व्यक्ती तितक्या प्रवृत्ती…
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, मत आणि विचार वेगळा त्यामुळे वाद होणे हे अगदीच स्वाभाविक असते. परंतु आजकाल निव्वळ नावापुरतं ‘नातं टिकावं’ म्हणून कित्येक माणसं नात्याला प्रेमाचा मुखवटा घालतात नि त्यामुळे ते नातं एक नाटक बनतं. मग समोरच्या व्यक्तीबाबत कितीही राग, चीड, मनस्ताप होत असला तरीही ते नाटक जगावं किंवा अमुक अमुक व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे, म्हणून निभवावे लागते. त्यामुळे प्रत्येकवेळी आपण भांडण टाळतो खरं ! पण त्यावेळी ते भांडणं होणे इतके गरजेचे असते, की ते नाही झाले तर खरी भीती निर्माण होते, नाते तुटण्याची!
वादातली समस्या उलगडण्यासाठी ‘रागात माणूस खरं किंबहुना मनातले बोलून जातो’ हे विधान अगदीच उपयोगी पडते. पण त्यासाठी भांडणात ‘संवादही’ तितकाच गरजेचा असतो. जितक्या जास्त अहंकाराने आणि ‘मी’पणा ठेऊन भांडण होईल, तितके ताणत जाऊन नात्याची लवचिकता टोकाला जाऊन ते तुटण्याची शक्यता बळावते. त्यामुळे एकतर अहंकाराला पूर्णविराम देऊन भांडणाची सुरूवात करा नाहीतर, अहंकाराचा न्यूनगंड ठेऊन भांडण करूच नका.
भांडण करताना
दोन गोष्टी प्रचंड महत्वाच्या असतात, एक म्हणजे श्रवणकौशल्य (ऐकण्याची कला) म्हणजे समोरचा व्यक्ती
आपल्याबद्दल असलेली तक्रार सांगत आहे, तेव्हा ती तक्रार कोणताही अहंकार आडवा न आणता ऐकून घेणे. दुसरे
म्हणजे झालेल्या चुकांचा रवंथ करण्यात अर्थ नसतोच, त्यामुळे निघणार्या समस्यांवर तोडगा काढणे.
गैरसमाजाचे कुंपण दूर सारले की नात्यात सुपीकता अधिक वाढते. मीठ
जास्त झालं म्हणून कढी फेकून देण्यात अर्थ नसतोच नं… मग जर नातं खरच टिकवण्याची
इच्छा असेल नि ते नात हवंच असेल तर चर्चा करा, वादविवाद नाही. बोला जरूर, मग खुशाल हवी ती तडजोड करा, तिथे कमीपणा नसतो कारण नात्यात
स्वाभिमानापेक्षाही ‘समोरचा व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं महत्वाच असतं’ नि अशावेळी आपल्या नकळत खूप कोडी सुटतात नि
एक सॉरी, एक माफी ते
नात इतकं घट्ट करते की वाटतं, तेव्हा भांडलो नसतो तर कदाचित इतक सुंदर नातं, इतके सुंदर क्षण मिस झाले असते.
अर्थात त्या भांडणातील परिस्थिती तितकी स्पृहणीय नसते. परंतु हा भांडणाचा काळ खुऊप आपला नि आपुलकीचा असतो. आसवांचा समुद्र घळाघळा वाहतो, गैरसमजांच्या लाटाही उसळतात. परंतु या सगळ्यांमध्येही ‘कोणीतरी आहे या समुद्राला कवेत घेणार’ ही भावना खऊप आल्हाददायी नि ‘माझी’ असते.
मानसशास्त्रही सांगते, 70℅ नाती ही भांडणं न झाल्यामुळे तुटली आहेत. त्यामुळे दोन परस्परविरोधी व्यक्ती एकत्र आल्या म्हणजे भांडण होणं, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु यामध्ये 20℅ लोकांचा प्रॉब्लेम असतो, की समोरचा मला माझ्या दृष्टीने समजूच शकणार नाही तर उगाच का त्याच्याबरोबर बोलायच? 50℅ लोकांना खुप काही बोलून मोकळं व्हायचं असतं, पण समोरचा ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. पण 30℅ लोक ही अहंकाराने किंवा कमीपणा म्हणून बोलतच नाही.
थोडक्यात, समोरच्याला आपण कितपत कळतोय, आपल्या भावना कितपत समजतायेत हेसुद्धा आपणच
ठरवून मोकळे होतो नि ते नात हळूहळू गृहीत धरण्यात जमा होतं. नात्यातली पारदर्शकता
अदृश्य होते नि मग एकदा धूळ बसलेल्या नात्यावर कुणी फुंकर घालण्याचे कष्टही घेत
नाही. त्यामुळे योग्य वेळी, योग्य व्यक्तीसाठी, योग्य व्यक्तिसमोर नि योग्य कारणासाठी भांडण हे झालंच पाहिजे.
आणि अशाप्रकारे या वादानंतर कालपर्यंत गैरसमजांच्या इमारती
बांधणारी ती दोन व्यक्ती आज आपल्यालाच पारदर्शकता (ट्रान्स्परन्सी), निष्ठा (लाॅयल्टी), सामंजस्य, विश्वासुपणा या गोष्टी नात्याचा मूळ पाया असतो हे
समजवतात. मग एकदा का हा पाया भक्कम बसला म्हणजे त्या नात्याला कोणत्याच
अविश्वासाची वा शंकेची काजळी लागत नाही. थोडक्यात, प्रत्येकवेळी डेजर्ट खाण्यात मजा नसते. चटपटीत नि
भांडणाचा खुसखुशीत तडकाही महत्वाचा असतोच की-
“क्योंकि, झगड़ोंसे प्यार और रिश्तोंकी बुनियाद मजबूत
होती है ॥
मन चाहें उतना
लड़ लो, रोलों अपनों के साथ|
क्योंकि, परयोंके सामने रोने का वैसे भी कोई मतलब
नहीं होता ॥”