त्या प्रत्येक एका लेखकाच्या मनात ज्वालामुखी असतो… शब्दांचा, सत्याचा, भावनांचा, उद्रेकाचा, विद्रोह आणि समाजातल्या चकचकीत खोट्या मुखवट्यांचा, तो मंटो असतो?
ज्यामुळे तो इतका विचित्र वागतो…
म्हणजे त्याला वास्तवातील सगळचं दिसत असतं, त्याला ते टाळताही येत असतं.
मुळात गोंधळातल्या गोंधळात अजुन कसं अडकायचं याचं पद्धतशीर उदाहरण तो असतो. त्याच्या भावनांचे मनोरे पडून दान दिशी डोक्यात आदळतात जेव्हा बाहेर अन्याय होताना दिसतो.. राग कुुणावर काढावा तर आहेेच चिरफाड शब्दांचे आयते गठ्ठे, ज्यात समाजात विष पेरण्याची ताकद आहे पण परिवर्तनात ते मागे आहे. शब्द काय ज्यात गुंतणार नाही हा लेखक!
तो कधीतरी कल्पनेच्या विश्वात लिहितो, पक्का वैरी होऊन वाचकांची दिशाभूल सविस्तरपणे करतो.
कधीतरी इतकं वास्तविक लिहितो की, त्याला त्याच्या आतल्या कातडीतही ते वास्तवाचं ज्वलंत चित्रण दिसतं…
साला इतका हा लेखक कुरूप असतो की, तो टेहळणी किंवा कातरवेळी फिरतानाही, सगळ्यांचा मनातल्या मनात पानउतारा करून टाकतो, नि स्वतःला किती येतं या खरेपणात तो समोरच्याला अक्षरशः नागडं करून टाकतो.
तो खरा असतो की इतरांहून वेगळा? या वाक्यातील प्रश्नचिन्ह स्वतःवरच उपस्थित करणारा तो एकमेव प्राणी असतो.
लोकांनी कितीही कौतुक केलं तरी स्वतःवरच संशय घेणारा तो एकमेव असतो.
“त्याला मोह असतो, त्याला तो नसतोही. आहे की नाही ?” हेच पुन्हा उत्तर शोधण्यात तो अजाणतेपणी गबाळा घोषित होतो.
तो जितका शिवलेला दिसतो, तितकाच किंबहुना त्याहून अधिक तो ठिगळं लावलेला असतो. सगळ्यात जास्त टाके त्याने स्वतःच्या जखमांना स्वतःतच स्वतःच घातलेले असतात.
समाजात बदल घडवू की समाजाला नागडं करू? हा त्याचा कटाक्ष त्याला इतरांहून विचित्र दर्शवित राहतो.
लोकांच्या भावनांना नवं आयुष्य देणारा हा लेखक कधी समाजाचा असतो तर कधी स्वतःचा ही नसतो.
असा हा लेखक कुरूपच असतो मुळी!
शब्द – पूजा ढेरिंगे
छायाचित्र सौजन्य – इंटरनेट
ग्रेट… मस्त..