कवालीची आर्तता !

एक फ्रेम कॅप्चर करावी, ज्यात सायंकाळी पक्षी त्यांच्या घराकडे धाव घेताय. आकाशात नारंगी रंग पसरत चाललाय, गडद नाही, एकदम धूसर नारंगी…  अंगालाही त्याचा स्पर्श होईल इतकी मनसोक्त लय आणि चंचल जिवंतपणा त्यात आहे. ती घटकाभर डोळे मिटून आत्म्याशी कनेक्ट व्हावं अशी उधळण आणि त्या सूर्यकिरणांच्या थेंबाचे तुषार पसरावे पृथ्वीवरच्या सगळ्यांवर.
सायंकाळी घरी परतताना अनेक चेहऱ्यांवर असलेली उसंत अन् समाधानाची रेष याचीच तर कमाल असते ना?

हा रंग मनावर जेव्हा येतो तेव्हा शांततेची थेरपी सुरू होत असावी… ती शांतता आपल्या बाजूला नसते, पण सायंकाळ होताना आपण त्या गूढ शांततेच्या अधीन होत जातो, आपल्या आयुष्याची उत्तरे शोधायला… तिच्या गर्भात आपण जाणिवेने स्वतःला समर्पित करतो.

 ही फ्रेम आणि कुन फाया कुन कवाली, यांचं कॉम्बिनेशन म्हणजे माझ्या आयुष्यातली नेक्स्ट लेवलची समाधीमग्न स्थिती आहे. जिंदगी की परेशानियों के लिए शराब काफी नहीं, कुछ अल्फाज भी जिंदगी जीने का हौसला देते हैं। माझ्यासाठी कुन फाया कुन तसं आहे.

हा चित्रपट टिनेज वयातला नाही. मी त्यावेळी बघितला, तेव्हा आयुष्याचा अ सुद्धा उलगडलेला नव्हता. त्यामुळे रॉकस्टार चित्रपटाला मनाशी कवटाळून ठेवणारे चित्रपटवेडे मला खरंच वेडे वाटायचे हे प्रामाणिकपणे स्वीकारायला हवे.
पण वयाची मनस्थिती बदलत जाते, तेव्हा अशी गाणी आपला शोध घेऊ लागतात. आपण त्यांना आपल्या आयुष्यातल्या कठीण काळात जागा देऊ लागतो.  हे गाणं मनाच्या आत शिरतं, जेव्हा एखादी ठेच जिव्हारी लागून नाजूक जागेच दुखणं झालेली असते. तोपर्यंत हे गाणं फक्त एक सामान्य गाणं असतं. पण नंतर ते आपल्यासाठी मास्टर पिस बनत जातं. एकदा दोनदा असं करत आयुष्याची प्रत्येक सायंकाळ हे गाणं ऐकण्याने पूर्ण होऊ लागते. आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही की मन स्वतःला सांगू लागतं “जब कहीं पे कुछ नही भी नहीं था, वही था वही था वही था वही था।” 
कारण त्या शब्दांना सोबत घेऊन संगीतातली आर्तता मनाच्या त्या नाजूक जागी मलम बनून लागते. असेल देवावर विश्वास तर तुम्हाला या ओळीत देव दिसेल, नसेल जर तर तुम्ही स्वतः दिसाल. अलगद कुणीतरी आपल्या वाट्याचं दुखणं वाटून नाही घेतलं, पण समजून घेतलं आहे हा भाव जाणवतो.

सुरुवातीलाच लिरिसिस्ट सांगतो, “कदम बढ़ा ले, हदों को मिटा ले!” जर या शब्दांना ऐकून आपल्या मनात आपण निश्चय करून स्वतःच्या मर्यादा मिटवण्याचा निर्णय घेतला तर सफल होण्याचे चांसेस वाटतात.
हे गाणं मनाशी गुज करण्याचा प्रवास आहे. यात एकटं पडण्याची भीती वाटण्यापेक्षा आयुष्याला सामोरं जाण्याचं धाडस आहे. ते चार लोक इथे नसणारे. कारण या गाण्यात जसा रणबीर कपूर तुटतोय कणाकणाने, तसाच समदुःखी तुमच्या आत दडून बसलाय. 

एक मन हवं असतं, आपल्याला फक्त समजून घेणारं. हे गाणं मला तिथे भेटतं. तेव्हा आयुष्याच्या पटावर खूप अनपेक्षित डाव असफल होत असताना, स्वतःकडून कसलीच अपेक्षा नसलेले आपण हे गाणं लावून सूर्याकडे बघत राहतो, एकटक. तिथून पक्षांचा थवा जात असतो पण एक पक्षी मात्र त्यांच्यापासून वेगळा स्व विहारात मग्न असतो. त्याच्या त्या एकटेपणात तो माझ्या मनाचं प्रतिनिधित्व करत म्हणत असतो, “मुझ पे करम सरकार तेरा, अरज तुझे, कर दे मुझे, मुझसे ही रिहा”


 
मन भरून आलेलं आहे, पण सांडत नाहीये.
डोळ्यांत अश्रूंचा सागर भरलाय पण मनाने बांध घातलाय.
कोणी एक मायाळू स्पर्श केला तरी आत्मिक तोल जाईल.
या मनस्थितीत असाल तर ही कवाली तुमचा आधार बनणार आहे.

यात रणबीर कपूर जेव्हा आकाशाकडे पाहतो, तेव्हा कुठल्यातरी आत्मिक शक्तीचं बळ त्याच्यात निर्माण होतं, त्याचा तो साक्षात्कार आपल्या आत उमेदीची सायंकाळ सोडून जातो. प्रश्न आहेत, तसं उत्तरांच्या असंख्य शक्यता आहेत हे सांगून जातो. स्वतः त आत्मविश्वास निर्माण होऊ लागतो.

कुन फाया कुन हा एक अरबी शब्द आहे. ज्यावेळी मनावर अनेक अपेक्षांचं मळभ असतं तेव्हा या कवालीची महत्त्वाची ओळ म्हणते, होऊन जा! आपण एखाद्याला आशीर्वाद देताना म्हणतो, “तथास्तु” तसचं ही कवाली आपल्या नकळत आपल्याला आधार देते. खऱ्या अर्थाने जे घडायला हवे पण त्यासाठी उमेद कमी पडते ते घडावं त्यासाठी ही कवाली, त्याचे शब्द, संगीत बळ देतं.
ही आतापर्यंतची माझ्या लेखी सगळ्यात बेस्ट सुफी कवाली आहे. या गाण्यात आपण स्वतःला भेटलो नाही तरच नवल!. कारण या गाण्याच्या शब्दांमध्ये तेवढी ताकद आहे. ज्यात कोणीतरी कनवाळूपणे त्याच्या मनाची स्थिती मांडत आहे. त्याचं दुःख, वेदना व्यक्त करत आहे.

आर्टिस्टिक प्रार्थना कशी असेल? तर ती अशी असेल! याची चाहूल हे शब्द ऐकताना सहज होते. आपण त्याच्यात इतके मग्न होऊन जातो, आपल्याला आजूबाजूचे भान उरत नाही. त्यासाठी एकांतात ही मैफल भरवावी. स्वतःच्या विचारांबरोबर रंगवलेली मैफल एका वेगळ्या जगात घेऊन जाते. हा प्रत्येक कवालीचा विजय असतो!
Please follow and like us:
error

1 thought on “कवालीची आर्तता !”

  1. मी ही खूपदा आयकतो ही कवाली अप्रतिम रचना आहे इर्शाद कामील यांची , त्या गाण्याचा अर्थ असो किंवा ते गायलेले गीतकार जावेद अली, मोहित चौहान, रहमान सर जीव ओतून त्यानी ते गायलं आहे

    आणि सध्या तू जे यावर जे लेख लिहल आहेस त्याला सार्थ ठरेल इतक शब्दबध मांडला आहेस खरच प्रत्येक जण या अवस्थेतून जाताना एकदा ना एकदा ही कवाली आयकतोच आणि जगतो ही……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *