सात बायकांचा मुक्त झिम्मा!

  • by

मला पण एकदा असं सुटकेस सामानाबाहेर ओसंडून वाहत असताना त्याच्या बोकांडी बसून तिची चैन लावायची आहे. तो ट्रॅवलर बनण्याचा फील घ्यायचाय आणि बेधडक निघायचंय प्रवासाला. तसं हे ट्रेंडी स्वप्न आता तरुणाईच्या डोक्यात जम बसवू लागलं आहे. पण हा बदल खूप जास्त गरजेचा आहे. हे वाटण्याचं कारण म्हणजे झिम्मा हा चित्रपट!

हा चित्रपट आजही हाऊसफुल चालू आहे. कारण हा चित्रपट जेवढा सात बायकांच्या ट्रिपचा आहे, तितकाच तो प्रेक्षकांचा आहे. त्या सात बायकांमध्ये कॉमन काहीतरी आपल्या आयुष्याशी निगडीत सापडतच सापडतंय.
शिवाय आज, आताआतापर्यंत आणि यापुढेही बायकांच्या धांदल उडण्यावर, त्यांच्या प्रॉब्लेम्सवर आणि नवखेपणावर विनोदी पद्धतीने विचित्र ताशेरे ओढण्यात आले त्याला उत्तर हा चित्रपट आहे. असं उत्तर कोणी कोणाला देत नसतं, पण त्यांची कारणं काय असतात हे खूप मजेशीर पण सामंजस्याने चित्रपटात चित्रित करण्यात आली आहेत.
चित्रपटात खूप वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या बायका आहेत आणि त्यांचे कसे कुठूनतरी पूर्वजन्मीचे योग जुळून येतात देव जाणे! पण त्यामुळे त्या ट्रीपला निघतात. त्यांचं ट्रीपला निघणं हाच भारतीय मिडल क्लास लोकांसाठी शॉक असतो.
या ट्रिपमध्ये ७ वेगवेगळ्या बायका आहेत आणि सिद्धार्थ चांदेकर त्यांचा टूर गाईड म्हणजे चिकना इंग्लंडच … पण सकारात्मक पद्धतीने हां! त्याचं काम आणि त्याचा स्क्रिनवरचा प्रेजेंस मला आवडतो. ही त्याच्या नव्याने स्थापन केलेल्या कंपनीची पहिलीच इंटरनॅशनल ट्रीप. तीही सगळ्या बायकांना घेऊन. हल्ली अनेक ट्रॅव्हल कंपन्या वुमन स्पेशल टूर्स ऑर्गनाईज करतात. पण तो फील आपल्याला नाही ना घेता येत. तो या चित्रपटातून घेता येतो.
सात बायकांचा मुक्त झिम्मा!
झिम्मा पाहण्याची खरी मजा येते जेव्हा बायकांचा सायलेन्स इथे तुटतो. आवाज मुक्त होतात. शरीरातल्या प्रत्येक कोपऱ्यात इतकी वर्षे अडकलेले रडू कोसळून जाते. त्यांच्या आयुष्याचे प्रवास जसे सुटे होतात ना आपल्याला कुठेतरी आपल्या वाट्याला आलेले प्रसंग आठवत जातात. आपण प्रेक्षक म्हणून त्यांचे होत जातो.
त्या सातही बायकांच्या अव्यक्ततेला सुंदर मोकळेपणा मिळतो, तो अनुभवणे कमाल आहे. प्रत्येक पिढीतली स्त्री यात आहे.  त्यामुळे तुम्हाला चित्रपट बघताना एकटं वाटत नाही. शिवाय कुठलीच पिढी वाईट नसते याचा अनुभव हा चित्रपट देतो. कोणाला कोणाचा कधी आधार मिळेल ते बघणं तर ट्रीट आहे खरी!
पण दहा दिवसांच्या या प्रवासात पहिल्या दिवशी मात्र प्रत्येकीच्या डोक्यात आयुष्याचे, रोजच्या कामाचे बॅकअप उरतात, म्हणून त्या त्यांच्या आयुष्यातल्या गोंधळातून सुटत नाहीत. पण जेव्हा सुटतात तेव्हा त्यांना नवं काहीतरी सापडतं, ते म्हणजे त्यांचं स्वतःचं अस्तित्व!

“प्रवास माणसाला नवा जन्म देत असतो!” या वाक्याला आयुष्यभर अधोरेखित करून ठेवा. कारण खरंच या वाक्यात इतकी ताकद आहे. प्रवासात भेटणारी अनोळखी माणसं, अनोळखी शहरं, नवा निसर्ग, नव्या शहर रचना, नवं खाद्य हे नवं असल्यामुळे प्रचंड ऊर्जा आणि इंस्पिरेशन देतं. आपल्या प्रश्नांची, प्रॉब्लेम्सची उत्तरेही देतं, तेही न विचारता आणि न लादता!

अनोळखी माणसात माणूस स्वतःच्या प्रॉब्लेमला विसरतो. आपल्या भारतीय लोकांच्या बाबतीत शंभराहून नव्वद प्रॉब्लेम्स हे कौटुंबिक आणि भावनिक आहेत. त्यामुळे या प्रवासात भारतीय नात्यांची गुंतागुंत सुटत जाते. ते पाहताना कधीकधी डोळ्यातून हलकेसे पाणी येतं. अनेक संवाद तसे आहेत पण त्यातल्या त्यात ज्यावेळी निर्मला म्हणजेच निर्मिती सावंत चांदेकरबरोबर सहजच बोलत असतात की, तुझे कुटुंब नाही आले का कधी इंग्लंडला? त्यावर तो म्हणतो, त्यांना नाही आवडत. तेव्हा ती विचारते, तू विचारलं त्यांना? यावर तो म्हणतो, मी ओळखतो ना त्यांना… बऱ्याचदा आपल्याला वाटतं आपण त्यांना ओळखतो. पण हे त्यांचे निर्णय आपण का ठरवावे?
याच संवादात निर्मिती सावंत त्याला म्हणतात,
“आई आज आहे, उद्या ती नसेल आणि तेव्हा ती नसेलच. मग आपण कितीही कुल्ले आपटले तरी ती येत नाही.” हे वाक्य आरपार जातं. आईसोबत चित्रपट बघताना अजूनच जास्त पापण्या ओल्या होतात. 

मध्यंतरानंतर प्रत्येकजण वेगळी दिसायला लागते. कारण तोपर्यंत आपल्याला प्रत्येकीची ओळख झालेली असते. तेव्हा हळूहळू लक्षात येतं की, त्यांनी त्यांच्याबद्दल निर्माण केलेले मनातले सगळे न्यूनगंड दूर व्हायला सुरुवात झाली आहे. त्यांना स्वतःच स्वतःसाठी बनवलेले मतं, गृहितक किती पोकळ असतात याचा रिॲलिटी चेक मिळायला सुरुवात झाली आहे.

चित्रपट पाहिल्यावर वाटते, जन्म झाल्यानंतर प्रत्येकाला आयुष्यात प्रवास अनिवार्य करावा. जेणेकरून जीवघेणे डिप्रेशन, माथेफिरू खून, गुंडगिरी, कौटुंबिक दबाव, हिंसा या गुन्ह्यांवर खरंच नियंत्रण लागेल. जोपर्यंत माणूस स्वतःच्या सानिध्यात येत नाही तोपर्यंत असा भरकटल्यासारखं वागत राहतो. प्रवास आपल्यातले घाव भरून काढतो.

खरं सांगू तर या चित्रपटाबद्दल लिहिण्यापेक्षा तो जास्त अनुभवण्याचा चित्रपट आहे. प्रत्येक बाईला हा चित्रपट पाहताना नवा हुरूप येईल आणि पुरुषांना चित्रपट पाहताना आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांना ओळखणे खूप सोपं जाईल आणि मूळ म्हणजे आवडायला लागेल… ज्यावेळी पुरुषाला बाईतले लहान मूल सापडते त्याक्षणी तो तिला जपू लागतो. या चित्रपटाच्या प्रवासात प्रत्येक बाईतले लहान मूल कसं बागडू शकतं याचं चलचित्र दाखवणारी ही कथा आहे.

बऱ्याचदा जाचाला कंटाळून बाई बंडखोर होते. पण तिने बंडखोर होण्यापेक्षा मुक्त व्हावं. तिच्या त्या मोकळ्या श्र्वासांत वावरणे हा तिचा दागिना असतो, जो तिला अजून लोभस बनवत जातो.
कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणारे पुरुषही अधेमध्ये ब्रेक घेत असतात. बायकांना हा ब्रेक मिळायला हवा. जर तो तिला कळत नसेल तर आपण जाणीव करून द्यायला हवी. कधी कधी आपल्याला स्पेस हवी आहे, ब्रेक हवा आहे हे खूप नकारात्मक दृष्टीने घेतलं जातं. पण प्रवासातून मिळणारं समाधान, ऊर्जा कुठेच मिळणार नाही. असं केलं नाहीतर आजपर्यंत घडत आले तसे आपल्या आयुष्यातली स्त्री आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पूर्णच हरून गेलेली दिसत राहते.
नकळत अनेक विषयांना हा चित्रपट हात घालतो. बाई म्हटलं की तिच्या अवतीभोवती फिरणारे सगळं जगच येतं. ते यातही दिसून येतं.

यातली गाणी खूप फ्रेश आणि हॅपी आहेत. झिम्मा टायटल ट्रॅकवर तर पाय आणि मान नुसती थिरकत राहते. शेवटच्या अलविदा गाण्याबद्दल तर मी उगाच म्हणावं तशी इमोशनल होऊन जाते. इथे संगीतकार खरा जिंकतो.
काही बाबतीत एकदम मिळमिळीत वरण भात साजूक तूप असला तरी मसालेदार चित्रपट आहे. फक्त सोनालीची आई म्हणजेच सुचित्रा बांदेकर आणि रमा शहा म्हणजेच मृण्मयी गोडबोले यांची पात्रे हवी तशी खुलली नाही, अशी हुरहूर मनात राहिली. म्हणजे प्रवासानंतरही त्यांच्यात न झालेला बदल कदाचित मला खटकला असेल. पण ते माझं वैयक्तिक मत. पण एवढ्या सगळ्या प्रवासाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे पैसा आणि याबद्दल चित्रपट काही बोललाच नाही. जोक्स अपार्ट… पण, आपण आयुष्याची गुंतवणूक करून आयुष्याला एक उबदार मिठी म्हणून एकतरी प्रवास आयुष्यात करायला हवा. 

-पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *