संवादात उरली ती मराठी!
उदरनिर्वाहासाठी पुरली ती मराठी!
अन्, नोकरीसाठी नडली ती मराठी!
बालपणापासून महाराष्ट्रात अन् मराठी मातीत जन्मल्यामुळे मराठीची सोबत प्रत्येक टप्प्यावर होती. पण तेव्हा भाषेचा हा गाभा, तिचा आवाका आणि तिची प्रगल्भता समजली नव्हती. वाटायचे, शाळा कौलेजपुरती असेल सोबतीला मराठी. पण हळूहळू किशोरवयात आवांतर वाचनाने मराठीशी वेगळी नि अनोखी भेट झाली. रिकामा वेळ असो, कातरवेळ असो कि रात्रीची गूढ चांदण्याची स्वतःची वेळ असो, पुस्तकांशी छान ओळख वाढू लागली होती. ही गोडी मातृभाषेने वृद्धिंगत होते म्हणतात. कारण अनावधानाने म्हणा किंवा नेणिवेमुळे माणूस हळूहळू पुस्तकेही आपल्या मातृभाषेतील निवडतो. त्यामुळे त्याचं भाषेवरचे प्रेम हे त्या त्या भाषेतील लेखकांच्या मतांनी, त्यांच्या पुस्तकरूपी वारस्याने अधिक रसरशीत होऊ लागत. ही मजा खूप आपलीशी आणि हक्काची असते. जेव्हा स.प. महाविद्यालयाच्या त्या जुन्या ब्रिटिश बिल्डिंग बांधकामासारख्या आवारात लेक्चरची वेळ चुकवून हळूच नेमाडे हातात येतात नि काही घंटा समजत नसले तरी ते वाचावं म्हणून तरी वाचलं जातं तेव्हा मला भाषेवर प्रेम होण्याचे दिवस सुरू होतात. भाषेला समजून घ्यावं वाटतं तेव्हा मी तिला माझ्या आयुष्यात हक्काचं स्थान देऊ केलेले असतं. कारण बारावीच्या असमंजस अशा प्रेमाच्या वयात जेव्हा एखादा व्यक्ती नेमाडे हातात घेतो, म्हणजेच त्या पुस्तकाचा लेखक आणि ती भाषा आपल्याला प्रेमात पाडायला यशस्वी झालीय समजावं !
या अशा पुस्तकांच्या कट्ट्यावर फक्त नेमाडेच नाही तर कुसुमाग्रजांच्या पुस्तकांपासुन, मृत्युंजय, द अल्केमिस्ट, अरे संसार संसार, शांता शेळके, खांडेकर, पाडगावकर, तांडव आणि खास व.पु आणि बटाट्याची चाळ ही जमायचे.
हळूहळू मराठीची गोडी, महती, हेटाळणी, उपरोधिकपणा नि अतिशयोक्तीचे स्थान कळू लागले. भाषेची मजा तिच्या साहित्यिक वैभवात आहे. त्याने आपल्यातला ‘स्व’ प्रगल्भ होत जातो. असं म्हणत, जेव्हा पुण्यात आल्यानंतर पुणेकर पुस्तक प्रेमींना जे महत्त्व देतात ते बघून मी पुस्तकांकडे पुन्हा वळले. मग हळूहळू संवाद साधण्यासाठी, कोणाला तरी चर्चा वाद विवादात नेमकेपणाने बोलण्यासाठी भाषेचं वाचन, अभ्यास आणि समज याची गरज समजून वाचू लागले. त्यापूर्वी मराठी कधी कुठल्या साच्यात बसून वाचली नाही ना तिची माझी ओळख कधी अशी फॉर्मल झाली. पण बारावीच्या त्या धतींग वयात मराठीचे खोडकर रूप समोर आले. ती आजवर माझ्यासाठी संवेदनशील, भांडखोर, खट्याळ, विनोदी होती. पण बारावीनंतर माझ्या वयानुसार ती समजू लागली.
“गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा “,
“मराठ्यांना नडेल तो नरकात सडेल “
ही जगावेगळी शब्दरचना वाचली की, हसून हसून पोट दुखायला लागायचं…
वाटायचे, ही कला आहे शब्दांची की आहे ती भाषेच्या नागमोडी वळणाची?
कलेचं ठीक होतं, पण तरीही खरं सांगायचं तर इंग्रजीमुळे माझ्या मनातलं मराठीचं महत्व कमी होऊ लागलं. वाटायचं आपल्या आईबापाने आपल्याला इंग्रजी माध्यमात का नसेल घातलं.? पण मोठे होत जातो तशी कोडी सुटत जातात. आज वाटते बरेच केले त्यांनी, तसे झाले नसते तर मराठीतील मोठमोठ्या लेखकांचे साहित्य या जन्मी वाचायचे राहूनच गेले असते, नाही. इंग्रजीचं काय इंग्रजी गरज म्हणून शिकू लागले, त्यामुळे त्याचेही वाचन होतेच, सोबतीला उर्दू, हिंदीची अवीट गोडीही असते. त्यामुळे जसजसं मनाची विचारशक्ती दृढ होत गेली तेव्हा समजले, व्यवसायासाठी लागत का असेना इंग्रजी पण वैयक्तिक आणि स्वयंभू शांतीसाठी मायबोलीचा आधार वाटतो, तिची खासियतच ही असते, या ना त्या रूपाने ती कधीच आपल्याला एकटं पडू देत नाही.
इंग्रजी किंवा इतर विदेशी भाषा औपचारिकतेसाठी अन् पैसे कमावण्यासाठी,
पण मराठीचा वावर मनामनातला आहे, हक्काचा आणि स्वैर आहे.
त्यामुळे ज्याची त्याची मायबोली ज्याचं त्याच पॉकेट आयडी असते. तिचा मान, अस्तित्व आणि भान जपणे गरजेचे! तिचं अस्तित्व कालवश होण्याची चिन्ह जेव्हा दिसू लागतात, तेव्हा मन दाटुन येतं, त्रास होतो. भाषेवरून बुद्धिमत्तेचे परिमाण ठरवणाऱ्या कलियुगाचा त्रास होतो पण हेही तितकंच खरं की, मराठीचा आवाका प्रत्येक भाषेइतकाच भव्य आहे, ना तो लिहिला जाणारा ना समजावला जाणारा.
फक्त जगायला नि जपायला हवा !
अखेरीस,
विनम्र अभिवादन स्वतःचा जन्म मराठीसाठी समर्पित करणाऱ्या त्या अवलियाला,
ज्याने त्याचं अख्ख आयुष्य मराठी भाषेसाठी समर्पित केलंच, पण त्याचा जन्मदिवसही या माय मराठीला समर्पित केला.
त्यामुळेच त्यांच्यासाठी म्हणून,
“बालभारतीतला मोरपीस आजही नाचतो मनी,
अजुनही आहे मुक्ताईची ओवी नि तुकारामांचा अभंग ध्यानी!
ज्यामुळे अवघा महाराष्ट्र जाहला मराठीमय,
त्या थोर कवीला शब्दसाष्टांग अभिवादन !”
-पूजा ढेरिंगे
#मराठीराजभाषादिन #मराठीभाषा #कवीकुसुमाग्रज #मराठीदिवस