ती रात्र… तो वाद!

  • by

त्या रात्री भांडणाने धुमाकूळ घातला!
दोघांच्या प्रेमात ती रात्र इतकं बोलली, इतकी बडबड केली,
शब्दांच्या मर्यादा सोडून ती टोकाची कठोर झाली!

नात्याची पातळी खालावली,
अहंकाराची नशा चढली!

ज्या व्यक्तीच्या प्रेमाची ऊब घ्यायची,
तीच आज घराच्या कटघऱ्यात उभी राहिली!

दोघांच्या दिशा विरुद्ध झाल्या असत्या,
मनातल्या रोषाचा वणवा नातं जाळून गेला असता!

बर्फ दंश व्हावा इतके सुन्न झालो असतो भावनांनी,
क्षीण होऊन आतल्या आत संपलो असतो मनाने!

काळोखाची रात्र सुरू झाली असती,
भावनांची पडझड झाली असती,
एकमेकांना दूषणं देण्यात आयुष्य संपून गेली असती!

मग कधी काळी बऱ्याच संध्याकाळी वाट्याला येऊ लागला असता एकांत,
मग कधी काळी बऱ्याच संध्याकाळी वाट्याला येऊ लागला असता एकांत,
तेव्हा मनाने आवाज दिलाच असता,
“घेतली असती माघार, संपला असता ना वाद!”

उंबरठा जवळ केला असता,
अश्रूंबरोबर टोकाचा विचारही आला असता!

उशीर एका अहंकारी निर्णयाचा होता,
दोन मनं प्रेमाबद्दल दुधारी होण्याचा होता,

सगळंच झालं असतं,
जळाल्या असत्या प्रेमाच्या आशा, सोबत कल्पना केलेल्या प्रेमकथा!
किळसवाण्या झाल्या असत्या मिठीच्या नसा,
अश्रूंना ऐकणारे कान गमावले असते,
आयुष्याला गोंजरणारे हात गमावले असते!

एका वादामुळे मनात अडकून राहिला असता उरला सुरला रागीट अहंकार,
स्पर्शही जादू करेनासा झाला असता,
नातं संपण्यात जमा झालं असतं!

सगळंच झालं असतं, नसतं,
खूप काही अघटीत घडलं असतं!

त्याने हात पकडला,
“जरा बसून बोलूया?”

त्याने हात पकडला,
“जरा बसून बोलूया?”

उद्ध्वस्त व्हायला आलेल्या नात्याला वेळेवर एक गर्भघर सापडलं!
उधळणाऱ्या मनाला शाश्वतीचं माणूस सापडलं!

तिथेच गळून पडले वाद,
भावनांनी आंदोलने केली,
वादळी ती रात्र काय, अहंकारी ते भांडण काय?
सगळ्या भावनांच्या आधी प्रेमाची उचकी लागली,
तिथेच त्या नात्याचं आयुष्य वाढलं!

-पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *