अंधार दाराबाहेर पडला होता की काळोख माझ्या डोळ्यात झाला होता?
एक दिवा विझवून सूर्य मावळतीला गेला होता…
त्याच्या येण्याची आशा पापण्यांवर अडकली होती, उमेद हक्काची म्हणून दाराची कडी उघडी ठेवली होती…
संपत चालला प्रकाश, वाट अंधाराची सुरू झाली, नाही म्हणता म्हणता सायंकाळ पायावर आली…
सोडून देऊन सोडता आले तर काय अजून हवे होते, समोरच्या सारखे होता आले तर काय अजून हवे होते… दाटलेली सायंकाळ पोटात निराशेचा डोंब देऊन गेली, पापण्या मिटतानाही थोडी भीती वाटूनच गेली, मिटलेल्या शरीरात एक व्यक्ती सताड जागा राहतो, दिवसभरात चुकलेल्या कित्येक विचारांचं वावटळ अजून खोल खोदत राहतो, शरीर थकून जातं, मनाला थांबवलं तरी थांबत नाही, भावनिक आत्म्याचं हे असच असतं, सूर्य मावळून अंधार झाला तरी तो झुरणं सोडत नाही… विचार करत राहतो, दिवसभरातल्या प्रत्येक व्यक्तीचा, नात्यातला ‘हक्क’ म्हणून बोललेल्या चुकीच्या काहीबाही शब्दांचा, हा भावनिक आत्मा वेडा, मशीन झालेल्या माणसांमध्ये शोधत राहतो माणूस हक्काचा…
का असे होत असेल? प्रश्न देऊन सूर्य विझतो… का नातं सुरू होताना तो माणूस ‘निसर्ग’ वाटू लागतो?पण हळूहळू सवयीने त्या माणसाचा होत जातो एक दगड सगळ्या मशिनांच्या जंगलात खितपत पडलेला… भावनाशून्य! अर्थहीन! आणि अनोळखी दगड… तरीही… सताड जागं असलेलं मन म्हणतं, आशा मात्र सोडायची नाय! सायंकाळ, विझलेला सूर्य अन् काळोखात एक दिवस काजवा दिसतो. निसर्गाचा ‘काजवा’ झाला तरी चालेल,आशा मात्र सोडायची नाय! –
पूजा ढेरिंगे #सुखकथा