एकमेकांसाठी जगावं, लढावं आणि मिळून हसावं. स्वप्न पहावीत. खूप स्वप्न… गरिबीत पण साथ द्यावी, श्रीमंत झाल्यावर एकमेकांशी अजून घट्ट गट्टी जमवावी.
त्याने तिला राणी बनवायचे स्वप्न दाखवावे, तिने त्याच्या मेहनतीवर आणि स्वप्नांवर स्वच्छ विश्वास ठेवावा… इतकं सोप्पं असतं प्रेम! आदिवासी भागातल्या प्रेमात आणि आपल्या प्रेमात काय फरक असतो?
त्यांच्यात जात आडवी नसेल येत, कदाचित!
या दोन प्रेमाची तुलना करण्याचं कारण ‘जयभीम’ हा चित्रपट.
या चित्रपटातील सेंगानी आणि राजकन्नू यांची प्रेमकहाणी खूप वेगळी आहे. हा चित्रपट जितका जातीवाद हा मुद्दा दर्शवतो, तितकाच तो या दोघांच्या प्रेमाबद्दल सुद्धा बोलतो.
ही सेंगानी खूप प्रभावित करून जाते. तिचा स्वतंत्र विचार केला तर बंजारन म्हणून अभिमानाने आपल्या पतीशी आयुष्य वाटून घेणारी ती चित्रपटाच्या काही मिनिटांच्या कालावधीतच पोटुश्या अवस्थेत हरवलेल्या पतीच्या शोधात न्यायासाठी फिरतेय. तिचं पात्र इतकं प्रामाणिकपणे दर्शवल आहे, ज्यामुळे बऱ्याच नाजूक ठिकाणी डोळ्यात हलकं पाणी येतं. तिचा स्वाभिमान, तिची तिच्या पतीवर असलेली श्रद्धा तिला इतर स्त्रियांपेक्षा खूप उठावदार करून जाते. हे प्रेम एकतर्फी नसल्यामुळे याचा लहेजा खूप वेगळा फील देतो.
याचा प्रत्यय अशाच एका दृश्यात येतो. एके दिवशी ती दोघे वीटभट्टीचं काम करत असतात. एवढ्या गरिबीत आणि परिस्थितीची जाणीव असतानाही ते स्वतःच्या घराचं स्वप्न पाहतात आणि ते घर जेव्हा बनेल तेव्हा जोडायला ती एका विटेवर पतीच्या हाताचा छापा घेते. हा प्रसंग त्यांच्या काल्पनिक पण वास्तविक प्रेमाची छाप सोडून जाते. प्रेमात जोडीदाराची साथ असेल तर झोपडीही स्वर्ग वाटते. नाहीतर १२०० स्क्वेअर फुटाचं घर सुद्धा नरक वाटतो, याची प्रचिती सेंगानी आणि राजकन्नु यांच्या प्रेमातून येते. जेवढं प्रेम सेंगानी वाटून जाते तेवढंच प्रेम राजकन्नू त्याच्या कृतीतून दाखवत असतो. पण पतीच्या अचानक गायब होण्यामुळे ती हादरून जाते. ती त्याचा शोध घेणं थांबवत नाही.
तिचं लक्ष्य स्पष्ट असतं, तिला कायदेशीर मार्गाने तिचा पती हवा असतो. पण त्या एका आदिवासी स्त्रिमुळे व्यवस्थेतले अगणित किडे हळूहळू बाहेर येऊ लागतात. ही छुप्या जातीवादाची साखळी आणि व्यवस्थेच्या प्रतिष्ठेखाली लपवलेले गुन्हेगार वाढत चालले आहेत, हे ठळकपणे अधोरेखित करून न्यायाचा पाठपुरावा करण्यात हा चित्रपट कुठेच कमी पडला नाही. अचानक जाणीवही होते की, जर समाजातल्या प्रत्येक पीडितेला अशा पद्धतीने न्याय मिळाला तर खरंच गुन्हेगारी संपायला वेळ लागणार नाही.
चित्रपटात वकिलाची भूमिका करणाऱ्या सुरिया म्हणजेच ॲड. के. चंद्रूचा दोन अडीच तासांचा कोर्ट ड्रामा तर तारीफ करण्यासारखा आहे. परंतु मजबूत स्क्रिप्ट शिवाय हे शक्य नव्हतं. हा चित्रपट सतत नवे वळण घेत जातो आणि आधीच्यापेक्षा आताचे वळण अजून धारदार आणि धोकादायक होत जाते.
चित्रपटातले अनेक सीन थोडेफार का होईना मनोरंजक आणि नाट्यमय केलेले असणार. पण याच्या वास्तविक भिषणतेची कल्पना केली तर हा जीवघेणा डाव रोज कित्ती जीव घेत असेल? आणि या लोकांना कोणी वाली नसल्यामुळे सगळे त्यांच्यावर मोठ्या संख्येने चालून जात असतील.
अशावेळी म्हणावं वाटतं, काश सभी लोग ‘इंसान’ होते।
तो इंसाफ बेगुनाहों का होता, जात का नहीं।
रोजच्या जगात जगताना आपण रोज कोणाला तरी मरताना पाहू लागलो की संवेदना बोथट होत जातात. जर कचराकुंडी शेजारी राहायला लागलो तर नाकाला त्या वासाची सवय होत जाते. आपण निर्दयी आणि असंवेदनशील वागण्याची सवय करून घेतोय का ? आपला या आदिवासी बाया बापड्यांशी तसा संबंध येतही नाही. त्यांच्या समस्या मग अशाच एखाद्या चित्रपटातून बाहेर पडतात आणि कळतं जोपर्यंत सरकार आणि प्रशासनाला त्यांच्याकडून काही मिळत नाही तोपर्यंत त्यांना काही दिलं जात नाही.
या लोकांपर्यंत कला पोहोचली आहे. पण सरकार, प्रशासन पोहोचू शकलेलं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आपण त्यांनी निर्माण केलेली वारली चित्रकला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या किंमतीत आणि
आणि देशाची शान म्हणून विकतो. पण आजही त्यांच्यापर्यंत मूलभूत सोयी आणि हक्क पोहोचले नाहीयेत. याची कारणं चित्रपट पाहिल्यावर लक्षात येतात.
चित्रपटाला ‘जयभीम’ नाव दिलं यामुळे काहींनी हा चित्रपट उचलून धरला आणि काहींनी अक्षरशः दुर्लक्ष केले. पण असे चित्रपट दुर्लक्ष करून चालत नाही. जयभीम या अभिवादनाचा खरा अर्थ चित्रपटाच्या शेवटी एकदम साध्या सोप्या भाषेत समजावलं आहे. अनेक राज्यांत केवळ जातीवादामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व समजून घेतले जात नाही. पण हा त्यांचा वैयक्तिक लॉस आहे. वैचारिक आणि बौद्धिक पातळीवर दाद मिळणारे व्यक्तिमत्त्व खूप थोडके असतील. नाहीतर आपल्याकडे छुप्या जाती, धर्म, लिंग, कुळ आणि ना जाने अशा नगण्य निकषांमुळे अनेक प्रतिभावंत व्यक्ती मर्यादित लोकांपुरते, समुदायापुरतेच राहिले.
चित्रपट दाक्षिणात्य असल्यामुळे अर्थात तो चित्रपटाच्या सगळ्या चौकटीत तंतोतंत बसणारा आहे. या दरम्यान शिकता आलं ते, हेबियस कॉर्पस याचिका नेमकं काय असते. हाय कोर्टाचे कामकाज कशा पद्धतीने चालते.
चित्रपटात जसं व्यवस्थेचं चीड आणणारं, वेदनादायी, क्रूर रूप दाखवलं तसचं प्रकाश राज म्हणजेच पेरुमालस्वामी यांनी सच्चा पोलिसांच्या वर्दितून प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्यांचा मान कायम ठेवला आहे. हा चित्रपट जसा वाईट वृत्तीच्या लोकांचे पितळ उघडे पाडतो तसाच तो चांगल्या लोकांच्या मदतीचा सन्मान करतो. जसं सेंगानीच्या पतीच्या न्यायासाठी टीचर मिथ्राची मदत खूप गरजेची होती. कारण मिथ्रामुळे ती ऍड. के चंद्रुला भेटते. त्यामुळे जशी वाईट लोकांची साखळी बनते तशीच चांगल्या लोकांचीही साखळी असते. तिला जोडले जाणारे लोक वाढायला हवेत. सहज खाली बसलेल्याला हात देता येतो, बसमध्ये थकलेल्याला खांदा देता येतो. फक्त वृत्ती, कृती आणि हेतू प्रामाणिक असायला हवा.
चित्रपट संपण्याच्या काही मिनिट आधी सेंगानीची मुलगी वकील के. चंद्रूची नक्कल करत हातात वृत्तपत्र घेते, तो चित्रपटाचा शेवटचा सीन वेगळाच भाव खाऊन जातो. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द दिसू लागतात, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” गुलामीत जन्म झालेली पण शिक्षणाची सोबत मिळालेली आणि न्यायाचा विजय होताना बघणारी ती मुलगी मोठी होऊन शांत तर बसणार नाही, हे निश्चित!

बऱ्याचदा अशा विषयांना हात घालण्याचे धाडस कोणी करत नाही. याची कारणं लोकांसाठी ते विषय खूप संवेदनशील असतात. पण चित्रपट सामंजस्याने पाहिल्यावर लक्षात येतं की कोणाच्याही भावना न दुखवता मूळ मुद्द्याला हात घालणं या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला जमलं आहे.
- पूजा ढेरिंगे
व्waaah , super amazing