आयुष्य डिस्कस करताना..

“सख्या, आयुष्य अनपेक्षित वळणावर आलं ना? मी कधी आयुष्याला सिरीयसली घेऊन आयुष्य डिस्कस करेल वाटलं नव्हतं. कालपर्यंत कॉलेजात भिरभिरणारी पावलं नोकरीच्या रूटीनमध्ये चक्क रुतू लागलीय. आपण स्वप्नांची दुनिया सजवू लागलो होतो. समंजस होतो पण डोळे उघडलेले नव्हते. दुनियेत पैसा कमवू लागलो, ठेचा लागू लागल्या, स्वप्न विकून पैसे विकत घेतले, स्वतःच्या वेळेची किंमत घेऊ लागलो, महिन्याला सॅलरी क्रेडिटचा मेसेज येऊ लागला आणि साला नाती पण कांद्याच्या टरफलासारखी उघडी पडून रडवू लागली… हा काळच माणसाला आयुष्यावर प्रेम का करू नये याची अगणित कारणं देऊ लागतो. आपण सत्य पाहत असतो आणि नाकारत असतो एकाच वेळी…”


“अरे थांब थांब थांब! एवढं झालंय काय?” सख्याने विचारलं.
“असं एकदाच काही होत नसतं ना. रोज काहीतरी घडतं आणि एका दिवशी माठातलं पाणी भरलं की घागर वाहणार. तसचं झालंय काहीसं! वाटतं आत्महत्या सोपी असते. त्या आत्महत्या करू पाहणाऱ्याच्या डोक्यात सुद्धा असच रोज काही ना काही साचत जातं. रोजचा दगड एकाच ठिकाणी आदळून पाझर फुटण्यापेक्षा त्या माणसाचं डोकं फुटून जातं. मग काय, जगाचा निरोप म्हणजे मुक्तता एवढंच समीकरण दिसू लागतं!”


“लगेच आत्महत्या नको हां” सखा काळजीनं बोलला.
जास्त काही नसलं तरी एखाद्याची काळजी कोणत्या मिनिटाला आपल्यापाशी पोहोचते यातून त्याच्याशी आपलं काय नातं हे स्पष्ट होतं. त्यामुळे सखा माझ्याशी खोटं वागत नव्हता. आपण ज्याच्याशी संवाद साधतो, त्यात वाक्यांची गुंफण सुरू असते. एका वाक्यावर दुसऱ्याचा येणारा रिप्लाय हा जेवढा महत्त्वाचा तेवढाच तो कोणत्या क्षणी दिला तेही महत्त्वाचं असतं. आपण समोरच्याशी खूप काही बोलतो पण त्यातल्या कोणत्या शब्दांना तो महत्त्व देतो यातून त्याला आपल्याबद्दल वाटणारी भावना स्पष्ट होते. सख्याच्या प्रेम, मैत्री आणि भावनेबद्दल शंकेला जागा नव्हती.


तो बोलू लागला, हे बघ आत्महत्या या जगातला कोणताही मनुष्य करू शकतो, अगदी कोणीही. ज्याच्या नशिबी गरिबी पुजली तो, रस्त्यावर पडलेला भिकारी व्यक्ती, दारुड्या माणसाची बिचारी बायको नाहीतर पैशात खेळणारा लखपती. पण सगळेच अस आत्महत्या करू लागले तर जगायचं कुणी?
आत्महत्या हा कधीच मार्ग नसतो. स्वतःची हत्या करून काय साध्य होईल? तुला खूपच आयुष्याचा कंटाळा आला ना, आत्महत्येपेक्षा तुझ्या आसपासच्या लोकांचा निरोप घे. स्वतःला महत्त्व देऊन कुठेतरी दूर निघून जा. देवाने एवढ्या मोठ्या दुनियेचा विस्तारच त्यासाठी केलाय. आयुष्य जगताना मर्यादा असाव्यात, पण मरताना मर्यादा का घालाव्यात? “
जगत रहा! जगत राहणारा माणूस खूप ताकदवान असतो. गरिबीत आयुष्य व्यतीत करणाऱ्यांना कुठून येत असेल उमेद? याचा विचार केला तर कदाचित ते आयुष्याच्या खोलात न जाता फक्त जगत राहतात असं उत्तर मला मिळतं. मला खात्री आहे, जो माणूस आपल्या मर्यादेपलीकडे जाऊन जगाचा अनुभव घेऊ लागतो तो कधीच मरणाला जवळ करत नाही.” एवढं बोलून सखा थांबला.


त्याचे विचार त्या आत्महत्येच्या विचारापुढे सौम्य असले तरी याच काळात मनाने शांत राहून अशा विचारांवर विचार करायला हवा याची जाणीव मला होत होती. मला दिशा मिळाली. कुठेतरी पोहोचायच होतं यासाठी नाही, तर कुठेतरी जायचं आहे पण मार्ग योग्य हवा होता. असे मित्र गाठीशी असेल की आयुष्य सोप्प्याशी जोडलं जातं!

Please follow and like us:
error

1 thought on “आयुष्य डिस्कस करताना..”

  1. Khup chan lihtes tu kharch … मन दिवसभर खुप दमून जात पण अस काही वाचाल ना खुप छान वाटत.☺️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *