ऑफिसमध्ये शिरताना मराठी संभाषण कानावर पडलं आणि हायसं वाटून गेलं. पण ती मराठी फक्त शिपाई काकांच्या तोंडून ऐकू येते. कुवत दाखवायची मग इंग्रजीच बोलायचं असा ऑफिसवाल्यांचा आग्रह! त्यामुळे खिसा फाटू द्यायचा नसेल तर मराठीचा अभिमान खिशात ठेवून इंग्रजीला वाणीत असू द्यावं लागलं. माणूस त्याच्या आजूबाजूच्या माणसांकडून भाषा शिकू लागतो. हे शिकणं म्हणजे भाषाओळख. पण
ऑफिसमध्ये शिरताना मराठी संभाषण कानावर पडलं आणि हायसं वाटून गेलं. पण ती मराठी फक्त शिपाई काकांच्या तोंडून ऐकू येते. कुवत दाखवायची मग इंग्रजीच बोलायचं असा ऑफिसवाल्यांचा आग्रह! त्यामुळे खिसा फाटू द्यायचा नसेल तर मराठीचा अभिमान खिशात ठेवून इंग्रजीला वाणीत असू द्यावं लागलं. माणूस त्याच्या आजूबाजूच्या माणसांकडून भाषा शिकू लागतो. हे शिकणं म्हणजे भाषाओळख. पण त्या गोडीतून जेव्हा मराठीच्या प्रवाही साहित्याकडे वळू लागतो तेव्हा भाषेचा गाभा कळू लागतो. महाराष्ट्राला लाभलेली संतांची अनन्यसाधारण परंपरा आयुष्याची गुपितं सांगून जाते.
बालवयात मराठीशी बालमैत्रिनीसारखी गट्टी जमली. शालेय जीवनात पालकांच्या धाकातून आवांतर वाचनाने मराठीतल्या गोष्टी वाचू लागले. पण महाविद्यालयीन काळात कॉलेजच्या कट्ट्यावर कुसुमाग्रजांपासुन, शिवाजी सावंत, शांता शेळके, खांडेकर, नेमाडे, पाडगावकर आणि खास व.पु आणि दुर्गा भागवतही जमू लागल्या, तेव्हा हे सगळे आपलेसे वाटू लागले. तेव्हाच अनेक माध्यमांतून हळूहळू मराठीची गोडी, महती, हेटाळणी, उपरोधिकपणा नि अतिशयोक्तीचे स्थान कळू लागले. सुरुवातीला तारुण्याच्या जोशात “गर्वच नाहि तर माज आहे मराठी असल्याचा, नाद करायचा नाय, मराठ्यांना नडेल तो नरकात सडेल! अशा घोषणा ऐकून तर हसूही यायचं नि अभिमानही वाटायचा. ही जगावेगळी शब्दरचना वाचली की वाटायचे, ही कला आहे शब्दांची की भाषेच्या नागमोडी वळणाची?
ज्याची त्याची मायबोली ज्याचं त्याच पॉकेट आयडी असते. तिचा मान आणि भान जपणे गरजेचे! दक्षिण भारतातले लोक त्यांच्या संस्कृतीवर ठाम राहून भाषा, वास्तू, संस्कृती यांना प्रथम प्राधान्य देतात. महाराष्ट्र त्याबाबतीत खूप उदार आहे. पर्यटन आणि राज्याच्या विकासासाठी परप्रांतीयांचे स्वागत करावे पण तडजोड करत त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या भाषेला महत्त्व देणं आपल्यासाठी घातक ठरत चालले आहे. कारण आज कॉर्पोरेट जगात तर इंग्रजीच मिरवली जाते. याचं कारण म्हणजे तिथे येणाऱ्या अनेकांनी नोकरीचे ध्येय समोर ठेवून बालपणापासून मराठीला दुय्यम स्थान दिले आहे. याउलट सोशल मीडियावर ऐंशी, नव्वदीची पिढी मराठीतूनच पोस्ट, लेख, ब्लॉग्ज, व्लॉग्ज प्रदर्शित करत आहे. त्यांचं मराठी माध्यमातील शिक्षण त्यांना मराठीचा वारसा जपायला सांगते. पण त्यांची घुसमट म्हणत राहते,
संवादात उरली ती मराठी!
उदरनिर्वाहासाठी पुरली ती मराठी!
अन् आताच्या इंग्रजी काळात, नोकरीसाठी नडली ती मराठी!
पण ही पिढी संपुष्टात आल्यानंतर काय?
मराठीचा आवाका प्रत्येक भाषेइतकाच भव्य होता. पण ती भूतकाळात जमा व्हायला नको. ती रोज जगायला आणि जपायला हवी ! इथे शाल मराठीची पांघरूण, दिखाव्याची इंग्रजी बोलली जाते. पण सुख- दुःखाच्या भावनिक गुंत्यात मात्र माय मराठीच स्मरते! राज्यशासनाने दुकानांवर मराठी पाट्यांचा जाहीर केलेला निर्णय स्वागतार्ह आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्रात मराठी शाळांकडे प्रामुख्याने लक्ष देऊन तिथे ज्ञानी शिक्षक, उच्च सोयी सुविधांचा वापर वाढवायला हवा. कारण मराठी टिकवायची असेल तर नव्या येणाऱ्या पिढीला मराठी भाषेकडे आकर्षित करण्याची गरज आहे. आज कॉर्पोरेट जगतात वावरताना मराठीची ऊब जाणवते तेव्हा कवी कुसुमाग्रजांच्या कर्तृत्वस्मृतीला अभिवादन करून म्हणावे वाटते,
“बालभारतीतला मोरपीस आजही नाचतो मनी,
अजुनही आहे मुक्ताईची ओवी नि तुकारामांचा अभंग ध्यानी!
ज्यामुळे अवघा महाराष्ट्र जाहला मराठीमय,
त्या थोर कवीला माझे शब्दसाष्टांग अभिवादन !”
-पूजा ढेरिंगे