महाराष्ट्र कशासाठी प्रसिद्ध हे ग्लॅमरस पद्धतीनेच दाखवण्याची गरज नसते. जे जसं आहे तेवढं आणि तितकं वास्तविक दाखवलं तर तो चित्रपट क्लास आणि मास या दोघांसाठी महत्त्वाचा ठरतो. हे आपल्याकडे जोगवा, नटरंग, पिकासो अशा मराठी चित्रपटांनी दाखवून दिले आहे.
आपली परंपरा, त्यातल्या अंधश्रद्धा, कथा, लोककला, तिथल्या माणसांचा विश्वास कलात्मकरित्या प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचवायचा याचे गुपित ‘ कांतारा’ Kantara मनात सांगून जातो. त्यामुळेच तो सगळ्यांना गुंतवून ठेवतो.
दाक्षिणात्य लोककला असली तरीही महाराष्ट्रात तिला इतकं उचलून घेतलं जातं हीच तर मनोरंजन माध्यमाची ताकद आहे. ही त्या अभिनयातली ताकद आहे. एखादा रोल एखाद्या अभिनेत्यासाठी बनलेला असतो, तसा हा चित्रपट रिषभ शेट्टीचा आहे.
कथेत लोककलेचे सादरीकरण यापूर्वीही अनेकवेळा चित्रपटांतून झाले आहे. पण ‘अभिनय’ हा ‘कांतारा’चा आत्मा आहे. पूर्ण चित्रपट पाहून झाल्यानंतर सतत आठवतात ते त्याचे डोळे, तो मेकप आणि शिवा! जबरदस्त! पॉवरफुल पॅकेज !
दैव या विश्वासावर आधारलेला हा सिनेमा! चित्रपटाच्या कथेतील बहुतांश भाग स्थानिक कलेवर आणि त्यांच्या विश्वासावर अवलंबून आहे. आपण त्यांच्या त्या विश्वासावर विश्वास ठेवला की चित्रपट आपला वाटू लागतो.
पूर्वापार चालू असलेली परंपरा आणि त्याचा पाठपुरावा, त्यामागचे खरं, खोटं. श्रद्धा, अंधश्रद्धा. या सगळ्यामुळे कोकणातील कानावर पडणाऱ्या मौखिक कथांची आठवण येते. त्याला थोडंसं कांताराशी जुळवण्याचा प्रयत्न केला जातो.
प्रत्येक शॉट शुट करताना त्यांनी केलेलं डिटेल काम प्रेक्षकांना जवळ करतं. दाक्षिणात्य सिनेमे हे नेहमी या गोष्टीमुळे प्रेक्षकांच्या मनात छाप सोडून जातात. त्यांची कामाप्रती प्रामाणिकता नेहमीच त्यांच्या बारकाव्यातून दिसून येते.
या सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे कोविड काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात सिनेमे पाहिले. त्यातून दक्षिणात्य सिनेमांनी ९६, डियर कॉम्रेड, प्रेमम् यासारख्या नाजूक विषय हाताळून प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला. त्यातून नकळत चांगल्या, वाईट सिनेमांची पारख करता येऊ लागली, तुलना करता येऊ लागली. त्यामुळे ‘सिनेमा शिक्षित प्रेक्षकवर्ग’ निर्माण होऊ लागला आहे. यात दाक्षिणात्य सिनेमांनी बाजी मारली. पूर्वीही यासारखे किंवा याहून दर्जेदार सिनेमे निर्माण झाले. पण प्रेक्षकांच्या अज्ञानामुळे ते सिनेमे एकतर सिनेमा प्रेमींनी युट्यूबवर किंवा टीव्हीवर पाहिले. तर काही सिनेमे त्या त्या काळात थिएटरवर आले ते अजूनही युटुबवर रेंटवर मिळतात आणि काही सिनेमे तर मोठमोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आजही उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे उत्तम सिनेमा आणि प्रेक्षक या दोघांची चुकामूक झाली नाही तर त्या सिनेमाचं भाग्य उजळतं. कांताराची वेळ योग्य होती आणि त्याला सोबत मिळाली ती पब्लिसिटीमधल्या सगळ्यात उत्तम प्रकारची, ती म्हणजे माऊथ पब्लिसिटीची. उत्तम कलाकृती उत्तम पब्लिसिटीमुळे अपेक्षेपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचली, ती रोज हाऊसफुल आहे.
यांच्या सिनेमांची अजून एक खासियत म्हणजे आपल्या इथे काळया रंगाला वाळीत टाकले जाते. पण ते लोक काळया रंगाच्या लोकांना मुख्य भूमिकेत घेऊन रंग, रूप पाहण्यापेक्षा अभिनयाकडे लक्ष खेचून घेण्यास मजबूर करतात. तसेच एवढ्या भव्य दिव्य चित्रपटासाठी अनेक लोकांची गरज असते. त्या मॅन पॉवरमुळे अनेकांच्या हाताला काम आणि कामातून कलेला स्पर्श करण्याची संधी मिळते.
याशिवाय कांताराच्या सुरुवातीलाच चिखलातल्या लढाईचा सीन एंगेजींग असल्यामुळे तिथूनच शिवा माझ्यासारख्या अनेक प्रेक्षकांची मनं जिंकतो. गेल्या काही वर्षांपासून प्रशासनातील फोलपणा, जातीमुळे केला जाणारा भेद, उच्च वर्गीय लोकांची गुलामी याचे वास्तविक रूप दाखवून देण्याचे ब्रह्मास्त्र दाक्षिणात्य सिनेमे ताकदीने पेलत आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने कॅमेरा अँगल लावून हे चित्रीकरण केलं जातं त्याने तो सिनेमा आकर्षक तर वाटतोच पण वास्तविक आयुष्यात जगण्याचं बळ देतो. कथा, गुढता, रहस्य, विनोद, चातुर्य, खराखुरा अभिनय, संगीत आणि उत्तम मेसेज याचं संपूर्ण पॅकेज कांतारात अनुभवायला मिळतं. कुठलाच व्यक्ती बोर होत नाही, किंवा थिएटरमध्ये आलेले लहान बाळं रडण्याचे आवाज येत नाहीत. दाक्षिणात्य सिनेमे सर्वसमावेशक बनवले जातात. प्रत्येक प्रेक्षकातील कॉमन इंटरेस्टला धरून एक सुसंगत अनुभव प्रेक्षकांसमोर मेजवानी म्हणून सादर केला जातो.
गावातले ठरकी लोकं नसते तर ज्या स्त्रियांची खरंच लैंगिक भूक भागत नाही त्यांना कोण वाली राहिला असता असे रामाप्पाला पाहिलं की वाटतं! प्रत्येक स्त्रिच्या गरजा वेगळ्या असतात. त्या गरजांपैकी शारिरीक गरज कशी पुरुषांची तशीच स्त्रियांची असते. मग ती स्वीकारून त्या कोणाशीच प्रतारणा न करता हा अनुभव घेत असतील तर त्यात वावगे काहीच नाही.
या सगळ्या प्रश्नांच्या पुढे चित्रपट सुरू असतो. याचे मूळ अंधश्रद्धा या विषयावर भाष्य करणारं आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या अंधश्रद्धेचा उगम होतो तेव्हा त्याचं मूळ शोधायला जातो तेव्हा लक्षात येतं, याचं मूळ कारण लोक विसरले आणि याला केवळ एक बंधन म्हणून स्वीकारले गेले आहे. पण चित्रपटात ही अंधश्रद्धा आदिवासी लोकांची देवाप्रती असलेली श्रद्धा आणि त्याचे हळूहळू उत्सवात केलेलं रूपांतर या भोवती फिरणारी आहे.
नास्तिक लोक नेहमी म्हणतात, देव कुणी पाहिला नाही मग हात का जोडायचे?
पण कांताराच्या शेवटच्या दृश्यात ज्यावेळी शिवामध्ये दैव येतो तेव्हाचा अभिनय पाहून आपसूक हात जोडले जातात. तेव्हा वाटतं, जिथे आपण आतल्या आत हळहळलो, माणूस म्हणून जिवंत वाटू लागलो त्या सगळ्यात देव आहे. पण लोकांच्या या विश्वासाला नावावर पूर्वापार चालणाऱ्या अंधश्रध्देचा गैरवापर घेणाऱ्या एका राक्षसाचा जन्म प्रत्येक पिढीत होतो. पण जिथे असे राक्षस अन्याय करू लागतात आणि अन्यायाची परिसीमा गाठतात तिथे दैव जन्म घेतं, असं कांतारा सांगतो. म्हणजेच जिथे जिथे दुष्ट प्रवृत्ती जन्म घेते, तिथे तिथे तिचा नाश करणारी चांगली प्रवृत्ती जन्म घेते.
शेवटास आलेल्या चित्रपटात शिवाच्या अंगात दैव येणं हा सीन तर अक्षरशः अंगावर काटा आणतो. काय ती अक्टिंग, काय ती एनर्जी आणि काय ते त्या पात्रासाठी वाहून घेणं! निशब्द होऊन आपण त्या चित्रपटाला सरेंडर केलेलं असतं. चित्रपट हा बऱ्याचदा अजाणते होऊन पाहायचा असतो, तर त्यातला स्वाद कळतो.
याशिवाय क्लायमॅक्सवेळी जेव्हा शिवा बदला घेण्यासाठी तलवारीला धार देण्यासाठी थांबतो, तेव्हाचा ट्विस्ट आणि तिथल्या फायटिंगच्या मागे दिलेला music score ने तर अजब लेव्हलला कनेक्ट होतो..
कांतारा खूप सोपी गोष्ट सांगतो, जसं आपल्यासाठी आपले घर महत्त्वाचे, तसे आदिवासी लोकांचे घर जंगल आहे. त्यांच्या घरावर कुणी राज्य करू पाहिलं तर ते हिंसात्मक होणारच! त्यामुळे जंगल आणि जमिनी या दोन प्रॅक्टिकल गोष्टींना अंधश्रद्धा या संवेदनशील गोष्टीचा संबंध लावून चित्रपटाने दोन्ही प्रेक्षकांना खुश केलं आहे.
प्रत्येक कला काहीतरी प्रेरणा देते, कथा सांगते, लोकांना एकत्र आणते. कांतारा त्याचीच गोष्ट आहे. लोकांची गोष्ट आहे, न्यायाची गोष्ट आहे, परंपरेची गोष्ट आहे. लोककला जिवंत ठेवण्याची गोष्ट आणि धडपड आहे.
हा अनुभव घेण्यासाठी सिनेमा ओटिटीवर येण्याची वाट पाहू नका. थिएटरमध्ये जाऊन तो थरार अनुभवा. तुमच्या बंद डोळ्यासमोर तुम्ही स्क्रीनवर पाहिलेले डोळे आणि पाठमोरी असताना शिवाच्या मागून येणारा तो दैवी मुखवटा हे दोन्ही सीन विसरू शकणार नाहीत. त्यामुळे पैसे गेले तरी त्याचे चीज होईल असा सिनेमा आहे & who doesn’t love cheese? हाहा 😂
शेवटी फक्त मनात एवढाच प्रश्न राहतो,
संपत्ती हवी की शांती? तो का हे तुम्हाला चित्रपट पाहताना कळेल. Wooooooooowwww!!!!