कामयाब; तुम्ही आहात का?

  • by

एक आगळी वेगळी फिल्म पाहिली. चित्रपटाचा सेट त्या काळात घेऊन जाणारा होता. जुने फिल्मचे शूटिंग सेट, मुंबईतील जुने फ्लॅट, रीलेट होणारी विचारसरणी आणि आयुष्यातील काही सत्य, या सगळ्यांना एकत्रित बांधणारी ही फिल्म होती. वेगळा कंटेंट असेल तर फिल्म बघायला मज्जा येते.
आपलं वर्तुळ आपल्याला वाटतं आपल आहे. हे घर, हे आयुष्य, त्यातली स्वप्न, भावना… या सगळ्यांना एखाद्या खोलीत पसरवून बसलो ना हाती आपल अस काहीच येणार नाही. स्वतःच्या श्र्वासांशिवाय…
तरी धडपड करून मला नंबर वनला राहायचं आहे. माझी स्पर्धा इतकी महत्त्वाची आहे की त्यापुढे श्वासही दुय्यम आहेत. तरी मी म्हणून सांगते, माणूस म्हणून आपण कुठे चुकत नाही. माणसाचा जन्म जेव्हा विचारशील प्राणी म्हणून घोषित झाला, त्यालगत त्याला जोडून स्पर्धेची चढाओढ आली.

आताचा, या क्षणाचा ट्रेण्ड दुसऱ्या क्षणी बदलतो.
पूर्वी एखाद्या घटनेला भूतकाळ म्हणायला एक वर्षाचा काळ लागायचा. आज दुसऱ्या सेकंदाला बदलणारं जग सतत संक्रमणात (transition) जगते.
कान आणि डोळे एक सेकंद बंद केले तरी तुम्ही जगाच्या एक पाऊल मागे येतात…
ही सतत जगाच्या ‘आयुष्यात’ येण्याची भीती केवळ एक मृगजळ आहे. तुम्ही जगाच्या आयुष्यात स्वतःला टॉप वर ठेवण्याचा कितीही प्रयत्न करा, तिथे तुमच्या सारखे जीव लाखोंनी आहे. प्रत्येकाला हा टॉपचा अधिकार आणि हक्क आहे.
त्यात मला सगळ्यांनी ओळखावं, किंवा माझे काम एखाद्या पेक्षा कित्ती पटीने वरचढ, या बाबत स्वतःचे परिमाण काढून तसा आदर जगाकडून अपेक्षित करणं म्हणजे स्वतःला खोट्या सांत्वनाच्या भपक्यात ठेवण्यासारख आहे. याला कधीही बाहेरून तडा जाऊन आतला व्यक्ती फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरचा कुणी तोडू शकेल, एवढ्या गैरसमजात आपण राहायचं नसतं. काही सत्य स्वीकारावी लागतात.
काही वेळेनुसार, काही वयानुसार…
सुधीर (संजय मिश्रा) यांची कामयाब; हर किस्से के हिस्से या फिल्मची कहाणी या विचारांशी मेळ साधते. सायलेंट कॉमेडियन आणि विनोदी सटायर म्हणून ओळख असलेले संजय मिश्रा या चित्रपटात आणि खऱ्या आयुष्यात एक ज्येष्ठ कलाकार आहे. दोन तासांच्या चित्रपटाची साधी स्टोरी लाईन आहे, नियोजित सेवानिवृत्ती घेऊन करीयरला विराम दिलेल्या अभिनेत्याला एका मुलाखती दरम्यान जाणीव होते की, आजपर्यंत कारकिर्दीत आपण ४९९ चित्रपटात काम केले. त्यामुळे एक शेवटचा ब्लॉकबस्टर 500 वा चित्रपट पूर्ण करण्याचा बेत आखुन हा अभिनेता पुन्हा कामाच्या शोधात निघतो. त्यांनी ज्या जमान्यात हे चित्रपट केले तो काळ मेलोड्रामा आणि ऐतिहासिक सिनेमे बनवण्याचा काळ होता. जिथे एक्स्ट्रा म्हणजेच आजचे साईड रोल नावाने ओळखले जाणारे पात्र, यांना विशेष आदराचे स्थान नव्हते. त्या काळात पडद्यावर बारीक सारीक भूमिकांतून काम केलेले सुधीर त्यांच्या समकालीन प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेले आहे. करीयर घडवताना त्यांनी केवळ कामावर लक्ष दिलं आणि आता म्हातारं होण्याच्या वयात त्यांनी म्हातारपण स्वीकारलं. अशा दृष्टिकोनातून ही कथा सुरू होते. ते म्हातारपणात रमले याचा प्रत्यय सिनेमाच्या सुरुवातीलाच येतो. पॉप्युलर साईट IMDb बद्दल सुधीर नामक या साईड अॅक्टरला कल्पना नसते, तो त्याच्या म्हातारपणाबरोबर अनेक गोष्टी करणं बंद झालेला असतो. त्यामुळे सिनेमाची सुरुवात करताना घेत असलेल्या एका मुलाखतीत संवाद आहे, साईड रोल करणारी पात्र ही नेहमी बटाट्यासारखी बनून राहतात. त्यांची गरज सगळ्यांना असते, पण त्यांची स्वतंत्र ओळख नसते. त्यामुळे त्यांनी काम केलेले सिनेमे आणि ज्या काळात सिनेमात रोल केले तेव्हा सिनेमांचा काउन्ट ठेवावा, इतका मान मनोरंजन सृष्टीला नव्हता. त्यामुळे तारुण्यात काम करून एका फ्लॅटमध्ये आपलं बस्तान बसवून म्हातरपणीचे दिवस कधी संपतील या विचारात हताश झालेला हा कलाकार असतो. पण त्याला ओळखणारी पिढी जेव्हा त्याच्याकडे येते, तेव्हा खरा चित्रपट सुरू होतो.

चित्रपटाचा स्पोईलर सांगणार नाही, कारण चित्रपटाची जुळवणुक खूप सुंदर आहे. फक्त एका सिनवर बोलेल जिथे चित्रपट थांबतो. जिथे कित्येक कलाकारांचे खरे आयुष्य थांबते. कुणीतरी नवा चेहरा येतो आणि खूप सहज तुमचा हक्काचा प्रेक्षकवर्ग त्याला मिठीत घेतो. याचं निरीक्षण सुधीर करत असतो. त्याला आताच्या पिढीतील हिरो, हिरोईनचे नखरे, वॅनिटी, दर मिनिटाला टच अप साठी येणारा मेकअप मॅन, उन्हात छत्री पकडायला एक माणूस हे सगळं पाहून कुतूहल वाटत असतं. एकीकडे हा रोब आणि दुसरीकडे काळाआड गेलेले सुधीर सारखे पात्र.
एकदा सुधिरच्या नातीच्या शाळेत नृत्यस्पर्धा असते. ५०० वा रोल करण्यासाठी धडपड करावी की नातीच्या शाळेत जावं या दुविधेतून त्याला त्याच्या आयुष्याचं गमक कळतं, आणि तो नातीच्या शाळेत जाणे निवडतो… तिथे प्रमुख पाहुणे म्हणून येणारा नवोदित ट्रेण्डी अॅक्टर पोहोचायला उशीर होतो, त्यामुळे वाट पाहून पालक आणि मुले वैतागतात. चिडचिड आणि संताप करणाऱ्या पालकांना पाहून शाळेच्या मुख्याध्यापिका सुधीरला त्याच्या अभिनयाची आठवण करून देऊन स्टेजवर ठरलेला अॅक्टर येईपर्यंत मनोरंजन करायला लावतात. खूप आग्रहानंतर सुधीर व्यासपीठावर येतो…
आणि तिथे जो आयुष्याचा जीवनपट साकारत पालकांना आणि चिमुकल्यांना हसवतो, हे मनोरंजन म्हणून खूप रोचक वाटतं. पण स्टेजवरच्या सुधीरच्या मनाची कल्पना केली तर, तो अॅक्टर म्हणून स्टेजच्या स्वाधीन झालेला असतो. शेवटचा परफॉर्मन्स म्हणून तो स्वतःसाठी शेवटचं सादरीकरण करतो, जिथे त्याला तो स्वतः शरण जाऊन पूर्णविराम देण्याकडे प्रस्थान करताना दिसतो. यावेळी संजय मिश्रा यांचा अभिनय अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाही. त्या क्षणी तुम्ही त्या सिनेमाचे झालेले असतात, त्या दृश्यामागची म्युुुजिक तुम्हाला सुधीर उलगडून सांगते.

पण लागलीच तिथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेल्या नव्या कलाकाराची एन्ट्री होते, तसा प्रेक्षक सुधीरला विसरून त्याच्याकडे वळतो. ही विसंगती तुम्हाला जगाची रीत सांगेल.

चित्रपटात विजू खोटे, गुड्डी मारुती, अनिल नागराथ, अवतार गिल हे आजच्या घडीला पडद्यावर कमी दिसणाऱ्या पात्रांची ही खऱ्या आयुष्यातली कथा वाटते. वो भी एक दौर था जहां खलनायक एक नायक था। आणि त्यात हा डायलॉग, जेेव्हा तिथला नव्या पिढीतील कलाकार त्याला म्हणतो, एक ऑटोग्राफ मिलेगा सर?
अरे एक क्यों चार पाच दूंगा,
सेल्फि के जमाने में ऑटोग्राफ मांग रहे हो,
वो भी हीरो का नहीं कलाकार का।

संजू किंवा फॅन हे सेल्फ ओरिएंटेड चित्रपट केवळ अटेंशन पुरते मर्यादित राहतात. ज्याने दोन चाहत्यांच्या चर्चेत अजून एक चित्रपट जोडला जावा एवढा हेतू साध्य होतो.. पण कामयाब असेल, द डर्टी पिक्चर असेल यातून या लोकांच्या आतली घुसमट काही अंशी पडद्यावर येते. बऱ्याचदा पेपरमध्ये, आता सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक जुन्या कलाकारांची खबरबात कानावर  येते की, आर्थिक परिस्थिती बेताची, जाणून घ्या कुठे राहते मशहूर चित्रपटातील ही हिरोईन किंवा एके काळचे मुलींच्या हृदयाची धडकन असलेल्या हिरोची व्यथा … किंवा ताजी घटना असलेली सुशांतची आत्महत्या.
या अशा बातम्यांमध्ये कॉमन गोष्ट एकच असते, आज ते सुपरस्टार असतात, उद्याची त्यांना भीती असते. मिश्रा त्यांच्या एका मुलाखतीत म्हटले होते, आता मला कळतंय हेम्लेट किंवा इतर पात्र साकारताना कलकर हे डिप्रेशनमध्ये का जातात. कारण माझ्या अनुभवावरून वेगवेगळ्या चित्रपटात वेगवेगळे पात्र साकारत असताना तुम्हाला त्या पात्राचं व्हावं लागतं. पूर्ण जीव ओतून अभिनय करायचा म्हणजे ते पात्र कितीही निगेटीव्ह, पॉजिटीव्ह असो, ते आतमध्ये अनुभवून त्याची तयारी करून मग पडद्यावर साकारावे लागते आणि सतत पात्र बदलून अभिनय करताना खरं आयुष्य एक खेळ वाटू लागतो. चित्रपटांमध्ये स्क्रिप्ट असते, खरं आयुष्य जगणं खुप खडतर जातं. हे सत्य एक माणूस म्हणून पचवणे खूप कठीण असतं.
त्यामुळे या रोजच्या बदलत्या काळात तुम्हाला एकाजागी साचून चालत नाही. रोजचे दुनियेत होणारे बदल तुम्हाला स्वीकारावे लागतातच. तुम्ही कितीही महान असाल तरीही दुनियेच्या नियमापासून गत्यंतर नाही कारण जे थांबले, ते संपल्यात जमा होऊन जातात. कुणी दखल घेण्याची तसदी घेत नाही.
धोंडू जस्ट चील, म्हणत कामयाबीला कसं हाताळावे हे सांगणारा हा चित्रपट आहे. संजय मिश्रा यांनी सादर केलेला साईड रोलमधील कलाकार पडदा पडल्यानंतरसुध्दा नव्या पिढीच्या आठवणीत राहत असेल तर चित्रपटांचे प्लॉट बदलून हळूहळू चित्रपट सृष्टी योग्य दिशेने जात आहे, म्हणायला हरकत नाही.
शेवटी कामयाबी मिळणार आहे, ती हाताळता आली पाहिजे, तिला योग्यवेळी विराम देता आला पाहिजे. कारण कितीही काही होवो शेवटी तुमची जागा घेणारा कलाकार तयार होत असतो. भ्रमाचा भोपळा कुणीतरी बाहेरून फोडण्यापेक्षा काही सत्य स्वीकारून आयुष्य सोप करायचं असतं कारण,
एन्जॉयिंग लाईफ और ऑप्शन हैं क्या?

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *