हृदयाच्या रंगमंचावर छेडलेला तो प्रयोग …
स्पंदनं मनात… शब्द ओठांवर… आणि प्रत्यक्षात ?
आज अचानक नाटकाला जाण्याचा योग आला … मुळात मला व्यावसायिक अनुभवी नाटकांपेक्षा स्ट्रगलर मुलांचे प्रयोग, एकांकिका पहायला खरी मजा येते. कारण त्यांनी जीव ओतलेला असतो त्यांच्या त्या स्वप्नामध्ये आणि खुप अलगद सांभाळतात त्या प्रयोगातील प्रत्येक हावभावाला, लहेजाला, लकबीला…
या जिवंत एक्साइटमेन्टमध्ये सगळं शेड्युल आदल्या दिवशीच ठरलं होतं…
आज सकाळी कामात असताना सकाळी एका गृपशी नजरानजर झाली.

माझ्या गप्पांमध्ये रंगत मी त्यांना दुर्लक्ष केलं. दिवस नेहमीसारखाच गेला. नाश्ता जेवण करून मी आणि मित्र आम्ही दोघे एकांकिकेच्या ठिकाणी पोहोचलो. सगळा माहोल अप्रतिम होता. सगळ्यांची घाईगर्दी चालू होती. वेगवेगळ्या भावनांचे ते चेहरे जणू एक प्रयोग सादर करत होते असं सहज भासत होतं.
थंडीचे दिवस असल्यामुळे मला वॉशरुमला जायचं होतं, तेच शोधत गेले. तिथे एक मुलगी आधीपासूनच बाथरुम शोधत होती. ती अर्धवट मराठी-इंग्लिश देहबोलीची होती… हे वर्णन यासाठी की ती गेल्या ५ मिनिटापासून बाथरुमच्या समोरून येरझरा घालत होती. शेवटी तिने मला विचारलं, ‘Do you know where is the washroom?’
मी म्हटले ‘तुझ्यासमोरच आहे.’ ती म्हणे यावर प्रसाधनगृह महिलांकरिता असं लिहिलंय. मग तिला सांगितले, बाथरुमलाच मराठीत प्रसाधनगृह म्हणतात. त्यावर मी खदखदा न हसता आम्ही दोघीनी मुकहस्याने पुढची जर्नी केली. हे आवर्जून लिहावंस वाटलं, कारण पहायला आलेल्या मराठी एकांकिकेत ती मला स्टेजवर काम करताना दिसली, आणि तेव्हा मात्र हसू आवरेचना…पण एकांकिकेत फार शुद्ध मराठी बोलली ती, त्यामुळे हा प्रसंग विसरायला झालं.
हा प्रसंग विसरल्यानंतर तर खरी मज्जा आली.
तो सकाळी दुर्लक्ष केलेला मुळात दुर्लक्ष केलं असं भासवलं होतं, तो गृपही आला ना या एकांकिकेला …
अहाहा! काय सुरेख सादरीकरण होतं ते. त्याच्या संहितेपासून पात्रांपर्यंत सगळंच परफेक्ट होतं … खरंतर त्या नाटकाच्या मध्यातच या एकांकिकेवर रिव्युव्ह लिहिण्याच्या मूडमध्ये मी होते. पण ना एका ‘पात्राने’ त्या स्टेजवरच्या लाईटीच्या प्रकाशात माझ्या काळजात घर केलं. मग अख्खा रिव्युव्ह त्या एका पात्रावरच लिहायचं ठरलं…

तर झालं असं, ब्रेकमध्ये मित्र आणि मी जेवायला गेलो. श्या! जेवणाला काहीच चव नव्हती. उष्ट नको रहायला म्हणून मित्राला ताटातलं थोडं शेअर करायला लावलं… जेवण स्वादिष्ट नव्हतं हे खरं पण नंतरच्या किस्स्याने त्याला शंभरच्या पटीत खमंग केलं.. आमचं जेवण होत होतच आलं… आणि मागून ९-१० जणांचा गृप आला. मी आपलं जेवतच होते… आपल्याला काय फरक पडतो कोणी येवो न येवो…पुढच्या एकांकिकेतला एक शब्दही मिस नको व्हायला, म्हणून माझं भरभर खाणं चाललं होतं त्यामुळे बाकी सगळं गौण होतं.
ए पण…. पाहते तर काय? हा तोच…..
हा तोच, जो मी रंगमंचावर एका भरभक्कम ‘भूमिकेत’ पाहिला होता. तो प्रत्येकासारखाच होता पण त्याच्या त्या भूमिकेने मला गराडा घातला … रंगमंचावर सगळ्यांच्या गर्दीत असुनही तो एकटाच मला प्रकाशात दिसत होता…
त्याचा तो गोरा गोंडस गरगरित मुखडा, त्यात प्रयोगासाठी गालावर लावलेला ब्लश टिळा आणि ते डोळे… ते डोळे, त्यातले भाव इतके स्वच्छ …
तो समोरच्या टेबलावर येउन बसला… माझ्या हातातला चमचा तोंडातच राहिला आणि ‘युवर नाटक वॉज👌’ मी लिटरली असं पडझडित बोलून मोकळी झाले…
त्याने त्याच राजबिंड्या दिमाखात ‘थॅंक्यू सो मच’ म्हटलं…
हाय ! ते थॅंक्यू….
ते थॅंक्यू या सगळ्या दिवसातला माझा आवडता शब्द ठरला. थोड्यावेळाने मला ऐकू आलं मित्र बॅकग्राऊंडला म्हणतोय, ‘ए भूक्कड, तुला जात नाहीये बळजबरीने कशाला खातेयस? कितीही पाहिलस तरी तो काय डोळ्यात नाही बसणारे ..’
आह! आइ रिअली विश, डोळ्यात भरून घेता आलं असतं त्याच्या त्या बोलक्या डोळ्यांना.
खरं सांगू तर मला अजून भुक लागायला लागली असं वाटत होतं, तो असाच समोर बसावा. मी त्याला बघत बघत खातच रहाव … पण नाही …
माझ्यातली मी जागी होउन मी तडक निघाले…
‘मी तिथून निघाले तर होते, पण तो माझ्यातून बाहेर पडत नव्हता ..’
ती हुरहूर होती, ती त्याच्या आकर्षणाने इतकी तीव्र झाली होती. असं वाटत होतं की सगळं जग स्तब्द व्हावं आणि १० मिनिटांसाठी मी त्याला भेटून यावं, छान मैत्री व्हावी आणि फक्त आणि फक्त त्याच्या प्रत्येक नाटकानंतर त्याने माझ्या कॉंप्लिमेंटची वाट पहावी. बस्स एवढं सरळं साजेसं आणि गोंडस असावं सगळं त्याच्यासारखंच….
श्या ! ही मोहमाया माणसाला वेडं करून टाकते. हे सगळ झालं म्हणून मला चहा पण बरा लागेना…
मित्राला म्हटलं ‘चहात गुलकंद टाकलंय वाटतं… ‘
‘आहे त्या गुलकंदातून बाहेर ये. सगळं छान लागेल … ‘ हे खडूस उत्तर त्याने दिलं. त्यामुळे मी थोड सावरायचा प्रयत्न केला खरा! पण तो व्यर्थच ठरला म्हणायचं.
शेवटी खूप विचार केला आणि त्याचं नाव शोधायचंच ठरलं. सगळे सीन चित्रपटाच्या कथेसारखे पुढे सरकत होते. जिथे सगळा खेळ माझ्या हातात होता. योगायोगाने सकाळी माझ्या कामाच्यावेळी हातात आलेल्या पॅंपलेटमध्ये त्यांच्या नाटकाचे नाव दिसले … एकांकिकेचे दिग्दर्शक, सन्हितालेखक सगळं पाहिल्यानंतर अंदाज लावून, त्यातलं त्याला साजेसं असं नाव निवडलं आणि फेसबुकला सर्च केलं…… आणि
हो ….
हो…
हो… मला त्याचं प्रोफाइल मिळालं.. पुन्हा तोच चेहरा… हायें मैं मर जावा … केवढा गोंडस आहे तो …
त्याला मेसेज करावा, सगळं सांगावं, छान कौतुक करावं, त्याआधी फ्रेंडरिक्वेस्ट पाठवावी यातलं मी काहीच केलं नाही, कारण माणूस जवळ आला की माणसावरून काम कसं हे ठरवलं जातं. त्या कलेची ती शुद्ध पोचपावती प्रांजळपणे दिली जात नाही. मला त्याची ती कलाकृती आणि त्यातला कलाकार अमर ठेवायचा होता आयुष्यात…
आणि आमच्या त्या दोन सेकंदांच्या, दोन शब्दांच्या अदलाबदलीवरुन प्रेमात नाही रे पडता येतं… स्टेजवर त्या लाइटच्या धुरात तो कितीही सुरेख दिसत असला तरी, माझ्या आयुष्याच्या धुरात सूट नाही होणार तो …. कारण मला माहितीये प्रेम आणि आकर्षण.
आणि मला हेही माहितीये, ‘एक क्षण भाळण्याचा, बाकी सगळे सांभाळण्याचे.’
पण मला या सगळ्याचा बिलकुल पश्चाताप नव्हता. कारण दिग्दर्शक, संहितालेखक,सेटअप मॅनेजर, प्रोड्युसर, आणि हिरोईनही होते मी माझ्या कल्पनेची.
माझ्या मनातला हा प्रयोग उत्तम रंगला होता.
त्याला शोधणं, त्याचं एकाच दिवसात सकाळी, सायंकाळी भेटणं. नजरानजरेतून एकमेकांचे ॲटीट्यूड शेअर करणं आणि शेवटी वेगवेगळ्या टेबलवर समोरासमोर बसून दिवस एका रोमॅन्टिक प्रियकरप्रेयसीसारखा घालवतोय हे डोळ्यांनीच पोहोचवणं.
उलट मी खुश होते. कारण माझ्या आयुष्यातलं हे नाटक मी हवं तेव्हा जगण्यासाठी माझ्या आठवणीच्या शिदोरीत भरून घेतलं होतं.
आणि त्यामुळेच आयुष्यात एखादं पात्र असंच होऊन जावं, जे कलाकृतीपेक्षा कलाकार वर्णायला भाग पाडेल.. माझ्या आयुष्यातलं हेच ते पात्र.
प्रेमात सगळ्यांच्याच पडते मी…. पण प्रत्येक माणूस आयुष्यात आयुष्यभर राहतो असं नाही आणि तो ठेवूही नाही. काही व्यक्ती खास आठवणीतच असाव्यात….
❤️❤️❤️💙❤️❤️
🤗🌸💓