सांजेच्या सावलीत गिरक्या घेती कैक पापण्या,
उडुनी जाते डोळ्यावरची धूळ,
एक कृष्णवर्णी कणखर मैलाचं पण एकच स्वप्न उराशी घट्ट बिलगतं !
मनाचा गोठा कोरडा, रुक्ष भोवती ओलाव्याची उमीद शोधत राहतो.
सैरभैर होऊन सांजेस थोडी उसंत टाकते मी !
लहानपणीच्या सांजेला खेळायला जायचे,
सांजेशी खेळाचं गणित फिटत गेलं,
आठवत नाही, केव्हा सांजेला शेवटचं गाठलं!
माझ्यासारखीच ती थकून आली, म्हणाली, विश्वाचा पसारा आहे ग डोई!
तरी तुम्हा माणसांचं बरं असतं,
सगळं तोडून एक उसंत हक्काची घेता येते,
ए ती चिमणीsss, तिने स्टिरिओटिपिकल वाक्याची सुरुवात केली,
हल्ली शहरात चिमण्या ना…
दिसता ग गडावर, माळरानी, पर्वतीच्या टोकावर.
मला तिचं कशालाही दोष देणं नापसंत होतं.
मी म्हटलं, आहे सगळं तसंच आहे, पिढ्या बदलता, काळ बदलतो,
पण भूतलाची आस्तिकता बदलत नाही, जशी तू आणि तुझी वेळ बदलत नाही.
आम्ही माणसंच एकमेकांपासून स्पेस शोधत असतो. जगात मतं जितकी झाली तितकी सहनशक्ती कमी झालीय. तिथेच जगाची नाळ तोडून स्वतःला मिठी मारण्याचा एकलकोंडेपणा करायला आम्ही पुढे सरसावतो. खमकी पिढीय तशी !
मनगटात बळ आहे, न्याय-अन्यायावर वाद-प्रतिवाद आहे !
तरीही स्वतःला मारलेल्या मिठिशी कधी कसं भांडण वाढू लागलंय,
स्वतःभोवती प्रतिध्वनीशी झगडत भिंत उभी करू लागलंय! मी पाण्यात मिसळून जावं तितकी माझी मिठी स्वतःशी घट्ट झाली.
पण त्या मिठीच्या हट्टापायी, एकांताच्या सैतानी संघर्षात अडकून डिप्रेशनला कधी समर्पण केलं माझं मला का कळलं नाही.
माझ्यात आणि माझ्यासारख्या कित्येकांत मंगेश पाडगावकर का पुन्हा फुलत नाही,
का जन्मावर शतदा प्रेम केलं जात नाही ?
माझ्याही खिडकीतून येते तिरीप उन्हाची, आवाज झाडाझुडपांचे. तुझा शीण पाहून मी तुलाही मिठीत घेते!
डांबरी रस्त्यांच्या खडकाळ रस्त्यांसारखी झाली असली मनं तरी माझ्या कुंडीत जिव्हाळ्याची काळी माती नि तुळशीचं गोजिरं रोपटं आहे.
तुला सहा ऋतूंमध्ये विरघळताना पाहून मला स्वतःला उधळून द्यावं वाटतं!
पण सांजेने उधळून दिले तर झेलायला तिचं सहा ऋतुंच जग आताही तयार होतं.
पण मी उधळून दिलं तर….
तुलाही झेलायला येतील… तिने माझ्या स्टिरिओटीपीकल वाक्याला तोडलं.
असं नाही वाटत, तुम्हीच तुमच्यात अंतरं वाढवून गुंतागुंतीची वेल वाढवलीय…? सांजेचा हा प्रश्न ऐकून मी ओव्हरस्मार्ट एक्सप्रेशन दिलं.
काहीही ! आताच्या जगात जमतंय जन्मावर शतदा प्रेम करायला. लोकांना लाइव्हली जगायचं नाही, त्यांना मोठं व्हायचंय ‘हैलाईटेड’ !
तुला काही वेगळं व्हायचंय असं तुला वाटतंय ? तुला वाटत असेल तू काहीतरी जगावेगळं करतेय, पण लेट मी टेल यु, तुही तेच करतेय.
आता मी थोडी नरमले होते, मी म्हणाले; मला मान्य आहे, माझा प्रवास जरी तसा असला तरी मला मोठं लोकांसाठीच व्हायचंय कारण, मोठं झाल्याशिवाय लोकं आजूबाजूला भिरकतही नाही.
त्यात काय गैर आहे ?, सांजेने प्रश्न केला.
ती बोलू लागली, आज माझ्यात सूर्यास्ताची तिरीप, जिव्हाळ्याचा थकवा, पक्ष्यांचा परतावा, प्रियकर प्रेयसीचा कोवळा रोमान्स, पाण्याची संथता दिसते, त्याशिवाय का तू माझ्याशी बोलतेस ? तू ज्या गोष्टीसाठी बनली आहेस, त्यात तुझी छाप तयार करावी, यासाठी तर तुझा जन्म आहे! माझ्यात करण्याची धमक दिलीय, मी ते तितक्या एफर्टलेसपणे करतेय. तू स्वतःला मिठीत घेऊन स्वतःची आई बनतेयस. तसं करू नकोस! आईला पिलाने झेप घेण्याची भीती असते. तू झेप घेतल्यानंतर धपटल्यानंतर स्वतःची आई हो!
तुझ्यात उद्या पाखरं जन्मणारी आहे. त्यासाठी हा तारुण्याचा वेल सुटा करत तुला तुझ्यात एक सांज वाढवायला हवीय! दिवसभराचा कामाचा भार सूर्यास्ताला काढून ठेवत जिच्या भोवती पक्ष्यांचा किलबिलाट, सूर्यास्ताची किरणं, सख्याची मिठी नि ओठांना कोवळ्या आयुष्याच्या सुखाचा ओलावा चमकेल! अशी कोवळी सुखद सांज! कधीही वेळ न चुकवणारी मनाची सांज जपायला हवीय!
आज तू मनाची सांज माळशील कपाळाच्या माळरानावर,
स्वतःशीच आयुष्याच्या मध्यान्ह प्रवासात म्हणशील ओशाळून,
काय तरी बाई या एवढ्या नेटक्या आयुष्याला वैतागले होते मी,
एवढंच कळलं नव्हतं तेव्हा, आयुष्याला दिवस, रात्र, दुपार या डॉक्टरांच्या गोळ्यांचा टाइमिंग जरी असला तरी, त्यास सांजेचा दिवा तेवता आहे!
सांजेचा दिवा जपायला हवाय !
©Pooja Dheringe
Pc: Monika Dheringe