प्रेमातली माझी शेवटची इच्छा कोणती? असा तो सवाल मित्राने केला. त्यावर आश्चर्य तर वाटलं पण गंमत पण वाटली.
मी विचार करू लागले, उम्म, प्रेमात शेवटची इच्छा… प्रेमात इच्छेचं अनेकवचन असावं, कारण प्रेमात इच्छांची मोठ्ठी लिस्ट असते. पण प्रेमातली शेवटची इच्छा…
माझी इच्छा आहे की,
“त्याने माझी डायरी व्हावं!” म्हणजे बघ ना, मी त्याच्या पुढ्यात मला स्वतःला मोकळं, सुटसुटीत करून सांगावं. त्याने ते तितकंच आवडीने ऐकावं, ही डायरी मला नेहमी सोल्युशन देते असं नाही, पण माझी सोबती बनते. अशी सोबती जी नेहमीच कुठल्याही सुखी, दुःखी, नव्या जुन्या, खराब चांगल्या, प्रत्येक गोष्टीचा उलगडा करते. जीच्यासोबत मी पारदर्शक आहे, आमच्यात कसलाही आड पडदा नाहीये. प्रत्येक दिवसाला नवं कोरं पान माझ्या नावे करून तो माझा असेल अशी डायरी!
अशी डायरी जिचं पहिलं पान लिहिताना ऑकवर्डनेस असेल, माझा हात वळणार नाही, पण तिथे नाविन्याचा शोध असेल.
मनाला कुणाचा आधार हवा असेल तर मी त्या डायारितल्या प्रत्येक पानाला माझ्या भावनेच्या मागे जोडेल. अशी डायरी त्याने बनावं ही ईच्छाये माझी…
मित्र खुश झाला. एखादी काल्पनिक वास्तविक नाट्यानुभूती एकसाथ अनुभवावी, या लहरीत तो म्हणाला, अजून बोल…
आता मला पण मजा यायला लागली. मी पुढे बोलू लागले, अशी डायरी बनावं… मी जे मनात येईल ते फक्त मांडत जावं, माझ्या मांडल्याने त्या कोऱ्या पानाला उगाच शोभा यावी… कारण मला वाटतं प्रेमात उधळून द्यावी प्रत्येक भावना आणि आम्ही दिलखुलास कपल व्हावं…. एका रात्री खूप दाटुन यावं, त्या रात्रीच्या काळोखात मी माझ्या मनातल्या भावनांना दाराबाहेर जाईपर्यंत सांडवत जावं, शेवटी तुझी ओढ म्हणत मोहाचा सुवास दाराबाहेर घमघमत उरावा, त्या भरघोस टभोऱ्या पारिजातकाच्या झाडाखाली बसून मी तुला म्हणजे माझ्या डायरीला घेऊन लिहीत रहावं, तू माझ्या सोबत कुठलाच दूर कोसाचा प्रवास न करता माझ्या मनाच्या अंतरावर असावं…
आपल्याला हवा असलेला व्यक्ती आपल्या मनाच्या गाभाऱ्यात सदैव असणं, याला प्रेमाच्या यशाचा परमोच्च टप्पा डीक्लेर करावं…
मग त्या घन्या दाट रात्री, मी अलगद माझ्या हृदयाचा एक तुकडा घेऊन त्या डायरीत ठेवून द्यावा…
दर दिवशी काहीतरी स्पेशल घडाव. एक दिवस प्रेम, दुसऱ्या दिवशी मोहब्बत, तिसऱ्या दिवशी प्यार… अस म्हणत म्हणत मी मराठीतल्या शाळेतून, उर्दुतल्या आकाशातून हिंदीच्या जमिनीवर येत पुन्हा पुन्हा पडत जाईल खऱ्या प्रेमात… वाऱ्यावर उडणाऱ्या प्रत्येक हिंदोळ्याला मनात झेलून डायरीवर उतरवताना स्वतःला त्याच्याशी वाटून घेईल.
स्वतःला एखाद्याशी वाटून घेता येणं, ही भावनाच मनाचा भार कमी करत असावी. म्हणून आपण वाटून घेत जातो स्वतःला त्याच्या सोबत. कुठल्याच स्वार्था शिवाय.
त्यामुळे माझा प्रयत्न असेल की, एखाद्याचं आयुष्य इतकं वाटून घ्यायचं की त्याला आपली आणि आपल्याला त्याची सवय लागली पाहिजे. अशी सवय जी कधी सुटत नाही. सवयीमुळे गैरसोय होण्याची भीती असते. पण एकदा एकमेकांचा कंफर्ट झोन तयार केला की मग एकमेकांच्या बाहेर पडणं अवघडच!
म्हणून त्याने व्हावी माझी डायरी, मला लेखणी होता यावं. पहिल्या दिवशी आवडीने होईल की त्याची लेखणी, पण आयुष्याच्या शेवटच्या दिवशी ते पारिजातक म्हातारं व्हावं, पण ती लेखणी त्याच दिमाखात फिरती असावी त्या डायरीच्या मुक्तांगणावर, तिथे माझ्या प्रेमाला पूर्णत्वाचा विराम लागेल, तिथे माझे डोळे सुखाने विसावतील. आयुष्याचं व्याकरण पूर्ण होईल, डायरीवर प्रेम केल्याचं स्वप्न पूर्ण होईल, स्वतःला वाटल्याने आयुष्याची पाठ वाकलेली दिसणार नाही.
– पूजा ढेरिंगे