प्रेमाचा आवंढा फेकावा…

  • by

कधी सर्रकन काटा येतो, कधी मनावर सरड्याच्या खदऱ्या पाठीसारखे ओरखडे उठतात.
कडवटशा आसवांना आतल्या आत पिऊन तिरस्काराचं नि त्यातच द्वेषाचं रोपटं आटू लागतं.
“का कोणी इतका लायक असतो का?” तुम्ही मनाला विचारू लागता.
आजही त्याच्या आठवणीने भरभर आसवांचीच गर्दी का होते? हे पारखू लागता.
थोडं किनाऱ्यावर झोकून पाहता, अर्ध्या चंद्राच्या करपलेल्या भाकरीत, सरकारच्या पिवळ्या कोरड्या लाईटीत टिळून भरलेला प्रेमाचा आवंढा फेकून देता, कुठल्याशा कोपऱ्यात पण पुन्हा स्वतःलाच घेऊन…!
‘होणाऱ्या त्रासाचं करायचं काय, म्हणत म्हणत रोजच्या सकाळ-संध्याकाळला त्याच आठवणींचं टुमणं बांधून मोकळे होता…
डोळ्यातल्या आणि मनातल्या आठवणींचा रिकॅप थोडा म्हणून प्लेलिस्ट वाजते,
“इश्क भी किया रे मौला,
दर्द भी दिया रे मौला।” हे आत झिरपत जातं… त्या गाण्याच्या लयीला आपणच पूर्णत्व देण्याच्या घोर भ्रमात त्याच्या नि तुझ्या आठवणींच्या अधिक खोलात विष पांगू लागतं, या विषाने तुम्ही रोजच्या दिवसाला अपंग करत जाता.
तरी मात्र मन कडक होऊन समजूतदार होत जातं, म्हणतं “काही मुक्कामार आतल्या आतच झिरपावे लागतात, ते दुःख कितीही सांगाल त्याची खोली तुमची असेल, ते कुणाच्या मनाला कळणारही नाही, त्यामुळे थोडे नाही जरा जास्तच कठोर होऊ लागता तुम्ही.”
नाही, अज्जीबातच जगावं अशी किरणभर उमेद उरत नाही. का उरावी?
प्रेमात प्रवाहात वाहत जावं म्हणतात ना?
मग एखाद्या प्रियकराने का इतकं खराब असावं? त्याने माणूस म्हणून नसावं ना चांगलं, पण त्याने ‘तिचा प्रियकर’ व्हावं!
‘प्रियकरासारखं जगणं’ ही भूमिका या जीवनभुमिवरची सगळ्यात गहिरी आणि स्वतःतच पूर्ण अशी जिंदगी आहे.
फक्त प्रियकराने एका प्रेयसीला पूर्णत्व समर्पित करावं, प्रेमाला आपुलकीने न्याय देऊन नातं-सौंदर्याचं कोंदण लावावं.
का ही जाणीव होत नाही? का स्वत:ची हक्काची प्रेयसी असूनही सगळीकडेच प्रेमाच्या वासनेने त्या व्यक्तीला ठेच पोहोचवतो?…
आपण मात्र आपल्याच साचलेल्या डबक्यात एक नाही असंख्य जाळी विणत जाताे, आपण आपल्यातच प्रश्न उत्तरे शोधून गुंता वाढवत जाऊन त्यातच राहू लागतो.
मनाला जाणवत असतं, का कोणत्यातरी नालायक माणसासाठी … माणूस ? … असो, त्या व्यक्तीसाठी द्वेषाचं वाढवलेलं रोपटं तुम्हाला जगू देणार नाही… त्यातून बाहेर पडायला हवंय! स्वत:चे म्हणायला आता काहीच उरलं नाही. त्याला पूर्ण आयुष्य समजलं, तो गेला, आयुष्यही हातातून सुटत गेलं…
पण तेव्हा सगळ्या गडबड, पडझड आणि मनातल्या वादळांच्या वर्दळीत शरीरातून जाणाऱ्या श्वासांच्या हालचालीने मनाला जाग येते. थोडं थांबून मन हिंदोळे घेत अर्ध्या सेकांदासाठी थांबतं. ‘त्या स्वतंत्र, स्वावलंबी, निर्मोही श्वासासाठी पुन्हा माघार घ्यावी वाटते.’
तेव्हा थोडंसं नाही, जरा जास्तच भावनांवर उदार होऊन स्वतःला निवडावं लागतं!
साधं कोडं मनासमोर पडतं,
तुझ्या श्वासांइतका आहे का कुणी तुझ्या आसपास,
जो स्वत:ला सोडून निर्व्याज तुझा होईल…
उत्तरांची फुले बरसतात. स्वत:चं जगणं सेलिब्रेट व्हावं नि मनाला टाकाऊतून टिकाऊ करत सांधावं, बघते जमतंय का…. टाके पडलेल्या मनाला, आत्म्याला, ह्रद्याला पुन्हा शिवून आझाद करायला…
कारण,
थोड़ी फिक्र खुद की भी किया करो,
हर बार जिक्र करने वाला नहीं होता।

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *