कधी कधी खूप एकटा वेळ मिळतो. एकांताचं स्वत:चं जग असावं आणि आपण तिथली एकमेव प्रजा इतका सहवास एकांतात मिळतो. स्वतःच स्वतःशी बोलण्याचा पहिला दिवस खूप समाधान देणारा असतो. मनाला एखाद्या विचाराची सुखावह सावली मिळावी तसं वाटू लागतं. स्वतःच स्वतः सारख्या मैत्रिणीला भेटल्याचा फील येऊ लागतो. हा स्वतः सोबतचा वेळ खूप काही देऊन जातो. स्वतःच्या प्रत्येक गोष्टीला अधोरेखित करून जातो. स्वतःतले कच्चे पक्के धागे सुटसुटीत करून सांगतो.
पण किती दिवस?
काही लोकांना एकांत खूप आवडतो. त्यांना खूप आवडतो कारण त्यांना तो खूप प्रमाणात मिळालेला नसतो. थोड्या प्रमाणात मिळालेला एकांत सगळ्यात सुखद असतो. पण अमर्याद एकांत माणसाला एकटं करून जातो. स्वतः बद्दल चुकीचे विचार करायला सुरुवात होऊ लागते. कुणी एखादा शब्द बोललं की मन कुठल्याही तर्काशिवाय त्यावर दिवस दिवसभर विचार करू लागतो.
यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागतो. पण दिशा मिळत नाही, भरकटायला होतं, शांत वाटत नाही. आपण आधीच्या त्या एकांता शिवाय जगणाऱ्या स्वतःला मिस करू लागतो..पण म्हणजे आपण नेमकं काय मिस करतो? तर ती व्यक्ती जी थोड्या गोष्टींत खूप समाधानी होती, जिला जास्त मिळवता यावं यासाठी असंख्य स्वप्नांची यादी होती, तिच्या डोळ्यांत मावणार नाही एवढ्या गर्दीभर तिच्या इच्छा होत्या आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाला लाजवतील अशा तिच्या कल्पना होत्या.
पण ती व्यक्ती या ‘स्व’च्या घोळक्यात हरवून गेली… स्वतःवर प्रेम करणं चांगलं. पण जसं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचा कसा वापर करायचा याची समज नसेल तर तुमच्या स्वातंत्र्याची नशा तुम्हाला अधोगतीकडे नेते. तसचं एकांताचा वापर कसा करायचा हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही एक स्वार्थी आणि अपराधी व्यक्ती बनून स्वतः मध्येच संपून जातात. त्यामुळे हा जास्त प्रमाणात एकांत जीवघेणा असतो, पण जर हा एकांत दुसऱ्यांसाठी वापरला, कुणालातरी गरज आहे म्हणून काही वेळासाठी आधार दिला, गरज नसताना कुणाचीतरी निर्मळ मनाने विचारपूस केली तरी या एकांताच चीज होतं. एकांताचा ट्रेण्ड निघतो, त्याने माणूस सेल्फ लव्हचा प्रवास सुरू करतो, पण हा प्रवास हळूहळू फक्त स्वतः पुरता एकलकोंडा होऊ लागतो, ज्याला दुसऱ्यांचे आवाज, दुःख, वेदना ऐकू येणं बंद होऊ लागतं. डोकं आतल्या आत फुटू लागतं, मन ताब्यात राहत नाही, आनंद असून अनुभवता येत नाही, हातून सगळचं निसटू लागतं. स्वतःचा राग येऊ लागतो, त्या रागात पुन्हा अगतिक होऊन पुढचं पाऊल उचललं जातं, ज्यातून स्वतःच्या आयुष्याच्या दरीत पदोपदी पाय घसरून आपण खोलवर नष्ट होत जातो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा << वाचा
– पूजा ढेरिंगे
त्यामुळे,
जेव्हाही एकटं वाटू लागेल ना, हळूच कुणाचीतरी मदत करून टाकायची!
मनात समाधान असतं, कुणालातरी एकटं पडू न दिल्याचं…
तुम्हाला हेही आवडेल- https://manmarziyaan.in/fragrance-of-love/
khupp sundar