वीस ते पंचवीस वर्षे हा काळच असा आहे, जिथे आपला जन्म होतो… कारण तेव्हा आपण स्वतःचं ‘अस्तित्व’ ‘असणं’ तयार करण्यासाठी खऱ्या अर्थाने धडपडू लागतो.
आताच्या घडीला मला कैक जुनी रक्ताची नसलेली नाती म्हणतात, “खूप खूप बदलली तू, बोलत नाही आधीसारखी. तुला तर वेळच नाहीये आमच्यासाठी”
पण याच्या विरूद्ध जेव्हा कुणी मला म्हणतं की, ” तुला मेसेज करायचा असतो, बोलायचं असतं पण कामात व्यस्त असल्यामुळे मेसेज करणं शक्यच होत नाही, पण आज आठवणीने वेळ काढला आणि सांगावस वाटतंय, तुझं काम खूप छान चालू आहे. लिखाणाला मर्यादांचा उंबरठा लावू नको, ते स्वैर पण काळजीपूर्वक उडू दे.! त्याच्या छटांना केवळ तुझ्याच शब्दांचा मोह आहे, नाहीतर तेही केवळ धुळीत पडलेले शब्द आहेत. त्यांना जपत रहा, तू स्वतःला जपशील इतकं सामर्थ्य आहे त्याच्यात”
मला आतून भारावल्यासारखं होऊन जातं. पोटात गुदगुल्या होऊन स्वतःच्या कामाची इतकी सुंदर पावती मिळते तेव्हा मन गटांगळ्या खाऊ लागतं. त्या क्षणी कळत जरी नसलं की एवढ्या मोठ्या शब्दछटेला उत्तर काय पाठवायचे पण तेव्हा मी त्या व्यक्तीला आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक यंगस्टरला आवर्जून सांगू इच्छिते की, “मी समजुच शकते तुम्ही कामात असाल, आणि हे प्रत्येकानेच समजून घ्यावं… कारण आपला हा नवा झालेला जन्म आपल्याला नीट उभा करायचा आहे… त्याच्यावर संस्कार करायचे आहे. तो मुरवायचा आहे तिशीपर्यंत कारण, त्यानंतर ह्या आयुष्याला घेऊन मिरवायचं आहे … त्यामुळे आज आपलं वय आहे काहीतरी करत राहण्याचं, आयुष्याला मतितार्थाचं सौंदर्य लावण्याचं…!
सतत करायचं काहीतरी, इतकं की सवय लागावी आयुष्याला सुंदर करण्याची. कारण आयुष्य हे त्या पाषाणाच्या शिल्पाकृतीसारखं आहे, पाषाणाला दगड म्हणून पाहिलं तर आयुष्यभर तसेच पडून राहाल पण त्याला शिल्पाकृतीसम घडवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा आयुष्य आकार घेऊ लागतं. या शिल्पाला त्याच्या प्रत्येक दिवसाला मेहनतीच्या छिन्निने कोरावं लागतं… कोरून इतकं गाढे नि तीक्ष्ण करावं लागतं की तिशिपर्यंत त्याची लखलखीत शिल्पाकृती बनेल… एकवेळ तिशीच्या पुढे जाऊन काम करत राहिलं तरी चालेल पण त्या आधी तिशीची सीमारेषा आखा. कारण लहानपण मौज-मस्ती आणि हट्ट पुरवून घेण्यात गेले खरे, पण आता स्वतःसाठी सज्ज व्हावेच लागेल.
कॉलेज संपलं, मित्र मैत्रिणी बनल्या, बॉयफ्रेंड झाले, लव्ह – सेक्स – फ्रीडम लाईफ जगून झाली, एखाद् दोन करत अनेक वाईट अनुभव आले. पण आता मैदानात उतरावं लागणार, खेळावं लागणार आणि बागडावंही! कारण हा खेळ सोपा नाही, कारण या खेळण्याच्या स्पर्धेत अडकलेला माणूस बागडणे विसरून केवळ जिंकत जातो, जिंकणाऱ्या गड्याला हरण्याची सवय नसते आणि हे पराभवाचे सावट जर तिशीला त्याच्या नशिबी आले तर तो जीवनाशी हरून उन्मळून पडतो.
त्यामुळे स्पर्धेत टिकून राहत बागडून खुश राहणं महत्त्वाचं !
हे असं आयुष्य ना आपण आपलं आपल्याला गिफ्ट द्यायचं आणि त्यासाठी खूप मेहनत करायची. एवढी की, जेव्हा आयुष्य सोडायची वेळ येईल तेव्हा बाहेरून केवळ अलगद लावलेली शेवटची कडी कुठल्याही तोरणाशिवाय खुलून दिसेल …
शाळा, कॉलेज, इंटर्नशिप, सेंड ऑफ, निकाल सगळे दिवस संपलेय…
वेलकम टू असली दुनियादारी…
खेळ खरा सुरू होतो, जन्म मिळालेला रोज काहीतरी दुःख टाकतो.
नोकरी मिळत नाही, मिळाली तर मुलाखत फोल ठरते, मुलाखत यशस्वी पार पडली तर बॉस खडूसच्या खडूस निघते, बॉस खडूस नसली तरी कामाचा लोड वाढतच जातो. सुट्ट्यांचे गणित जुळत नाही, जेवणाचे तीन तेरा वाजता, झोपेचा बोर्या वाजून पित्त आपल्या मानगुटीवर बसून आयुष्याचा खरपूस भाग चटके देऊ लागतो.
पण हे दिवसच कित्ती बहरलेले असतात. त्यात सगळ्याच गोष्टी, त्यासोबत जोडलेल्या सगळ्याच भावना कित्ती रंगीत वाटतात. काहीही घडत असेल तरी त्यात नाविन्य आणि रंगस्वरांचा फवारा सोडल्यासारखं सुख असतं.
तरी कधी कंटाळलोच आयुष्याला तर बेरंग म्हणत म्हणत आयुष्यात एकानेक लोकांशी भेटतो. काय ते माहीत नाही पण हे वय फुल टू एनर्जीने भन्नाट असतं. सगळ्याच गोष्टी आवडत नाही पण सगळ्याचा कंटाळा येतो असंही नाही.
याच दिवसांत एक बहारदार जॉब माझ्या वाट्याला येतो…
येताना रोज सकाळी साडे आठच्या बसची वाट पहायची, नि एकदा का प्रवास सुरू झाला, बसायला जागा मिळाली की मग मात्र, कानात हेडफोन्स नाहीतर रविश कुमारच ‘इश्क में शहर होना’ नाहीतर, नुसतच डोळे मिटून गुडूप शांत होऊन दुतर्फा रस्त्याला आणि निसर्गाला वाऱ्यासह सरकून जाताना पहायचं! रोजच्या दिवसात सकाळच्या वेळेत बसने प्रवास करताना गाण्याच्या एकाच दिल खेचक ओळीत हेडफोन्स कानात घालून दूनियेपासून वेगळा जमाना शोधत राहायचं.
असं करत जेव्हा बसमधून उतरून जॉबच्या ठिकाणी पोहोचायचे, अहाहा…
सहाजण टेबलवर बसलेले… सगळे ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त… बाहेर बसायला सोफे, ऑफिसमध्ये एका कोपऱ्यात दिव्याचा प्रकाश, चॉकलेटचा बॉक्स, पेन पेन्सिल, कोऱ्या कागदांचा शुभ्र समुद्र, डोकं शांत करणारं संगीत आणि सोबतीला माझा लिखाणाचा जॉब…
याला जॉबचा शिक्का नाही लावणार कारण माझा बॉसच मुळात यंग, हँड्सम आणि क्रिएटिव्ह आहे. “त्याचं मन यंग आहे, तो प्रत्येकाचा ड्रीम बॉस आहे.
त्यामुळे अपून लकीच हैं|”
इससे ज्यादा बेहतर काय असेल, अंदाज लावू शकाल?
तर ते म्हणजे मला माझं काम आवडतं… कारण माझं काम माझी जबाबदारी आहे पण ते माझं एकमेव अस्तित्व आहे…
ही जबाबदारी पेलणं तेही इतक्या सुंदर ठिकाणी याहून सुख नसतं! इथे मला माझं मोकळं आकाश आहे जिथे एखादं गाणं आवडून मी ते मला आवडणाऱ्या बेसुऱ्या आवाजात गुणगुणू शकते, गाण्यातला एखादा शब्द माझ्या लिखाणात आणून त्या कंटेंटला चार चांद लावू शकते, अगदी ऑफिसातल्या कुणाच्याही अध्यात मध्यात न जाता.
तेव्हा स्वतःचा हेवा करत वाटते,
बड़ी बड़ी उंगलियों में अटकी पेंसिल की निफ से लिखती जाती हूं दिल से उंगलियों पर आए अल्फ़ाज़,
क्या सच में इतना खूबसूरत सफर होता है किसी मुसन्निफ़ का?
तसचं इथे फक्त प्रेम आणि काम आहे… सगळे यंग आहे, कोणीच कोणाला जज करत नाही, जे ते स्वतःचे काम आणि पॉझिटिव्हीटी शेअर करणारा आहे … या अशा वातावरणात माणूस स्वतःला सुखी बघतो, त्याचे डोळे, कान, नाक, मन आणि आत्मा हे सगळे अशा सुखाजवळ गोळा होतात आणि तेव्हा मग काम तितकंच लोभस नि परिपूर्ण घडत जातं.
पण नोकरी करतानाही माणसाचं मन खूप हेलकावे घेत असतं. कारण एकीकडे अच्छे दीन मध्ये मला नोकरी मिळतेय, पण त्या नोकरीत माझं आर्थिक बजेट पूर्ण नाही होत. माझ्या आयुष्यातील स्वप्नांच्या आड ही कोलमडणारी अर्थव्यवस्था येते. नोकरीचा टॅग वाईट असतो. हळूहळू आवडणारं ऑफिस, काम, वातावरण सगळं नेहमीच होऊन जातं मग कामात एखादा पूर्ण दिवस मन लागत नाही, एखादं काम तीन चार दिवस होतच नाही. स्वतःच्या छाताडावर स्वतःचं ओझं होऊ लागतं,
तेव्हा या गर्दीत सुख असूनही कुणीच जगतय असं वाटतं नाही… स्पर्धा शून्याची शून्यापर्यंत असते तरीही आपल्यालाही हवंच असतं हे सगळं. मग अशावेळी मला एक कळतं, सुखी राहायचं असेल तर आवडी निवडीच्या खेळात खेळायच नाही, जे आपल्या समोर येईल त्याच्याशी खेळायचा.
मग पुन्हा सुरू होतो सुई बनून पुन्हा पराभव झालेल्या नोकरी करणाऱ्या तरुणाचा प्रवास, … असं दर काही दिवसांनी हे व्हिटॅमिन संपून जातं पुन्हा आशा आणि उमेदीचे रक्त स्वतःच्या स्वप्नांमध्ये भरून पुन्हा स्वतःला उडण्याचं बळ देऊ लागतो.
तेव्हा हळूहळू आठवत जातो पुसटसा राजेशाही दिवसांचा थाट, मन आतून कुरतडून ओरडत राहते<
उन परिचित रास्तों पर अब कितनी यादें खेलती रहती हैं।
ऑफिस की बंद घुटन में जाते वक्त इन्हीं आंखों से ताकते रहती हूं।
सारसबाग से लेकर एस पी कॉलेज तक सभी जवान लगता हैं।
नजर हटती नहीं, लेकिन उसका हिस्सा ना होने का ग़म जरूर छलता हैं।
ऑफिस का बोझ थमाए बैग को देख लगता है क्या जरूरी हैं खून बेचकर सुकून ढूंढ़ना?
ख्वाब बेचकर पैसा कमाना?
वक्त बेचकर जिंदगी को अपाहिज बनाना?
जवानी बेचकर ऑफिस जाना?