‘आपलाच प्रिय व्यक्ती अनपेक्षित वागू शकतो?’ या प्रश्नाच्या उत्तरात विणा होती. हा काळ तिच्यासाठी खूप त्रासदायक, एकटेपणाचा आणि कठीण होता. विणाला असं एकटं आणि गुमसुम कोणी पाहिलं नव्हतं. तिला दिलखुलास आणि मोकळं राहायला आवडायचं. पण तसं पाहिलं तर हा काळ सगळ्यांसाठी कठीणच आहे. पण ती बंदिस्त घराच्या चार भिंतींमध्ये खूप एकटी पडली होती, तिला कोणी समजून घेत नाही ही तिची स्वतःशी रोजची तक्रार होती. दिवसभर ना बोलायला कोणी होतं ना समजून घ्यायला. मित्र मैत्रिणी असूनही तिला त्यांच्याशी पर्सनल आयुष्य डिस्कस करण्याची कसलीच इच्छा नव्हती. कारण तिला गॉसिपमध्ये इंटरेस्ट नव्हता, तिला तिची कामं बरीच होती. पण संपूर्ण दिवसाचा निवांत वेळ म्हणून तिला त्याच्याशी बोलाव वाटायचं. असं नव्हतं की रवीश तिला टाळत होता. प्रेम दोघांचही होतं, उलट आधीपेक्षा ते अधिक घट्ट झालं होतं. पण त्याचं वागणं आणि त्या वागण्यातून तिला गृहीत धरणं वाढलं होतं. रवीश प्रेमाला दुय्यम स्थान देतोय, हे बघणं तिच्यासाठी त्रासदायक होत होतं. कारण तिच्या आयुष्यात त्याच्यापेक्षा कोणीच महत्त्वाचं नव्हतं. त्याच्या आयुष्यात मात्र काम पहिल्या स्थानावर होतं. काल रात्री असच काही झालं, त्याने सलग दोन दिवस बरं वाटत नाही म्हणून तिला कॉल केला नाही. मेसेजवगैरे चालू होते. पण कॉलवर बोलणं म्हणजे प्रत्यक्ष आवाज ऐकून त्या व्यक्तीबरोबर त्याचवेळी कनेक्ट होणं तिला मेसेजपेक्षा जिवंतपणाचा फील देत होतं. भेटणं जरी शक्य नव्हतं, तरी बोलून एकमेकांसाठी आधार बनावं हा तिचा अट्टाहास होता.
पण सलग दोन दिवस फोनवर बोलणं झाल नाही तेव्हा मात्र तिला अजूनच एकटं आणि या आयुष्यात आपण कोणासाठी महत्त्वाचे नसल्याचं जाणवू लागलं.
आपण बाहेरच्यांसाठी महत्त्वाचे असतो, पण ज्यांना आपलं मानतो ते आपल्याशी इतकं तुटक का वागतात, तिचे प्रश्न संपत नव्हते. कदाचित बाहेरच्यांना कधी आपलं मानूच नाही. प्रेम करताना घाई करतो का आपण? पण नाही, वीणाने घाई केली नव्हती. तिने मैत्रीला प्रेमात बदलायला सात वर्ष घेतली होती.
पण या वर्षांमध्ये त्याचा स्वभाव बदलला होता. तिला त्याच्यात ना मित्र ना प्रियकर ना जोडीदार दिसत होता. सतत एक पश्र्चातापाची लकेर असायची, कदाचित मी त्याला हो म्हटले ही चूक होती का?
मैत्र दोघांचे टिकले होते, एकतर्फी प्रेम वाढले होते,
पण भावूक होऊन मित्रात प्रियकराला बघितले मी,
प्रेमाला हो म्हणून हक्काच्या मैत्रीला मुकले मी! हे मात्र खरं होतं. कारण मैत्री होती तेव्हा या संपूर्ण जगात त्याच्यासाठी फक्त ती महत्त्वाची आणि पहिली होती. आता परिस्थिती बदलली होती मान्य होतं तिला. कालच यावरून त्यांची भांडणं झाली. गेल्या दोन महिन्यांपासून भेटणं नव्हतं, ना बघणं होतं. कदाचित त्याला हे जाणवत नव्हतं. तो त्याच्या कामात इतका व्यस्त झाला होता.
त्याला तर हे सुध्दा आठवत नव्हतं की, रात्री तिला त्याच्या वागणुकीचा राग आला होता. आजारी असला तरी फोनवर बोलणं हे काम नव्हतं, त्यामुळे जसं ती आजारी असली की त्याला फोन करतेच आठवणीने. कारण तिला खरंच त्याचा आधार वाटतो. पण म्हणजे मी त्याला आधार देत नाही का? पुरुष कधी स्त्री मध्ये आधार शोधतो का? कदाचित नाही. त्याला तशी लहानपणापासून सवयच नसते. हे आणि असे असंख्य तुटक विचार करून ती त्याच्या मेसेजला टाळू लागते, रिप्लाय देत नाही.
तिच्या मनात खूप टोकाचे विचार चालू होतात. हे असं वागण्याला काहीच अर्थ नाही, सतत वेळेनुसार त्याने बदलायच आणि त्याच्या बदलाला तिने स्वीकारायचे. हे दर महिन्याला बदलू लागलं होतं. या नात्याला खरंच काही अर्थ राहिलाय? प्रेम तोडून मैत्री टिकवावी का ? पुन्हा मैत्रीच स्वीकारावी का? पण तसं होत नाहीच ना?
“पुरुष एखादं नातं तोडतो त्यामागे बऱ्याचवेळा प्रक्टीकल कारण असतं. पण जेव्हा एखादी स्त्री नातं तोडते तेव्हा बहुतांशी इमोशनल कारणे जास्त असतात.” या कथेत सुद्धा वीणा रविशला समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्याच्या कलाने घेण्याचा प्रयत्न करते. पण दिवसभराच्या कामाच्या व्यापानंतर जेव्हा झोपण्यासाठी दोघे बेडवर पडतात त्यावेळी तरी विचारांचं शेअरिंग व्हावं हा तिचा अट्टाहास असतो. पण तो मात्र त्याच्या व्यापात इतका रमून गेलेला असतो की तिला आता त्याच्या कलाने समजून घेतलं ही चूक वाटू लागते. पण त्याला बांधून ठेवणं हा तिचा स्वभाव नव्हता. प्रत्येक व्यक्तीला त्याची स्पेस द्यावी या विचाराची ती होती. पण या काळात त्याने चोवीस तासातले ३० मिनिट तिला द्यावे. तिला म्हणण्यापेक्षा एकमेकांसाठी द्यावे हे तिचे म्हणणे होतं. त्यामुळे त्याच्या वागणुकीला दुजोरा न देता ती रिप्लाय देणं टाळते.
ती खूप वेळ विचार करते. बेडवर पडून राहते. दुसरा दिवस उजाडतो. आज ती त्याची वाट पाहत नाही. दर एक तासाने मेसेज येत असतात. ती वाचून इग्नोर करते. पण जेव्हा संध्याकाळ होते, ती पुन्हा एक हळवी स्त्री बनत जाते आणि कामातली इंडिपेंडंट स्त्री बाजूला पडून ती तिच्या हक्काच्या माणसाला मिस करू लागते. त्याचवेळी त्याचा मेसेज येतो, ” वाट बघतोय, रिप्लाय तरी दे. आपल्या नात्यासाठी तरी? ”
त्याचा हा मेसेज वाचून ती आधी घडलेल्या गोष्टीचा विचार न करता डायरेक्ट कॉल करते.
तो फोनवर सतत सॉरी म्हणत राहतो, ती त्याला तिच्या मनातल्या भावना सांगत राहते. तो म्हणत राहतो, मला समजते तुला काय म्हणायचे आहे, ही चूक पुन्हा होणार नाही राणी.
“राणी नाही विणा म्हणायचं.”
“ओ ग माझी राणी, कर ना माफ. “
त्याच्या अशा बोलण्यावरून ती पुन्हा विरघळायला लागते… त्याला सांगू लागते, “माझ्या आयुष्यात तूच एक महत्त्वाचा व्यक्ती आहे… तू सोडून माझं दिवसभरात कोणाशी बोलणं होत नाही, तुझ्याशी बोलण्याने खरच आयुष्याला अर्थ असल्यासारखं वाटतं. प्रेम यासाठीच असतं का? आपल्या आयुष्यात या अख्या दुनियादारीत कोणीतरी निस्वार्थपणे आपलं आहे, ही जाणीव जगण्याला बळ देत असते म्हणून? तुला माहिते…”
त्याचा समोरून आवाज येत नसल्याचं कळल्यावर ती बोलता बोलता अचानक थांबते. “तुला कळतंय ना मी काय म्हणतेय? अग हो ग राणी, यापुढे नाही होणार असं काही. मला कळतंय मी काळजी घेईल.”
“हे बघ एवढे दिवस झालेय रवीश. तुझे हे असलं कॅज्युअल वागणे मला आता चालणार नाही.”
“अग काय बोलतेय? “
“मला माहितेय तुझ लक्ष नाहीये. एवढ्या वर्षात एवढं तर कळतच, कधी तुझं लक्ष असतं आणि कधी नसतं. आताच्या क्षणाला कदाचित तू माझं ऐकत असशील पण तुला माझं म्हणणं कळत नाहीये.”
“अग असे काही नाही.”
आणि अचानक मागून व्हिडिओचा आवाज येतो… एकदा आवाज ऐकून ती स्वतःला समाजावते, मागून कोणीतरी टीव्ही लावला असेल म्हणत पुन्हा बोलू लागते.
पण दोनदा- तीनदा तोच आवाज ऐकू येतो हे ऐकुन ती त्याला विचारते, त्यावर तो म्हणतो, “अग एक कामाची व्हिडिओ क्लिप अपलोड करायची राहिली होता. ती बघत होतो.”
“व्हॉट? तू ना… गेट लॉस्ट … पुन्हा फोन करायचा नाही या नंबरला… ना पुन्हा मागे मागे यायचं… ज्याच्यासाठी तळतळ करत होते, स्साला हरामखोर, तुला नात्याची तरी किंमत उरलीय? अबे तुला तुझ्या कामापुढे कोणीच दिसत नाही. माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं तुझ्याशी हे सगळं बोलताना पण तू मात्र तेच करत रहा. पुन्हा तोंड दाखवू नको. जेव्हा कळेल तुला, खूप उशीर झालेला असेल.” म्हणत तिने तूनफुन करत फोन कट केला.
तिच्या डोक्याचा भुगा झाला होता. तो अस वागू शकतो, हे तिला अजूनही मान्य नव्हतं.. एखाद्याला सूट देण्याचा इतका मोठा परिणाम होतो?
याने तासभर ती शांत बसून राहते. तिला काही सुचत नाही, ती सैरभैर होऊन स्ट्रॉन्ग राहण्याचा प्रयत्न करते. मन वळवण्याचा प्रयत्न करते. पेंडींग राहिलेल्या कामाला हाताशी घेऊन लॅपटॉपच्या स्क्रीनवर त्या दोघांचा फोटो पाहून पुन्हा चिडचिड करू लागते. गाणी ऐकावी म्हणत ती पुन्हा टेप ऑन करते. जुन्या गाण्यांच्या लुपवर पुन्हा आठवणीत जाते. पुन्हा जुन्या प्रेमाला आठवायला लागते. पुन्हा स्वतःला म्हणते, कदाचित परिस्थिती कठीण आहे, तो असा नाहीये… पण त्याचं हे वागणं वाढत चालल आहे. आज नाही स्टँड घेतला तर पुन्हा ही परिस्थिती कधीच बदलू शकणार नाही. तो असा वागत राहिला तर तसही एक दिवस संयम संपून सगळं टोकाला जाऊन तुटेल… त्यामुळे मला हे बदलायला हवं… “आज प्रेमासाठी एकमेकांच्या वागण्यावर नीट संस्कार नाही केले तर बाकीच्या नात्यांमध्ये जे होतं ते व्हायला वर्ष लागणार नाही…” त्यामुळे मला खमक व्हायला लागेल… नात्यात मुक्त रहावं म्हटलं तरी काही काळानंतर व्यक्ती प्रेमाला बाजूला ठेवून केवळ स्वतःचा विचार करू लागतो… त्याच्या अंगी ही सवय लागू द्यायची नाही… प्रेमात पडण्याचा काळ खूप सुखद असतो, भरकटत नेणारा पण त्यांनतर समोरचा व्यक्ती खूप आपला होत जातो, तेव्हा त्याला मिळवण्याची आणि गमावण्याची भीती उरत नाही तेव्हा गृहीत धरणं वाढू लागतं. मला हे या नात्यात होऊ द्यायचं नव्हतं… जर तुटायच असेलच नातं, तर ते हे संस्कार करताना तुटून जाईल… पण समोरचाही याबाबत विचार करून नात्यावर कष्ट घेणार असेल तर त्याच्यासाठी थांबायला नेहमीच तयार असेल. पण जर त्याला काम आणि प्रेम बॅलन्स करणं जमलं नाही तर मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेलच. या विचारात वीणा झोपायचा प्रयत्न करू लागली. आठवणींचा रिकॅप पाहिल्यावर त्याच्या भूतकाळातील हाताचा आधार उशिला घेऊन ती पुन्हा सगळं सुरळीत होण्याच्या उमेदिवर कुशी बदलत राहिली. मनाला दिलासा देत राहिली, हे तात्पुरतं आहे, हळूहळू सगळं नीट होणार आहे. तरी डोळे मिटताना तिचा प्रश्न निरुत्तरीत राहतो,
आपल्या प्रेमाचा मौसम कित्ती बहरलेला दिसतोय,
आठवणींच्या संथ किनारी जाऊन गुराखी बनतेय मी आपल्याच नात्याची!
सख्या, मनाशी मनाची नाळ जोडून खरं सांग, तूही कुशी बदलून अस्वस्थ होत तुटत असशील ना आता?