बासरी – गोष्ट प्रेमयोध्याची

  • by

जेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगळा झाला त्या एका घटनेसोबत एका रात्रीत असंख्य घरं, त्यांच्या भावना, त्यांची मनं, जोडली गेलेली माणसं, विखुरली गेली. सरकारने घेतलेला एक निर्णय रातोरात असंख्य घरांची आणि आयुष्याची राखरांगोळी करुन गेला. आपलीच भावंड म्हणून वावरणारी आयुष्य सीमेच्या पार गेली.

हे विचार मोठे होत असताना अनेकदा मनाला चाटून जातात. पण पाकिस्तान आणि भारत वेगळे व्हावे हे सामान्य माणसांच्या बुध्दीला भावनिक तत्वावर अमान्यच! या अशा भावनांमुळे लॉकडाऊनच्या काळात मी ना सी फडकेंच बासरी वाचायला घेतलं.

प्रेमाचा विरह तो कोणत्या टोकाचा असावा? कोणी ओळखीचं सीमेपार विलग झालं तर?
आज आहोत त्या ठिकाणी कुणी फूट टाकली आणि आपला प्रियकर/ प्रेयसी दुसऱ्या टोकाला गेले तर?

बासरी या कथेतला प्रभुदास दंगली, आत्मघात होण्याच्या नाजूक परिस्थितीत पाकिस्तानात मकबूल बनून स्वतःपासून अकस्मात दुरावलेल्या आपल्या प्रेमाला शोधण्यासाठी जातो, त्याचा हा प्रवास खूप नवीन आणि वेगळा आहे माझ्यासाठी. आपल्या आयुष्यात न घडणारी गोष्ट अधिक कुतूहलाची वाटते. अडीच वर्षांपूर्वी म्हणजे १९४७ च्या  काळात कराचीत भेटलेले ते दोघे एकमेकांचे गुरु शिष्य काय बनतात, तेथून एकमेकांच्या प्रेमात काय पडतात, प्रेमात पडून नव्या संसाराला लागणारी खरेदी काय करतात आणि भारत- पाकिस्तान फाळणी होते नि वेगळी होतात दोन मनं!

फाळणीच्या दंगलीनंतर कराचीत स्थायिक असलेल्या हिंदूची घरं लुटली जातात, आयाबहिनी बेघर करून अत्याचार केले जातात, काहीजण सुटकेचा मार्ग म्हणून मुंबई-दिल्ली गाठतात. या वाहत आलेल्या प्रवाहात कथेचा नायक प्रभूदास मुंबईत येतो, परंतु त्याचं मन, त्याची प्रेयसी मेल्याच्या अफवा कानावर पडतात. पण हळूहळू कथेबरोबर त्याची प्रेयसी यशोदा, नेमकं कुठे असते हे उलगडत जाते.
परंतु, अडीच वर्षांनी आपल्या प्रेमासाठी सैरभैर झालेलं मन शांत व्हायला लागते, तोच मनाचा हळवा कोपरा ढवळावा तसं सहज बोलण्यातून प्रेयसीच्या अस्तित्वाच्या गुढतेचा मागमूस लागताच दोन दिवसात मुंबईवरून कराची गाठणं हे एका प्रेमयोध्याला जमणारे होते विशेष!  कराचीत येणं आणि ती राहत असलेल्या ठिकाणी तिला शोधणं हे भलतंच आव्हानात्मक होतं, पण ती जिवंत आहे हे सुंदर सत्य त्याला कळल्यानंतर ते आव्हान त्याच्या दृष्टीने सुकर वाटणारं होतं.

यामध्ये फडके यांची लिहिण्याची लकब वेगळी आहे. त्यांनी कथेचे भाग करून लिहिल्यामुळे पुस्तकाची पानं जीवावर येत नाही शिवाय प्रत्येक भाग संपताना दुसऱ्या भागाची सुरुवात आणि त्याला पहिल्या भागाची वाट जोडण्याची पद्धत सुटसुटीत तितकीच वाचकाला खिळवून ठेवणारी आहे.
कथा पुढे सरकत असताना मध्यावर काही प्रश्न पडत जातात…
जसं प्रभुदासाला नवख्या तारुण्यात शारीरिक ओढ लागावी. पण शारीरिक गरजेमध्ये जबाबदारी घेणं हे पुरुषाला शक्य नसते. शरीरावर हक्क बजावायचा, उपभोग घ्यायचा, पण जेव्हा बेघर होतात तेव्हा तो मोह किंवा माझं प्रेमच नव्हतं म्हणायचं. मोह सुटणंं/ सुुटल्याचं दाखवणं कुठेतरी खटकणार होतं किंवा काही घटना या चूक आणि बरोबर या दोन्हींत बसतच नाहीत त्यातली जोहराची घटना.
पण रागिणी??
दासवरच्या एकतर्फी भावनेतून जीवावर उदार होणारी रागिणी म्हणजे तिच्या जगण्याला/ नावाला डाग वाटतो मला. तिने पाषाणहृदयी रहावं असं मत नाही पण हृद्य इतकं सुंदर असावं ज्यात नकार पचवण्याची ताकद असावी. समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर असावा. पण रागिणी किशोर वयात प्रेमात पडते तेव्हा अशावेळी मन परिपक्व नसते अशावेळी काय करावं ??? तिचं मन मजबूत व्हायला वयाची विशी ओलांडवी लागते. तिथे न्याय आणि अन्याय दोन्ही अशक्य होतं. म्हणून म्हटलं काही गोष्टी योग्य आणि अयोग्यच्या पलीकडे घडल्या आहेत.

प्रभुदासच्या आयुष्यात जोहरा, बेगम, रागिणीनंतर यशोदा येते. हिने कथेचा उत्तरार्ध धरून ठेवला आहे. पण ती अल्लड आहे, तितकीच ठाम आहे, हिंमतवान आहे. तरीही तिच्यापेक्षा त्याने तिच्यावर प्रेम केलं म्हणून ती उठून दिसतेय असं वाचताना वाटतं. बऱ्याचजणींच खऱ्या आयुष्यातही असच असतं नाही?
दासाच्या मोहाचा तोल जाणं, तिथे जोहरा ही सुद्धा बदनाम होतेच. पण दासने प्रेम केलं म्हणून त्याने प्रेमासाठी जोहरा नाही तर चांगल्या घराण्यातली यशोदा निवडली. यशोदेच ते प्रेम, बेगमच चुकलं पण कोवळ्या जोहराने केली ती तिची चूक कशी… ?
प्रेमही स्टॅंडर्ड पाहून केलं जातं का? माझे प्रश्न पुरुषांसाठी होते. उत्तरात प्रभुदासाचे वागणे होते.

पुस्तकाच्या पानांबरोबर भारत पाकिस्तान आणि देशांच्या सिमांतून विलग झालेला इश्काचा देश उलगडत होता. कथा राजकारणाची नसतानाही राजकारण कथेचा अटळ भाग होतं हे वाचणं कुतूहल वाढवणारे होते. पुस्तकाच्या मध्यावर घनघोर विलगिकरणाची चाहूल येऊ लागते. ज्यात ‘जिनाह साब जिंदाबाद, पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणत दंगलींची सुरुवात होते. नकळत त्या काळात प्रचलित असलेल्या ‘सिंध ओबजर्व्हर, कराची गॅझेट’ या वृत्तपत्रांची तोंडओळख होते.
स्टोरीची खरी आतुरता सुरू होते.

एखादा प्रसंग मनाचा ठाव घेतो, तसे बरेच प्रसंग असतात परंतु आपल्या परिस्थितीला अनुरूप प्रसंग मनाच्या तळाशी लागतो. त्यापैकी एक म्हणजे;
एके दिवशी एक भिकारी दासांच्या घराजवळ येतो. उत्तम सतार वादन आणि त्याच्याकडून ते वादन शिकल्यानंतर दास त्याला कोट आणि दोन नोटा देतो. हे पाहून यशोदा नाराज होते. भिकाऱ्याची एवढी पात्रता नाही म्हणते. तेव्हा दास म्हणतात, “आपल्याला आनंद देणारी एखादी वस्तू मिळाल्याबद्दल कृतज्ञता दाखविताना हिशोबात घ्यायचा असतो तो ती वस्तू देणाऱ्याचा मोठेपणा नव्हे तर आपल्या आनंदाचा मोठेपणा!” हे माझ्यासाठी खूप गहिरं होतं.

जसं हिंदूंच्या दंगलीत मुस्लिम समाज घाबरून जातो तसाच कराचीत विलग पाकिस्तानची घटना हिंदूंसह बहुव्यापी सिंधी समाजाला हादरवणारी होती. त्यांच्या मनात मुस्लिमांविषयी तेढ नसले तरी राजकारणातून हिंदू मुस्लिम एकमेकांच्या विरोधात आले होते.
अशातच प्रभुदास या हिंदूचं एका सिंधी लखपत्याच्या यशोदेवर प्रेम जडलं होतं. घरचा सिंधी वडील गरिबीमुळे लग्नाला मान्यता देणार नाही म्हणून चोरीछुपे लग्नाचा विचार प्रत्यक्षात अमलात आणला जाणार असतो. परंतु तो काळ सामाजिक विषमता आणि अशांततेचा असतो. अशातच दोघांच्या गुपचूप ठरलेल्या लग्नाच्या तारखेच्या आदल्या दिवशी हिंदू ब्राह्मणाचा सुरीने भोकसून खून केला जातो. लग्नाच्या आदल्या दिवशी हे पाहायला मिळून आधीच लपून लग्न करणारे ते दोघे घाबरून जातात.

मला नेहमीच पाकिस्तानच्या घरांमध्ये काय परिस्थिती असेल हे प्रश्न पडायचे. त्यांच्याकडे केवळ द्वेषाचं, नैराश्याच वातावरण असेल का वाटायचं. त्यांच्या स्त्रिया आपल्याहून दहा वर्ष मागे असतील का? पण काही पाकिस्तानी स्त्रिया या देशात कर्तबगारीने वावरतात बातम्या आर्टिकल वाचले आहेत तसे, पण संविधानाची कमतरता किती मोठ्या प्रमाणात जाणवत असेल त्यांना किंवा मग आपल्यासारखी शुद्ध मनाची माणसं राहतं असतील का पाकिस्तानच्या घरांमध्ये, जर पाकिस्तान आजही भारताचा हिस्सा असता तर आपण लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या नंबर कधीच पटकवला असता नाही? … हे आणि असंख्य उत्सुकता वाढवणारे प्रश्न पडायचे.  तिथल्या लोकांचा उर्दुवर पगडा आहे. पण त्यापूर्वीही जेव्हा भारत-पाकिस्तान एक होते तेव्हापासून उर्दू ही दोन्ही राष्ट्रांमध्ये बोलली जात असे. नंतर भारतीयांनी हिंदीला आपली राष्ट्रभाषा म्हणून मान्यता दिली तर पाकिस्तानने उर्दुला. त्यावेळी हिंदी आणि उर्दूचा वापर अधिक होता, या हिंदी आणि उर्दूचा मेळ म्हणजेच रेख़्ता।
पाकिस्तानातल्या लोकांच्या बऱ्याच कलाकृती पाहताना, ‘जनाब, जी हुजुर, आपका हुकुम सर आंखों पर!’ हे ऐकताना कोमल वाटायचं. म्हणून उर्दू शिकण्याची मनोमन इच्छा होती. त्या इच्छेतून पाकिस्तानची ‘बाघी’, ही वास्तविकतेला धरून बनवलेली कंदील बलोच या कॉन्ट्रोवर्शियल व्यक्तीची बायोग्रफिकल सिरीयल पाहिली.

अशावेळी भारत पाकिस्तान वाद हा घरातल्या दोन सख्ख्या भावांतील जमिनीच्या वादाचा लांबत चाललेला सार्वजनिक मुद्दा वाटू लागला.
आज पुन्हा पाकिस्तानच्या कराचीत राहून तिथे जगून येण्याचा मोका ना.सी. फडके यांच्या बासरी या पुस्तकाने दिला.
कराचीत राहणारा रहिवासी जेव्हा १९४७ ला फाळणी झाल्यानंतर त्याच्या प्रेमापासून विलग होतो. परंतु प्रेयसीच्या शोधात अडीच वर्षांनी १९५० साली कधी काळी भारताचा भाग म्हणून गणल्या जाणाऱ्या कराचीत तो पुन्हा जातो, तेव्हा त्याच्या जुन्या आठवणींचा वळीव म्हणजे बासरी!

कथेच्या सुरुवातीला आणि शेवटाला हळूहळू धर्मासारख्या नाजूक आणि लवचिक गोष्टीतून अर्थाचे अनर्थ आणि कृत्यातून अमानुष कृत्याचा वेगळाच बोध घेऊन राजकारण कसे घडवून आणले जाते, हे लेखकाने न लिहिता समजू लागते.

कथेतील पात्र हा एक कलाकार आहे. तो वादन कलेचा द्योतक आहे. त्याला राजकारणाचे वेड नाही, ना त्याच्या प्रेयसीला आहे. परंतु सामान्य माणूस जेव्हा देशाचा हिस्सा असतो आणि देशातल्या राजकारणात आयुष्याची स्वप्न पाहिलेल्या दोघांची ताटातूट होते, त्या विरहाचे सार्वजनिक शोक व्यक्त होत नसले तरी मनाची सीमा रागाचे टप्पे पार करून बंड करून उठलेली असते किंवा मुक्याने मृत्युमुखी पडलेली असते.
त्यांनतर दासांवरील संकटे दूर झालेली असली तरी त्यांची मनस्थिती पूर्वीच्या संकटांच्या काळातच भटकत असते. माणूस व्यवहारात उध्वस्त झाला तर त्याच्याकडे मनोधैर्य असते पण तोच जर मनाने उध्वस्त झाला आणि आपल्या लोकांपासून तुटला तर मात्र मनोधैर्य खचून जाते. दासांची अवस्था हीच झाली होती.
“सुखाची इच्छा सोडली की माणूस एकप्रकारे सुखी होतो.” खरंय फडके साहेब. हे वाक्य आपल्याही जीवनात काही परिस्थितीत डोक्याची कातडी हलकी करतो.

टिव्ही, टेलिफोन, मोबाईल्स नसलेल्या त्या काळात दंगे होत असताना आपल्या प्रेयसीचा मागमूस कसा शोधावा, जी आधीच आपली होण्याबाबत शंका होती, त्यात देशांतील विद्रोहाने दासांच्या अंगावर प्रेमाच्या अपूर्णत्वाच्या भीतीचा काटा चढवून दिला होता.
शेवटी प्रेयसीच्या शोधाचा शेवटचा टप्पा येतो. ती मेली होती, जिवंत होती काहीच कल्पना नव्हती. सगळे तर्क वितर्क! शेवटच्या काही पानांवर १८ ऑगस्ट १९४७ च्या दिवशी काय झालं असेल याचा तर्क लावणं थांबते आणि दास त्या काळया दिवसांबद्दल बोलू लागतात, त्यांच्या आयुष्यात एकाचवेळी वाट्याला आलेले पाकिस्तानचे क्रुरकर्म आणि भारताची आझादी, या दोन्हींत त्यांचं आयुष्य चिरडलं गेलं होतं. एकीकडे नेहरूंच भाषण होऊन देश प्रजासत्ताक होण्याची घोषणा होणार होती, तर दुसरीकडे कराचीत राहिल्यामुळे पाकिस्तान जन्मभूमी म्हणून पदरी पडलेले लोक, फाळणीच्या वेळी कराचीतल्या दंगलीत बेपत्ता झालेले अनेक जीव, ही विखुरलेली मन रक्तबंबाळ अवस्थेत तशीच जगत होती.

हिंदूंचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त आणि उजाड झाले होते, असे वाक्य जेव्हा वाचले जाते तेव्हा वाटते ज्या धर्माने अन्याययाची काडी पेटवली त्याला हद्दपार करावं/ मृत्युदंड द्यावा. हा राग धर्मांचा कधीच नव्हता आणि नसतो. तेव्हाही हिंदू मुस्लिम कधीच वाईट नव्हते. आताही नाहीत.
संपूर्ण कथा प्रश्न उत्तरांची मैफल टाकत जाते. मनाला बऱ्याच गोष्टी पटतात काही पटत नाही. कथेच्या पात्रांचा वावर मोजका पण योग्य वाटतो. मन रमवून वेगळ्या वास्तविक विश्वात नेणारी बासरी ही या काळात नवा अनुभव आणि विचारांत नवी भर टाकणारी होती. कथेचा शेवट ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे. तो मला आवडेल तुम्हाला आवडणार नाही किंवा उलटही होईल. परंतु कथेचा विषय मात्र मला आवडला.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *