एका अशाच अबोल संध्याकाळी प्रेमभंग झाल्याचं मला पुसट आठवतंय. तोपर्यंत माझ्याकडे डायरी हा नेटका प्रकार नसल्यामुळे वहीची रिकामी पाने फाडून मी आमच्या भेटीबद्दल लिहायचे, त्याच्या एका नजरेबद्दल दोन पानं लिहिली जायची.
आमच्यात आठवड्यातून एकदा होणाऱ्या दोन शब्दांबद्दल लिहायचे. तशी नव्वदीच्या पिढीला सवयच होती, प्रेम थेट करायचं पण अव्यक्त. त्यामुळे माझी व्यक्तता या पानांवर व्हायची. म्हणजे मी त्या प्रेमाला जगातल्या सगळ्यात महागड्या उपमा द्यायचे, त्याची दृष्ट काढायचे त्याच्यावर शाई सुद्धा सांडवायचे. तसं कोवळ वय होतं माझं, पण त्याचं नव्हतं. तोही माझ्याच वयाचा होता पण त्याला मुलींबद्दल जे वाटायचं ते कोवळ्या वयातलं कधीच नव्हतं. तो प्रेमात पडणारा नव्हताच. त्याला लोकांना दाखवायला म्हणून प्रेमात पडायचं होतं. पण प्रेम आंधळं असतं रे. म्हणून मी त्याच्या या दोषासकट त्याला स्वीकारायला तयार झाले होते. म्हणून मी त्याला पत्र लिहिलं. पत्रात त्याचं नाव लिहिलं नाही, उगाच लाज वगैरे वाटायची. अल्लड प्रेम हो !
मग मायना लिहायला घेतला, त्याला म्हटलं मला माहितीये तुझ्या आयुष्यात प्रेमाची जागा सिम कार्ड सारखी आहे. ते सिम कार्ड बदलण्याच्या शोधात असतो. पण मी सिम कार्ड नाही, तुझ्या आयुष्यात फोन बनायला तयार आहे.
आयला, याच्या तीन चार वर्षांनी माझ्या लक्षात आलं की साला, याचा अर्थ असाही होऊ शकतो की तो फोन बरोबर तर राहील आणि वर सिम कार्डही बदलत राहील. पण पहिलं प्रेम अल्लड असतं हो! त्याला लॉजिक नाही मॅजिकवर जगायचं असतं. तर असं ते पत्र मी त्याला पाठवायचे ठरवलं. पण लिहून ठेवलेला तो कागद तो समोर दिसला की काढायचे आणि पुन्हा हिम्मत व्हायची नाही. मुलीने कसं ना प्रपोज करावं? यामुळे मी प्रत्येकवेळी तो कागद काढतेय ठेवतेय हा मेंघळट प्रकार जवळून बघणारी माझी एक मैत्रीण होती. शेवटी तिने एकदा मराठीच्या लेक्चरला माझ्या नकळत तो कागद त्याच्याकडे सरकवला. त्याच्या उडाणटप्पू एटिट्यूडमुळे माझ्या मनात धडधड होऊ लागली. हृदय फार नाजूक असतं. त्याने त्या पत्राचा वर्गभर धिंडोरा पिटवला. त्याच्या मित्रांनी मला वहिनी म्हणून चिडवायला सुरुवात केली. प्रेम अल्लड असतं, त्याला कळत नसतं हे चिडवणे चांगल्या हेतूने की वाईट. त्या पत्रातून मला काही उत्तर मिळालं नाही. पण माझं त्याला बघणं सुरू होतं. त्याला आवडत होतं माझं त्याच्या प्रेमात पडणं आणि त्याच्याकडे बघत राहणं. पण त्या पत्रानंतर त्याने काहीच पाऊल उचललं नाही. मी सुद्धा तो विषय सोडून देऊन इश्क हैं ना, इश्क करेंगे, दूर से ही सही। असं मनाला समजावलं.
पण त्या काळातही त्याच्या मित्रांचं मला चिडवण सुरू होतं. खरतर मी ते एन्जॉय करत होते. पण एक दिवस त्याच्या मित्रांमधला एकजण माझ्या फेसबुकला मित्र झाला. तेव्हा त्याने या चिडवण्यामागच्या हेतू बद्दल सांगितलं. शिवाय तू ज्याच्यावर प्रेम करते तो तुला अजुन काही दिवस असं झुरत ठेवून एक दिवस एकट्यात घेऊन जाणार. हे ऐकून मी सुन्न झाले. कारण माझं प्रेम जरी खरं होतं, पण त्या प्रेमाचं मन इतकं कुरूप असेल कधी विचारही केला नव्हता. तो प्रेमाचा नाही, शरीर सुखाचा भुकेला होता. त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून कुठलाच सेकंड थॉट मनात न आणता माझ्या मनात त्याच्याबद्दल तीव्र तिडीक बसली, ती आजतागायत!
पण त्या संध्याकाळच्या अस्वस्थतेत मी भयंकर प्रेम तुटण्याच्या भावनेत अक्षरशः बुडाले होते. मला हे जगच दुष्ट वाटू लागलं होतं. मलाच निर्मळ प्रेम का नाही मिळू शकत असे अनेक बालिश प्रश्न मनाला सतावत होते. मीच त्या लायक नसेल म्हणत स्वतःला कोसत होते, कदाचित मी खूप सुंदर असते तर त्याने प्रेमही केलं असतं अशा खोट्या भ्रमात मी स्वतःला कमी लेखत होते… या काळात मी कॉलेजला जाणं कमी केलं होतं. तेव्हा सहजच टीव्हीवर हम दिल दे चुके सनम सुरू होता. सगळी फॅमिली मिळून हा चित्रपट बघत होतो. त्यात ज्या पद्धतीने वाळवंटात सलमान खान त्या गाण्याच्या आवाजासोबत रडत राहतो, त्याचं रडणं आणि केकेचं प्रेम भंगाच्या शिगेला पोहोचून ते गाणं म्हणण्यात मला मीच दिसू लागले होते. मन रिपीट मोडला प्रश्न करू लागलं होतं, ऐसा क्या गुनाह किया? सतत एवढं एक लिरीक्स गाऊन मनात असंख्य शक्यतांची आरोळी सुरू ठेवली होती. ते एक वर्ष मला त्याच्या प्रेमात मरण्यात गेलं. मग बिते लम्हे पासून अलविदा गाण्यांना अर्थ यायला लागला होता. तो जेव्हा गातो ‘आज भी वो पल मुझे याद आते हैं’ तेव्हा फक्त नि फक्त डोळ्यासमोरून कॉलेजचा तो काळ जातो. या दरम्यान अनेक घटना घडतात. पण तो ओलावा कोणाशी तरी जोडला जातो. केके नकळत जोडला गेला. प्रेम ही सगळ्यात कोवळी भावना असते. त्या भावनेला समज द्यायला कित्येक वर्षे कमी पडतात. बर्बाद करने के लिए उसका मरना जरूरी नहीं, जिस दिन आपने इश्क ठुकरा दिया, हम जीकर भी मर गए थे।
या टोकाच्या भावनेला केकेने कॉलेजच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणलं आणि त्या शेवटच्या दिवसात मला आठवून गेले कॉलेजच्या जगात मी प्रेमात अख्ख वर्ष वाया घालवलं. पण या सगळ्यात एका बाजूला माझा फ्रेंड्स कट्टा नेहमी सोबत होता. त्यांच्या असण्याने मला प्रेमात हरल्यासारख वाटायचं नाही. मग ठरलं होतं, कॉलेजच्या शेवटाला सगळे फोटोज् एकत्र करून यारों दोस्तीचा रंगीन माहोल द्यायचा आणि तो असा द्यायचा की डोळ्यातून आसवांचे पाट वाहिले पाहिजे आणि कॉलेजच्या दिवसात शब्दशः रडतो आपण. ते ढसाढसा रडणं, प्रेमात आकंठ झोकून देणं, प्रेमभंगात स्वतःला बरबाद करूनच दम तोडायचा, रोमान्स करताना त्या माणसाला दुसऱ्या स्पर्शाची भूक राहिली नाही पाहिजे इतक्या ठामपणे आयुष्यात सगळ्या भावना जगायच्या. ते तसं जिवंत जगायला केकेने शिकवलं. तो शांततेत गायचा, एखादा रँडम व्हिडिओ लावायचा. पण ते साधेपण मनाला विचारात मग्न करून टाकायचं. त्याच्या असण्याने खरंच भावनेची कदर करायला शिकले. भावनांना आवाज दिला.
प्रत्येक अत्युच्च भावनेला आधार देणारा केके, प्रेमभंगातून सावरायला शिकवणारा केके, फेअरवेल यारों दोस्ती बडी ही हसीन हैं शिवाय अधुरं असणारा केके. ज्याला प्रत्येक नव्वदीच्या तरुणाईने कधीच पूर्ण नावाने नाही तर त्याच्या टोपण नावाने मित्र म्हणून जवळ केलं. केकेने कधी इम्रान हाश्मीच्या भूमिकेतून प्रेमाला रोमँटिक बनवलं तर कधी सलमान खानच्या रडण्यातून प्रेमभंग झाल्यावर आयुष्याचा कसा वाळवंट बनून प्रेमासाठी माणूस तडपत राहतो हे त्याच्या ‘तडप तडप के इस दिल से’ गाण्यातून सांगितलं.
केकेचं जाणं काही दिवसांनी विसरूनही जाऊ, पण त्याच्यासाठी जी हळहळ आज अनेकांच्या बोलण्यात दिसतेय, तो केके प्रत्येक पिढीत जिवंत राहील. कारण काही माणसं कलेने फेमस होतात, नाव दुय्यम असतं. केकेचा आवाज पोहोचलेले हजारो लोक असतील पण त्याचा चेहरा ओळखणारे फार तुरळक, हा त्याच्या आवाजाचा सन्मान आहे. पण आज जे व्यक्त होतोय, ते त्याच्यापर्यंत पोहोचायला हवे होते असे नेहमी वाटतं. कुठलाच माणूस त्याच्या कामाची पावती न घेता सहज निघून जाऊ नाही. कुठलीही भावना त्याच तीव्रतेने कशी अनुभवायची हे आत्मसमाधान केकेने दिलं.
त्याच्यामुळे मला कळत गेलं, दोन्ही बाजूंनी प्रेमच असायला पाहिजे. एका बाजूने आकर्षण दुसऱ्या बाजूने प्रेम असा तराजू तोलता येत नसतो…
इश्क महसूस करने की अहमियत सिखाई तुमने।
आज जाने के बाद भी तुम्हारे आवाज की लाखों ‘दिल इबादत’ करते रहेंगे।
-पूजा ढेरिंगे
खुप सुंदर लिखाण 💜👌
सुंदर…❤️
काही लोक शरीर सोडतात, पण त्यांच्या कलेचे ठसे आपल्या हृदयाच्या सुपीक जमिनीवर अलगद उमटून जातात !❤️🌸