दिवा माजघरात लावला होता,
प्रकाश त्या पारावर पडत होता…
त्या पारावरच्या ओट्यावर ते हात तिचे अस्थिर होत होते. त्याचा हात तिच्या हाताच्या एका इंचापासून दूर होता…
नव्या नव्या लग्नाचा नि अरेंज लग्नाचा हा अडखळताना होणारा प्रवास होतो. अहोंची जोड काय ग? एवढ्या पर्यंतच त्यांची ओळख होती… मुलाला दत्तक घेऊन आल्यानंतर ते मुल आणि त्या घरातले लोक जसे सैरभैर होतात, तसा हा वळणाचा नि शेवटाला कुठे घेऊन जाईल याचा थांगपत्ता नसलेला रिवाज होता…
ती घरात येते तेव्हा अशीच दत्तक मुलीसारखी लाजरी पण अडखलेली असते, पाय घुटमळत असतात, नव्या जमिनीवर, भिंतीत, घरातल्या माणसांच्या बघण्यात नि कैकदा नवऱ्याच्या हालचालींत…
पण त्या रात्री पाऊस होता, रात्र अडखळणारी असली तरी बाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबानी ऊब पाखडलेल वातावरण तयार झालं होतं, थंडीचा कडाका कायम असला तरी मनाच्या त्या कप्प्यात दोघांच्या भावना दाटून येत होत्या… कधी घरचे झोपताय असा संतापाचा विचार डोक्यात गरगर फिरत होता, त्याचं तिच्याकडे बघणं आणि तिचं त्याच जुन्या पद्धतीने लाजणं चालू होतं. लाजण्यात त्याला जे वाटतंय तेच तिला वाटतंय याचा होकार होता…
नि तो क्षण मावळतो जिथे घरचे झोपतात, पण तो क्षण उजळतो जिथे ते दोघे एकमेकांच्या जवळ येण्याचा कोपरा शोधता.
एकमेकांच्या जवळ बसण्याची ती पहिलीच वेळ असते. ती हिरोईन ने कंबर दिसते म्हणून खांद्यावरचा पदर सावरत कंबरेला तो तुकडा जोडावा तशी ती कपडे सरसावून उघड्या अंगाला झाकण्याचा खोटा प्रयत्न करते. कारण एकमेकांना मनाचा अंदाज येत नाही, जवळ जावं? की नको? या प्रश्नचिन्हांना जोडून शरीराची ओढ येते…
एकमेकांच्या इतक्या जवळ असताना वाऱ्याचा झोत उफाळून येतो, तिच्या केसांवरून त्याच्या ओठांना स्पर्शून जातो, तिला उबेची ओढ लागते, तो ओठांच्या पायऱ्यांनी तिला जवळ करण्याचे तंत्र मनात घडवू लागतो, हे अंतर एकमेकांचे शरीरात नसले तरी मनात निर्माण होते.
हेच अंतर तोडायचं होतं, प्रेम विनाकारण करायचं होतं!
इजहार जमत नव्हता, मन अशांत होते.
गोंधळ उरी दोघांच्या, काहूर माजले होते. फॉर्मलिटीच्या सभा आता उन्मळून पडल्या होत्या. त्या पारावरून घोंगावत येणारा तो रोमान्स दोघांना एकत्र आणत होता… पाराच्या वडाच्या फांद्या एकमेकांत गुंतण्याचे शिकवण्या देत होत्या, दोघांची नजर कुठेतरी बाहेर काहीच न शोधत काहीतरी शोधण्याचा लज्जित प्रयत्न करत होती. त्या दोघांना दरवाजातून तो वड दिसत होता… वडाच्या पारंब्यांना एकमेकांशी लपेटताना पाहून दोघांची मन उत्तेजीत होत होती…

एक श्वास वेगळा होता, एक रात्र आज काळी सावळी होती. त्या रात्री पाऊस होता, त्या रात्री हवेचा आविष्कार होत होता, विजांचा संहार एकमेकांच्या शरीरात होत होता, तिच्यातली सर, त्याच्यातल्या पावसाला पडायला भाग पाडत होती.
ती थांब म्हणत असली तरी, तो अधीर झाला होता … तिच्या साडीचा पदर सुटा झाला होता, बाहेर डोकावणाऱ्या त्या ब्राच्या स्ट्रापने तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नव्हता…
भावना उर भरून वाहत होत्या, मन बावरे कल्पक होऊन गगनभरारी घेत होते.
या अशा घाईच्या श्र्वासांच्या रातीत नकळत त्यांनी जन्म दिला एका नव्या निर्णयाला… !
एका नव्या नात्याच्या पायरीला!
एका जादुई प्रवासाला!
अलवार, मनाचा काहूर शेजारी ठेऊन तिनं त्याच्या कुशीच्या टोपलीत डोकं टेकवलं नि त्याच्या मिठीचे स्वातंत्र्य हक्काने आपलंसं केलं. त्या उन्माद मादक मीठीला त्याच्या आकर्षणाचा स्पर्श झाला… नि नकळत त्या पावसारुपी जोडीदाराच्या मनात विचार आला, माझ्या हक्काची स्त्री ही अशी दिसत होती खरे?
किती गोजिरी, मोहक नि सुखावणारी…
तो पारावरच्या झाडाला लटकलेल्या चंद्रातून नेमक्या तिच्या चेहऱ्यावर पडलेल्या चेहऱ्याला शून्यात पाहू लागला…
अधीर मन आता बधीर होऊन शांत होण्याचा प्रयत्न करू लागले पण असंभव ते प्रेमाचे वारे त्यांच्याच दिशेने वाहू लागले. लागलीच त्यानेही प्रेमाची जबाबदारी घेत, त्याच्या हातांच्या बाहू पाशांनी तिच्या प्रेमाला मिठीत घेतलं नि गुंफून टाकली त्याच्या कुशिशी तिची मिठी !
एक प्रवास या सावळीच्या राती अनंताचा सुरू झाला… ! जो अनोळखी प्रेमापासून, अगतिक स्पर्शाच्या संभोगापासून ते संसाराच्या संदिग्ध समाधीपर्यंत घेऊन गेला…
– पूजा ढेरिंगे