प्रेम अन् समुद्र!

समुद्रासारखंच तर असतं प्रेम…
ज्याचं आकर्षण तुला, मला, प्रत्येकाला असतं.
समुद्राच्या किनार्यावर निवांत आनंद घेताना वेगळाच सुकून हृदयाच्या पटांगणावर असतो.
थंड हवा,
कोवळं ऊन, संध्येची तिरीप,
चार विटांची चूल,
वेगवेगळ्या अँगलचे फोटोज्,
प्रत्येक दगडाच्या आकाराचे आकर्षण,
शंख शिंपल्यात दोघांच्या मौल्यवान नात्याची कल्पना,
नारळाच्या झाडांना पाहून ‘नातं इतकं उंच आणि अतूट जपायचं’ याची वचने…
चारी बाजूंना दगड ठेवून त्यांना दोरी बांधून डोक्यावर छपराची कल्पना…
अन् दोघे रात्रीचं कामावरून घरी आल्यावर चुलीवर जेवून मऊशार गादीवर खालून दगडांचा बाज करून एकमेकांच्या मिठीत झोपी जायच्या गोष्टी… सगळं ‘कहो ना प्यार हैं’च्या बीचवरचं…
सगळं शब्दिक स्वप्नवत जादुमय फिलिंग!
नवं विश्व साकार करणार असल्याचं फिलिंग!

किनाऱ्यावर बसून लाटांचा नवखा स्पर्श हळूहळू संपूर्ण अंगभर भिनू लागतो, शिंपल्यात मन घट्ट रुतावे इतकं सूक्ष्म जग आपलं भासू लागतं, कुण्या भटक्याने त्याचा मुक्काम शोधून घर बांधण्याचं स्वप्न पहाव इतकी ताकद त्या दोघांत क्षारांनी चिटकावे तशी वाढत जाते…
भटक्या होऊन घुटमळू लागतात ते त्या समुद्र किनारी, तो क्षारांतला लाटांचा स्पर्श थेंबाथेंबाने आत ओढणारा असतो, एखाद्या नशेच्या स्वाधीन व्हावं अन् त्याची कल्पनाच तुम्हाला नसावी,
पण त्याचवेळी तळपायाला लागणाऱ्या लाटांच्या गुदगुल्यांमध्ये धोका निर्माण व्हावा नि तुम्हाला कळावे,
किनाऱ्यावर घुटमळत राहून चालणार नाही, आता समुद्रात उतरावं लागणार.
हे उतरणं उत्सुकता अन् ओढीपोटी इतकं मोहाच नि आकर्षक वाटतं, तेव्हाच समुद्राने अलगद आपल्या नकळत आपल्याला स्वतःत ओढून घेण्याचा अतोनात प्रयत्न केलेला असतो.
तो प्रयत्न त्याचा सफल काय होतो, मोहाच्या मागे पळत आपण समुद्राच्या स्वाधीन काय होतो, तिथे थांबता येणारच नसतं माहित असून समुद्र इतका शरीराला चहूबाजूने घेरून घेतो, आपण हालचाल करून बाहेर पडण्याच्या मार्गाकडे डोकावून बघतही नाही. मोह कधी प्रेम होऊन समुद्रासम ताबा घेण्याचं स्वप्न पाहतो, आपल्यालाही कळत नाही.

किनारपट्टी वरचा वेळ म्हणजे जग जिंकण्याची फिलिंग असते.
मध्यावर आल्यावर खरी परीक्षा असते,
प्रेमाच्या समुद्रात जास्तवेळ पोहता येत नाही, हे माहीत नसतं…
नावाडी बनता आलंच तर बात ऑर हैं नाहीतर …
~ पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error
Tags:

1 thought on “प्रेम अन् समुद्र!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *