माझ्या विळख्यातली ‘ती’

  • by

माझं ‘तिच्या’शी बोलणं झालं आज.
ही आमची तिसरी ओळख होती. पहिली ओळख तिच्या कामातून मला झाली होती. दुसरी ओळख मी तिच्याही नकळत सोशल साइट्सवर तिला शोधून केली होती. माणूस एखाद्याकडे खेचला गेला की त्याची संपूर्ण छाननी करूनच बाहेर पडतो. मीही सुरुवातीला तिला वरवर ओळखलं होतं. पण मध्ये खूप काळ लोटला होता. मी विसरूनही गेले होते.
पण आज अचानक दिवसाच्या ओघात ती मला दिसली.
रवीने तिच्याबरोबर असलेला एक सुंदर फोटो आणि तिच्या कर्तुत्वाची कहाणी टाकली होती. रवी आमचा म्युच्युअल फ्रेंड होता.
मला ती आठवली. ती सर्वसाधारण नव्हती पण खुपही फेमस नव्हती.
पण ती  माझ्यासाठी फेेेेमस होती.

परंतु तिची नजर, तिचा दृष्टिकोन, तिचे विचार माझ्यापर्यंत पोहोचले होते, ती माझ्या मनात तितकी फेमस झाली होती.
मी स्वत:च्या विश्वात तिला ‘रुमझूम म्हणू लागले होते.
रुमझुम दिसायला इतरांसारखीच होती. तसे सगळेच एकमेकांसारखे असतात. पण झूम केलं की मग खरं वेगळंपण दिसू लागतं.
शरीरयष्टी जाड, नाक बसकं, भुवयांना विरळ केसांचे सौंदर्य, केसांची कुरुळी बट, त्या गरगरीत मुखड्यावर ओघळत आलेली. पण तिची त्वचा वेगळी होती, चमचमीत होती. मी त्या फोटोला न्याहाळत होते, एक सेकंद परतून मी पुन्हा त्या चेहऱ्याला पाहू लागले. एक सुरकुती नाही, ना कुठलाच फुटकळ स्कार… एक आयुष्य इतकं साफसूथरं? कदाचित ते वरतून दिसणारं असावं.?पण म्हणजे एखाद्या गोल गरगरीत कोऱ्या कागदावर, उशीर आहे डोळे, कान, नाक आणि त्या भुवया ठेवण्याचा.? एवढं सुंंदर असतं कुुणी?

माझ्या मनात तिचं व्यक्तिमत्व आधीच उच्च स्थानावर होतं, आता तिच्या बाह्यांगाला मी पाहत होते. तिचा साचा मला पहायचा होता. म्हणजे मी जजमेंटल न बनता तिला बघणार होते, जणू एक संपूर्ण यशस्वी अन् वेगळं व्यक्तिमत्व कसं असू शकतं याच कुतूहल मनात होतं, मी तिला पहात गेले. ती एक कॅमेराबरोबर खेळणारी अन् त्यातून जादू निर्माण करणारी निर्माती होती. तिला तिच्या आयुष्याच्या मर्यादा नव्हत्या. कुठल्याच नाही! हे माझ्या जमण्याच्या बाहेर होतं कारण मी माझ्यातून एखादा उडण्याचा, नि चौकटी बाहेरचा निर्णय घेऊन बाहेर पडणारच असते, पण बाहेर लगेच माझे घरचे उभे असतात. त्यामुळे कुठल्यातरी आचारसंहितेने आखलेल्या आयुष्यात , कलेच्या आझादीला मर्यादा येतात. त्यामुळे बहुतेकदा माझी कला घुस्मटत, गटांगळ्या खात असते.  
तिला मोकळं उडायचं असतं ते हवं तेव्हा. ! त्यावेळी माणसांच्या आयुष्यातल्या सामाजिक बंधनाचा तिला राग असतो. माझंही तेच होऊ लागलं होतं. पण मी रुमझुमला बघायचे. ती मुक्तछंदी होती. स्वतःच्या स्वप्नांना अलगद जपणारी. तिच्या स्वप्नांना स्वतः आधी आदर देणारी!
अशावेळी ते असतं ना, आपलं स्वप्न दुसरं कुणी जगत असलं की आपण त्याला दृष्ट लावत नाही, त्याच्या स्वप्नात आपलं स्वप्न पूर्ण व्हायची ओढ बघत असतो. मी यातच वाढत होते.       हळूहळू रुमझुम आणि माझं वरवरचं बोलणं होऊ लागलं होतं. रुमझुमला माझी कला, माझं व्यक्त होणं आवडत होतं. ती मला कौतुकाची थाप देत असे. मी भारावून जात असे. तिच्या आयुष्याशी माझा संबंध होता की नव्हता मला आजही माहीत नव्हतं. पण ती बोलली की मला छान वाटायचं. हुरूप यायचा काहीतरी लार्जर दॅन लाईफ करण्याची प्रेरणा यायची. तिचा आधार वाटू लागला होता. एका मित्राचा वाटतो तसाच तिचा आधार !याच काळात, काल माझा दिवस एका मित्राच्या विश्वासघातामुळे वाईट गेला, त्यामुळे एकांतात खुप चिडचिड करून शेवटी एक दुखी स्टेटस टाकून मी झोपी गेले. सकाळी पाहते तर रुमझुमचा मेसेज…. :O आणि तोही असा कोणता फॉर्मल मेसेज नव्हता. 
मी ना आधी डोळे चोळत चोळत लगेच त्या मेसेजला टॅप करून वाचू लागले. “हे नाजनी ( ब्युटिफुल), काय झालं ?एवढं नाही मनावर घ्यायचं, आयुष्य आहे क्षण उडून जायलाच असतात… क्षण उडतात, दुःख का कवटाळून ठेवायचं?आता उगाच फॉर्मलिटीमध्ये अडकणार नाही. दुःख करून घे एक दिवस दोन दिवस यापलिकडे नाही. त्याला अर्थ नसतो कारण अशी माणसे येत राहतात, जात राहतात. आयुष्याला वाऱ्यासारख मोकळं सोड.!”     मला म्ह्णजे काय बोलावं, काय लिहावं, काय मांडावं सुचेना. जे जे लिहीत होते कीबोर्ड हातातून सुटत होता. पण मला शब्द आणि रचना आणि तिच्यासाठीचां पहिला मेसेज खास लिहायचा होता. कसलीच माझ्या व्याकरणानुसार चूक नसलेला संदेश,”उम्मम… सॉरी रुमझुमा,हे सॉरी माझ्या आयुष्यातल्या त्या व्यक्तीसाठी ज्यामुळे माझा वेळ वाया गेला. पण त्याच व्यक्तीला शुक्रियाही म्हणेल ज्यामुळे आज तुझा संदेश या इनबॉक्सपर्यंत स्वतःहून आला. तोही साधा संदेश नाहीच, तुझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा ! 
आणि काही व्यक्ती असतात ना शिंपल्यांसारखे. अपेक्षेने आपले केलेले शिंपले, सुटत नाही सहज. 
पण आता लाटा बनून समुद्रात ढकलून देईल हा शिंपल्यांचा कडवटपणा. तू म्हणतेय नं, खरंय वारा आहे हे आयुष्य! तूच …! “आमच्या दोघींच्या आयुष्यातला हा एकमेकींना पाठवलेला साजेसा सुंदर सुबकतेने पाठवलेला पहिला मेसेज… त्यानंतर आम्ही सुरू जे झालो… ते कधी इतक्या शाब्दिक अन् स्वच्छ भाषेत बोललोच नाही. अनोळखीतून मैत्री झाली,मैत्रीतून चेहरा बघणारी भेट झाली. भेटीत दोन नवे विचार, नवे चेहरे आणि नवे आयुष्य अन् त्या आयुष्यातली कथा भेटल्याचा आनंद होता. 
भावना व्यक्त करून, खाऊन, पिऊन घरी गेल्यानंतर मेसेजिंग वाढलं, घट्ट झाले धागे. सगळं असं कोणत्यातरी नव्या जगातलं वाटू लागलं. दोघींना लाल रंग आवडायचा नाही, काळाच्या प्रेमात पडलो. पाणीपुरी नाही, दालचा आम्ही वेड्यासारखा खाल्ला. झेड ब्रिजवर नाही रिकाम्या रस्त्यांवर मध्यरात्री  बेफिकीरीने फिरलो. तिच्या कमरेला माझ्या हाताच्या वळणाने आपलंस करण्यात मला तिचा रस्ता होण्याचं सुख मिळू लागलं. दोघींच्या भावना, प्रतिसाद, हसणं बदलू लागलं. हसणं आता लाजणं होऊ लागलं होतं, चिडणं आता मनवण्यासोबतच आलं होतं.
मैत्री की मितवा यात अडकत कसं गेलो कळलच नाही आम्हाला.
पण मुलगी मुलगी? प्रेम? श्या.! ए काहीही! हे असं नसणारे. हो नं ? आम्ही दोघी एकमेकींना समजावत राहिलो. चार दिवस नीट बोलून त्यातला एखादा दिवस अचानक ती बोलणं बंद करायची, आणि तसच अचानक एखादा दिवस मी बोलणं बंद करू लागले. ‘सवयींचे आजोळ महागात पडणार’ म्हणून आम्ही हे अंतर एकमेकींत आणत होतो. पण तरीही एकदा प्रेमाचं स्फुलिंग चेतलं की, त्यातून मग काहीच दाबलं जात नाही. त्यातून केवळ ते प्रेम उफाळुन येणं असतं. त्यामुळे हे निष्फळ प्रयत्न एकमेकींना समजत होते. तरीही एकीचीही हिंमत होत नव्हती. माझा ता दूरवर विषयच नव्हता.
मी पुढाकार घेणार नव्हतेच कारण हे ‘आयुष्य’ माझ्या वाट्याला आलं होतं, ते कुठल्याही वळणावर मला ‘पोरकं’ करेल या भीतीने मी त्याबाबत बोलणं टाळू लागले…
आता हा संवाद मला बंद करणं भाग होतं कारण जर तसं केलं नसतं आणि तिच्या मनात तसं काहीच नसतं तर मी आयुष्यभर तिच्या प्रेमात तशीच विचार करत, आलेल्या नव्या आयुष्याला झुरत ठेवलं असतं.
त्यामुळे तिच्या मनातलं जाणून घेण्यासाठी मी तिच्याशी बोलणं बंद केलं.
तिला सुरुवातीला समजलं नाही. ती रोजच्या दिवसांसारखे दिवस ढकलू लागली.
कारण याआधी आम्ही असं चार दिवसातून एकदा न बोलण्याचे खेळ खेळायचो. म्हणून सुरुवातीचे चार दिवस तिने नेहमीसारखे प्रयत्न केले. पण यावेळी चार दिवसांच्या वर जाऊनही मी तिला मेसेज, कॉल केले नाही. आता मात्र मला आतून एका मनाला वाटायचं, तिचा कॉल येईल, ती मला जाब विचारेलच.
नाहीतर किमान मेसेज तरी? मी स्वतःच्या मनाला समजुतीने वेड्यात काढत बसायचे, जर आता मम्मी मला ओरडली नाही तर तिचा कॉल येणार नाही, पण जर मम्मी ओरडली तर कॉल येईल आणि हे असे आणि अनेक प्रकार करून पाहायचे. पण माझे प्रयत्न फसत होते.
पाचवा दिवस फेल गेला.
तिचा कॉल मेसेज आलाच नाही. तुला काय वाटतं? काय करेल ती? तिचं प्रेम आहे?
जर आज पेपर टाकताना पेपरवाल्याचा चेहरा दिसला तर तिचं प्रेम आहे. पण नाही दिसला तर? ते जाऊदे पण तिचा कॉल येईल. येईल ना?… मी अशी एका प्रेमाच्या समुद्रात दोन दगडावर पाय देऊन उभी असल्यासारखी भासत होते, एका दगडावर प्रेम आहे एकावर नाही.
माझा तोल जात होता, पण मोबाईल हातातून सुटत नव्हता. कारण तो क्षण मला वार्यावर उडू द्यायचा नव्हता, जिथे तिची माझ्या आयुष्यात येण्याची चाहूल असेल, एक पहिला हक्काचा श्वास असेल माझ्यात येण्याचा तिचा. तो मी असाच सोडणार नव्हते. सातवा दिवस असाच प्रतीक्षेत गेला. आता दिवसाबरोबर आशा पण मावळत चालली होती. मनातल्या मनात सारखं, ‘संपलं स्सगळ!’ म्हणत मी आशा सोडत होते. तरीही आमचं नातं माझ्या उमेदीचा हात धरून मला धीर देत होती. आता हळूहळू दिवस ढकलायला मी माझे मन कामात गुंतून ठेऊ लागले. तरीही माझ्या चित्रकलेत तिच्या अन् माझ्या अस्तित्वाच्या अप्रत्यक्ष खुणा दिसू लागल्या होत्या. चित्र ‘कपल’चे असेल त्यात मला आम्ही दोघी दिसू लागलो होतो, चित्र ऍबस्ट्रॅक्ट असेल तर त्यातही मला कुठल्याही आकाराने ब्रश फिरताना तुटलेल्या अवस्थेत मी, नाहीतर जोडलेल्या हातांनी आमचे दोघींचे एकमेकींच्या आयुष्यात गुंफलेले हात दिसायचे. मनाचे हेच खेळ सतत चालू होते. दिवस जात नव्हता, रात्रीला आमच्या आठवणी पुरायच्या.
शेवटी आज मी ब्रश हातात धरला. खूप धीराने स्वतःला सामोरं जायचं ठरवलं, तिला विसरून आज ग्राहकाला हवं तसं पेंटिंग देऊ, व्यावसायिक पेंटिंग, त्यात प्रेमाचा अंश नसेल असं पेंटिंग. शक्य होतं? … मी इतक्या मोठ्या विचारांच्या अडचणीत होते, तोच टिडींग… फोनचा मेसेज बॉक्स वाजला. “भेटूया! … उडणाऱ्या वाऱ्यात काही पाखरं एकच झाडावर येऊन बसतात, त्यातलं एक पाखरु ते झाड सोडत नाही.सुटत नाहीच ते झाड त्याच्याकडून. आपल्या ठिकाणी ये.! जमल्यास माफ कर. ” 
माझा चेहरा, माझा हातातला ब्रश त्या चित्रावर कोरडा राहिलेला, तो मेसेज एका हातात ब्रश ठेऊन वाचला. मेसेजचां पूर्णविराम वाचतानाच तो ब्रश नकळत त्या काळ्या रंगाच्या डब्यात जाऊन त्याचं टोक एबस्ट्रॅक टाकत त्या छटेला त्या कोऱ्या कागदावर मोकळं करताना पाहताना जो प्रेमाचा रंग नी श्वास त्या कागदावर उमटला त्याने उमेदीची परमोच्च पातळी गाठली.शेवटी दोघींनी भेटायचं ठरवलं.ती भेट प्रतिक्षेच्या क्षणाची शेवटची आशा होती. मी खूप स्वत:ला मानसिकरीत्या जागेवर ठेवून जात होते.
तिचा नावडता ड्रेस आणि रंग मी घातला. केसांना कुठलेच वळण ना चेहऱ्याला लिपस्टिकचा रंग ओढला. मनात ओघळत असलेले एका ब्रशाचे आनंद, सुख, उकळ्या, प्रेम हे ओघळ होते, पण दुसऱ्या धारेत लगेच तो ओशाळलेला, नाराज अन् तुटलेपणाचा राखाडी रंग होता. त्या कागदाला तो रंग नको होता. आम्ही भेटलो, ती खूप सुंदर, नाही सुंदर नाही ती त्या क्षणी माझ्या आयुष्यातल्या दुष्काळातील, ‘निसर्ग’ होती. तिने येणं हेच माझ्यासाठी सुख होतं यापुढे तिने शब्दही न बोलावा. तिचे अस्तित्वच मला उमेद द्यायला पुरेस असायचे. “सोडून गेली तर आशा कुठून शोधावी? “ मनातल्या मनात स्फुटत असलेलं वाक्य ओठांनी अचानक बाहेर ढकलल.”हाहाहा sssss….” ती हसली. ती हसली की माझं टेंशन जायचं वगैरे मान्य होतं. पण ती वेळ माझ्या महत्त्वाच्या वळणाची होती. मला कुठलेच भाव तिथे नको होते. तिने आल्या क्षणी तिचे मन, तिची भावना, मला कुठल्याच एक्स्प्रेशन फॉर्मलिटी शिवाय सांगावे अशी माझी इच्छा होती. पण तिचं मन काय विचार करते, ते समजणं गरजेचं होतं. ‘का हसलीस?’ मी शांत होत विचारलं. ती – तू वेडी आहेस. मी – बरंमग? ती – कशी आहे ग? आधी मी आले की सुरुवात काहीतरी सुंदर्षा कॉम्प्लिमेंटने करायचीस, आज विसरली? तुझं मुलांसारखेच असणारे, तसच होणारे. मी – जाऊदे ना एवढ्या दूरचा तुला काय फरक पडतो.? ती – फरक ? होना कसा पडेल ? काय पण ना… मैत्रीत कसा बर फरक पडेल.? मी – म्हणजे मैत्री आहे…? आपल्यात.? मी शंकेच्या प्रश्नचिन्हाने तिचं मत जाणून घ्यायचा चुकीचा प्रयत्न करत होते. पण ती शातिर होती. कुठलीच जागा माझ्या गोलात देत नव्हती. “काय ते सांगून मोकळी हो. फक्त एवढं सांग हो की नाही.?हो असेल तर, तेवढी हिंमत कर आणि सगळ्यांसमोर एक लॉंssssन्ग किस कर आणि नसेल तस काहीतर इथून तत्काळ उठून जा.”हे बोलून माझं मन मोठ्या शंकेच्या डोहात बुडाले.‌ मी मोठ्ठा श्वास घेतला, मनाची तयारी केलीच.
प्रेम माणसाला सगळ्या भावनांचा आदर करायला शिकवते. तोच ती उठली.
माझा एक श्वास माझ्या पोटात गोळा आला. भूवयांवर टेंशनचं सावट. डोळे झाकूनच गेले घट्ट… तिच्या वावरण्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न माझं नाक करत होतं, अंधारात चाचपडावं तसं स्वतःच्या प्रश्नात उत्तर शोधण्याचा किती टोकाचा प्रयत्न मी करत असले माझं मलाच माहीत होतं. स्वतःची एवढी परीक्षा मी कधी पाहिली नव्हती,
आणि चाचपडतानाच अचानक तिच्या ब्रेसलेटचा धागा माझ्या मानेला लागला, डोळे उघडणारच पण ती चूक होणार होती म्हणून मी आतल्या आतच सगळ्या श्वासांचे प्रेमात मिश्रण करून उमेदीची खिडकी उघडली, नि क्काय? तिने दोन्ही हातांनी मानेला घट्ट पकडून माझ्या ओठांवर ओठ घट्टपणे ठेऊन टांगत्या श्वासांना मुक्त केलं.

पोटातला गोळा मुक्त झाला होता, श्वासांत आझादी आली होतीनि वार्याबरोबर उडणार्या पाखरांसारखे काही पाखरं असतात, शिकवलं तिनेच… निशब्द यापुढे आम्ही दोघीही त्या किसमध्ये अतोनात प्रेमाची उसंत टाकून तो सर्वांगात अनुभवून खुउउउउउप शांत झालो…

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *