिकल असतं, मन भावनिक असतं. पण जगायला शरीर महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्या शरीरासाठी तुम्हाला स्वतःच्या नजरेत सक्षम असायला हवं. एखाद्याचा आधार घेणं एक बात पण केवळ आपला त्याच्यात जीव गुंतला म्हणून स्वतःचं अस्तित्व दान करणं तेही लायक नसलेल्या व्यक्तीकडे याला काहीच अर्थ नसतो.
कारण आज जर तू सवय आणि प्रेमाखातर त्याच्याकडे पुन्हा गेली तर तुला कुणीही त्याच्या गरजेसाठी वापरेल. तरुण वयात हे सगळं ठीके, पण पुढे लग्नाची जेव्हा गोष्ट येते तिथे हे आपली जागा अजून कोणाचीतरी आहे, हे मानसिक ओझं बनत जातं. त्यामुळे एवढच सांगेल, आज जर तू वाकली ना तर पुढे तुला प्रत्येकवेळी त्याच्यानुसार वागावं लागेल. या जगात अशा बऱ्याच मुली आहेत, ज्या मनावर ताबा न ठेवल्यामुळे स्वतःचं अस्तित्व हरवून बसल्या आहे. त्यामुळे योग्य वेळी आपली व्हॅल्यू, स्वाभिमान खूप जपायचा.

याव्यतिरिक्त आपल्या आयुष्यातली कला किंवा एखादा छंद जोपासायचा. कारण आपल्या स्वतःत खूप ताकद असते. एखाद्याने अस फसवल्यानंतर ऑफ कोर्स आठवण येते, त्रास होतो, स्वतःची चीड येते, आपल्यातच कमी आहे का काही? असे दुर्बोधक प्रश्न पडतात.  पण आपण या प्रश्नांना उत्तरं शोधायची नाही. त्यापेक्षा मन वळवून स्वतःच्या अस्तित्वावर आणि त्याच्यापासून दूर येण्याच्या निर्णयावर प्रेम करायचं.  त्याला सोडण्याचा निर्णय घेतल्याचा अभिमान वाटून घ्यायचा. प्रेम केलेल्या व्यक्तीला सोडणे धाडसाचं काम असतं. त्यामुळे स्वतःसाठी घेतलेल्या त्या निर्णयाला कुरवाळत मोठं व्हायचं. ती जखम तुम्हाला तुमचं नवं लायक आयुष्य बहाल करते. नवी सुरुवात करताना कधीच उशीर होत नसतो. त्यामुळे सुरुवातीला अवघड असलं तरी पुढे काही दिवसांनी आपल्या या प्रेमाच्या मुर्खपणावर आपणच जाऊन खूप हसतो. वेळ सगळ्या जखमा भरून काढतं. शेवटी एवढच लक्षात ठेवायचं, आपण कधीच कुणाच्या आयुष्यात दुसरा पर्याय म्हणून राहायचं नसतं. त्याने एकावेळी दोन आयुष्य खराब होत असतात.

टीप; हे लेखन सत्य घटनेवर आधारित आहे. गेल्या दोन दिवसापासून माझ्या संपर्कातील तीन मुलींनी मला या बद्दल सांगितलं आहे. त्यामुळे मुलींनो वेळीच जागे व्हा. तुमची किंमत तुम्ही करू नका आणि कोणाला करू देऊ नका.

  • पूजा ढेरिंगे
Please follow and like us:
error

1 thought on “जोडीदार तुमच्या लायक आहे का?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *