लग्न म्हटल्यावर ते तीन जादुई शब्द सतत ऐकु येतात,
“जोड़ियां स्वर्ग में बनती हैं।”
असेल, असेल कदाचित.
लग्नाचा अनुभव नसल्यामुळे निरिक्षणातून मला लग्न म्हणजे काय ते कळलं, लग्न म्हणजे पाहायला गेलो तर दुसरा जन्म.
एका आयुष्यात दोन जीवन जगणं.
लग्नाचे प्रत्येकाचे खयाल वेगळे असतात. प्रत्येकाची लग्नाकडून काहीतरी अपेक्षा असते. अपेक्षेपेक्षा, लग्नाबाबत प्रत्येकाची कल्पना वेगळी असते. माझ्या या वाक्यावर अनेक विवाहित म्हणतील, शेवटी जाऊन एकच होतं, लग्न म्हणजे बेड्या हाती येतात.
हे सत्य सगळ्यांना माहिती असलं तरीही लग्न तर करावसं वाटतच. रिती रीवाज आणि घरच्यांचा दबाव सोडला तरी स्वतःसाठी एक हक्काचा माणूस असावा हे मागणं असतच. आता तो जोडीदार कसा असेल, याची तुमची कल्पना खूप वेगळी असते. किंबहुना बऱ्याचदा या कल्पनेमुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या कल्पनेत बसवण्याचा प्रयत्नही करत असतात, त्यामुळे बऱ्याचदा अपेक्षाभंग होऊन नात्याचा मुख्य दरवाजा बंद होऊन जातो आणि एकदा ही अपेक्षेची चूक केली की पुढची सगळी गणितं उसवत जातात.
हा सार यासाठी कारण काल ‘मेड इन हेवन’ (स्वर्गात बनवलेल्या—) ही वेबसिरीज अमेझॉन प्राईमवर पाहिली. प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले असले तरी त्याचं पोस्टर बघून मी माझं मत बनवून मोकळी झाले होते. शिवाय हे मत तेव्हा बनवलं ज्या दिवशी ही सिरीज रिलीज झाली, तेव्हा लागलीच पाहायला सुरुवात केली होती. पण त्याचा एक एपिसोड पाहून वातावरण खूप मॉडर्न, हाय सोसायटी ड्रामा, स्लो आणि रटाळ वाटत होतं. मग काल मित्राच्या सांगण्यावरून पुन्हा सिरीज पाहायला घेतली. आधिसारखेच पहिल्या एपिसोडला लींकच लागेना, मनातल्या मनात मित्राला शिव्याही दिल्या. कारण पहिल्या एपिसोडमध्ये रूटीन आयुष्य दाखवले आहे. सिरीज कुठल्याच वाऊ फॅक्टरने सुरू केली नाही. प्लस अत्युच्च जीवनशैली असलेल्या सीरिजमध्ये बऱ्याचदा नायिकांचे अंगप्रदर्शन, फ्रीडम म्हणजे सिगारेट, दारू आणि मीपणा हा मुद्दा अग्रगणी ठेवून श्रीमंतीतील प्रेम मांडले जाते.
पण जसं जसे सिरीज पुढे जात होती, तसतसे जुळवून घेण्यास सुरुवात होत जाते. कारण या सीरिजमध्ये लग्नाच्या प्रत्येक त्या शक्यतेला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी लग्न करण्याच्या सुरुवातीपासून लग्न का करत आहोत, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जोडप्याकडे असतं. तुम्ही लग्न करण्याचं कारण काय असू शकत, यावरून पुढचं आयुष्य ठरत असतं. कारण लग्न करण्याचं जे कारण असतं त्यानुसार तुम्ही जोडीदार शोधत असतात. या सगळ्यात दोघांचे स्वतंत्र विचार आणि स्वतंत्र आयुष्य याला स्थान नसतंच आणि ते स्थान नसल्यामुळे हळूहळू स्वभावाने भांडणं होऊन डिव्होर्सपर्यंत घटना जातात. इथे प्रत्येक पिढीतील जोडप्यांची लग्न आणि त्याभोवती घडणाऱ्या घटना दाखवल्या आहेत. लग्न झाल्यानंतर चीटिंग, व्याभिचार, चूक अचूक, तडजोड, पुनर्विचार, चुकीचे निर्णय, पूर्वग्रह, विचारसरणी थोपणे या गोष्टी वारंवार होत असतात. तुम्हाला जर तुमच्या पार्टनरबद्दल आपलेपणा वाटत नसेल तर तिथेच तुम्ही नात्याला विराम दिलेला असतो.
सीरिजमध्ये नेमकं आहे काय ? तर तारा (सोभिता धुलीपाला) आणि करण (अर्जुन माथूर) हे दिल्लीतील वेडिंग प्लॅनर आहेत. वेडिंग प्लॅन करताना त्यांना माहित आहे की, आधुनिक समाजात लग्नाची व्याख्या काय आहे… परंतु ते यामध्ये क्रिस्प आणतात. त्यांच्या कंपनीचे नाव असते, मेड इन हेवन ही कंपनी विशेषतः नववधूच्या इच्छा आकांक्षा लक्षात घेते. लग्नाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातला संक्रमणाचा काळ असतो. विशेषतः मुलींच्या. त्यामुळे तिला जस हवं तसचं लग्न होईल यासाठी मेड इन हेवण प्रयत्नशील असते. शिवाय लग्न होण्याआधी आता ट्रेंडिंग होणारे प्रिवेडींग शुट तर आहेच पण नववधू-वर यांची भेट आणि एकमेकांना का पसंत केलं, यावर एक मेमरी व्हिडिओ तयार केला जातो. त्या व्हिडिओमध्ये बोलणारे नववधू-वर त्यांचं म्हणणं ऐकण्यासारखे आहे. शिवाय प्रत्येक एपिसोडच्या शेवटी चार ओळीत सार सांगितला आहे, त्या ओळी खूप काही सांगून जाणाऱ्या आहे. प्रत्येक लग्नात, कंपनीचे मालक असलेले तारा आणि करण वधू-वरांच्या जीवन कहाणीचा हिस्सा बनत जातात. हे दोघे या विवाहसोहळ्यांमधून समाजाचा खरा आरसा दाखवून भारतीय वैवाहिक जीवनातील जटिलतेची ओळख करुन देतात.
पण इतरांसाठी हे सो कॉल्ड हॅपी मॅरीजसाठी प्रयत्न करणाऱ्या दोघांची आयुष्य नेमकी कशी इंपर्फेक्ट असतात, याचा उत्तम नमुना दाखवला आहे.
तारा (सोभिता धुलीपाला) ही सीरिजमध्ये मुख्य नायिका आहे. हिने लग्नाची सुरुवातच फसवणुकीपासून करून श्रीमंत बिजिनसमनला प्लॅनिंगने आपल्या जाळ्यात अडकवून लग्नाच्या माध्यमातून उच्च समाजात प्रवेश केलेला असतो. तिचा चेहरा जरी सर्वसामान्य गरीब घरातील वाटत असला तरी तिचा आत्मविश्वास तिला इंडिपेंडंट स्त्री म्हणून चमकवतो. लेखकाने नायिकेचे पात्र लिहिताना कसलाच सुपर वुमन टच दिलेला नाहीये. नायिकासुद्धा विचारांनी चुकीची, कुरूप असू शकते, ती आपल्या मधीलाच एक असल्याचा हा स्क्रिन प्रयोग खरा वाटतो. तारासारखीच विचारसरणी घेऊन वावरणाऱ्या आठ मुलींची आयुष्य यात दर्शवली आहेत. ज्यात शहरी कुटुंबांचे कुरूप वास्तव, दिखावा आणि मध्यमवर्गीय मुलींच्या डार्क बाजू दाखवल्या आहेत. यामधून मुली सहजपणे पैशासाठी कशा मोहात पडतात, याची पुराव्यासह कथा दर्शवली आहे.
करण हा एक समलैंगिक पुरुष आहे. हा समलैंगिकतेचा प्रवास खूप कठीण असतो. कारण आधी स्वतःला समजवावं लागतं, ते समजणं चुकीचं आहे म्हणून स्वतःला खोटं ठरवावं लागतं, पण एकदा समाजमान्य सगळे प्रयत्न करून झाले तरी सत्य तेच असतं, तेव्हा मात्र मन हळूहळू ही बाजू स्वीकारायला लागतं. हे काहीच कठीण नसतं झालं, जर समाज म्हणून आपण विचारांनी सुदृढ असतो. आपली विचारसरणी त्याच त्या चौकटीत अडकली आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा स्वतंत्र विचारच करू शकत नाहीत. समलैंगिकता बेकायदेशीर आहे अशा देशात आयुष्य जगणं एक गुन्ह्यासमान वाटतो. त्यामुळे आपल्याकडे मून लाईट, लव्ह सिमोन, शुभ मंगल ज्यादा सावधान हे चित्रपट सहज प्रदर्शित होऊन त्याला ओपनली दाद देणारा प्रेक्षक मिळायला बराच काळ जाईल. आपण करण जोहरला त्याच्या प्रतिष्ठेमुळे स्विकारुही, शिवाय तुम्ही स्वीकारा नका स्वीकारू तुमच्या मताने त्याला तिळमात्र फरक पडत नाही. पण समाजाच्या दबावाखाली दाबली जाणारी ही लैंगिक चॉईस कित्येक आयुष्यांचा बळी घेते. शारीरिक भुकेचा बळी! जसा हेटरोसेक्शुअल व्यक्तींची शारीरिक भूक ही कायदेशीर तर यांच्यासाठी एवढा तिटकारा का? जोड्या स्वर्गात बनतात मानतात ना, मग गे, लेस्बिअन यांच्या जोड्याही तिथेच बनत असतील मान्य नाही का?

बलात्कार शब्द ऐकून जसा त्रास होतो तोच त्रास समलैंगिक पुरुषाला ‘त्याला तर पुरुष आवडता म्हणून आपण त्याचा कसाही वापर करू शकतो’ हा विचार ऐकून होतो. करणचा घर मालक हा समलैंगिक असला तरी तो स्त्रीशी लग्न करून एका मुलीला जन्म देतो. त्यामुळे तो स्क्रीनच्या अलीकडे त्याची शारीरिक भूक भागवण्यासाठी करणच्या घरात सीसीटिव्ही कॅमेरे लावून त्याच्या प्रायव्हेट स्पेसमधील फुटेज पाहून हस्तमैथुनाचा आनंद लुटतो. पण जेव्हा त्याची पत्नी त्याच्या कॉम्पुटरमध्ये ते फुटेज पाहते, तेव्हा समाजाच्या आणि बायकोच्या भीतीने तो पळवाट म्हणून ते फुटेज पोलिसांच्या ताब्यात देतो. यातून समलैंगिक संबंधांच्या गुन्ह्याखाली करणला अटक होते. एक रात्र तुरुंगात अडकलेल्या करणवर समलैंगिक संबंध गुन्हा ठरवून अटक करणाऱ्या पोलीस स्टेशनात बेकायदेशीर जबरदस्ती केली जाते आणि सत्तेचा वापर करून फॅन्टसी प्लेजर मिळवण्याचा प्रयत्न होत असतो. हा छुपा प्रयत्न, हा छुपा दबाव कायद्याला दिसत नाही. त्यावर आवाज कसा उठवणार? पोलिसांकडून होणाऱ्या गुन्ह्याला पुराव्यात बांधता येत नाही. पोलिसाच्या मागणीला विरोध करणाऱ्या करणला पोलिसांकडून तिरस्काराची वागणूक देऊन दांड्याने मारून मुक्कामार दिला जातो. तो वार त्याच्या शरिरापेक्षा मनाला प्रत्येक पावलावर दुखत राहतो. करण (अर्जुन माथूर) हा हिरो मटेरियल दिसत असला तरी त्याचं सिनेमातील पात्र खूप भावनिक आहे. या भावनेतून त्याला लहानपणीचा एक जुना गिल्ट वीस वर्षांनंतरही खात असतो. त्याच्या बॅकग्राऊंडला त्याने केलेल्या चुकीच्या पश्र्चाताप इतका असतो की त्याला प्रत्येकाबद्दल सहानुभूती वाटत असते. जुनी जखम झाकून टाकली तरी ती चिघळलेली असते. करण हा गे आहे, त्याला पुरुष आवडतात. पण ही सिरीज आर्टिकल ३७७ येण्याआधीच्या काळावर भाष्य करणारी असल्यामुळे एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला सेम जेंडरबद्दल आकर्षण असेल तर काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात यावर ठळक फोकस करून त्यात करण उठून दिसला आहे… कारण त्याच्या प्रत्येक वागणुकीतून प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून महत्त्वाचा आहे, त्याचं लिंग आणि त्याची सेक्स प्रायोरिटी हा त्याच्या मनातल्या भिंतीत चर्चिला जाणारा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यावर कोणीतरी जज करणं आणि जज करून त्यावर स्पष्टीकरण देणे हे मुळात चुकीचे आहे. या जगात कोणताही व्यक्ती अवडण्याला खरंच का स्पष्टीकरण द्यावे लागते?
कलम ३७७ रद्द केल्यामुळे समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली. पण तरीही समाजाला हा निर्णय पचनी पडायला येणाऱ्या १० पिढ्या सहज जातील… कारण इथे लग्न हे प्रतिष्ठेसाठी, मान मर्यादा आणि दिखाव्यासाठी होतं. त्यामुळे जिथे दिखावा असतो तिथे खोटपण असतं, हा खोटेपणा, चीटींग, अपारदर्शकता सगळ्या नात्यांना गुंडाळून मनमर्जी करत जातो.
“समलैंगिक आहात मग चला दुसऱ्या देशात… अमेरिका योग्य राहील” हे बदलायला हवं. समाज म्हणून आपल्याला समाजाला प्रगत विचारसरणीकडे न्यायला हवे. सतत एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणे, त्याचं लग्न झालं का, बाळ झालं का, मग का नाही झालं, काय प्रोब्लेम, हे सतत
दुसऱ्याच्या आयुष्याला स्वतःची मालकी म्हणून बघणं थांबवायला हवे. एखाद्या व्यक्तीशी वैचारिक चर्चा करा ना, त्याचे विचार चुकीचे, तो समाजाच्या विचारांच्या चौकटीत बसत नाही मग तो चुकीचा हा समज चुकीचा आहे.
अशा विषयांबाबतीत झोया अख्तर नेहमीच वरचढ ठरते. लस्ट स्टोरिज, बॉम्बे टॉकीज, तलाश यांसारखे एकाच विषयाला धरून समाजातील प्रत्येक घटकाचा विचार मांडण्याचे धाडस ती करते. प्रेमामधील कित्येक शेडला तिने वेगळ्या पातळीवर नेले आहे. एलजीबीटीक्यू, श्रीमंतांमध्ये असणारी छुपी हुंडाप्रथा, मैत्री आणि प्रेम, दुखापत आणि विश्वासघात, लैंगिक चॉईस, मनाची घालमेल या सर्वांना एकत्र करून मेड इन हेवण बनवली आहे. दिल्लीच्या छोट्या छोट्या रस्त्यांवरील अलंकारिक ठिकाणे चमकदारपणे दर्शविली आहे.
या व्यतिरिक्त समाजातील स्त्री कशी आहे, याची जी समाजकृती बनवून दिली आहे त्यामुळे ती कशी भौतिकवादी (मटेरियलिस्टिक) जीवनशैलीची बळी बनली आहे, हा सहज सुंदर मेसेज प्रेक्षकांच्या नजरेत आणून दिला आहे. जिम सार्बा (होटेस्ट हंक), कल्कि कोचलिन ( सेक्सी पोर्ट्रेट) हे दोघे साईड रोल असले तरी त्यांचा इंपॅक्ट खूप प्रभावी आहे.
या सगळ्या निगेटिव्हिटीमध्ये तीन कथा प्रेरणादायक आहेत. लग्नाच्या मध्यात बापाच्या डोळ्यात दिसणारी अश्रूंनी भरलेली चिंता पाहिल्यावर हुंड्याची मागणी ऐकुन लग्नाच्या मंडपातून ताठ मानेने निघून जाणारी प्रियंका मिश्रा.
नूतन यादव जी राजकारणी घराण्यात जन्मून, धाडसाची परिसीमा गाठून घराचे राजनीती- अंगण करू पाहणाऱ्या घरापासून दूर जाऊन ख्रिश्चन मुलाशी लग्न करते.
तिसरी कथा ज्यात गायत्री ही विधवा स्त्री असून तीस वर्षे एकाकीपणात घालविल्यानंतर एका मायाळू बेंगॉली माणसाशी लग्न करते.
सीरिजमध्ये असे बरेच चांगले संवादही आहेत जसे … करण म्हणतो, “Ship of honesty has already sailed” .. किंवा तुम्हें हजबंड तो हैं। …
हुंड्याची मागणी ऐकुन प्रियंका मिश्रा लग्न मोडताना म्हणते, I am not going to pay anyone to marry me! किंवा तारा शेवटच्या भागात देवीसारखे सर्व दागिने घालते पण अंतर्गतपणे ती किती तुटलेली असते.
लग्न इतकी वाईट नसतात. जर वाईटच म्हणायचं तर जन्म घेतलेल्या घरालाही भेग जातेच, पण तिथे मुक्तपणा, स्वातंत्र्य असतं. आपल्या अस्तित्वाला महत्त्व असतं, आदर असतो, प्रेम असतं. त्यामुळे आधी हे इतरांना द्यायला शिका. जे द्याल ते रिटर्न मिळतं. या गोष्टी लग्नानंतर जपल्या तर या बेड्या हक्काच्या आणि सुखकर वाटू लागतात.
ही सिरीज खूप हळुवारपणे दाखवली. मध्येमध्ये संथही आहे. तरीही, यामध्ये डार्क ट्रूथ दाखवले आहे. सिरीज खूप कठोर विषयांची दुखरी नस पकडून सादर केली आहे. बऱ्याच जणांना ती रुतेल, त्रास देईल, खुपेल. पण समाजाचं सत्य हेही आहे, हे टाळता येणार नाही.
By Pooja Dheringe.
आवडलं..!
मचौर लिखाण..
समिक्षक आहात त्याचबरोबर समाज सिद्धांतांना आपल्या स्वतंत्र बुद्धीच्या निकषांवर घासून पाहण्याचं कसब खूप आवडलं..!
शुभेच्छा..
बऱ्याचदा समाजाच्या मानसिकतेला त्यांच्याच आवाक्यातील प्रश्न विचारणं गरजेचं असतं, उत्तरे नसली तरी त्यांच्या मनात हा विचार सकारात्मकतेने रुजावा हा प्रयत्न होता. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ☺️ keep reading ☺️