सौंदर्याचा बाजार !

“मी कुरूप असले तरी मी मनाने सुंदर आहे.”
किंवा मग “ती दिसायला सुंदर नाही पण, ती मनाने खूप सुंदर आहे…”
पहिलं तिचं वाक्य नि दुसरं तिला सिम्पथी देणाऱ्या तिच्या मित्राचं वाक्य …. नक्की खरं काय ? ती मनाने सुंदर आहे हे खरं?
चुकतायेत…. स्वतःच्या मनाला सिम्पथी देणं आणि दुसऱ्यांकडून सिम्पथी मिळवणं हे खरं… स्वतःच्या सौंदर्याला दुसऱ्याच्या दयेची आर्जवं लाऊन जगणं आणि स्वतःच्या असण्याला डावलणं खरं आहे. मजाक बना के रखा है।

पूर्वी काळया आणि गोऱ्या वर्णात मुलींचे वर्गीकरण व्हायचे, त्याचे आधुनिकीकरण होऊन विचारसरणी तीच ठेवत बाह्य सौंदर्य नि अंतर्मनातील सौंदर्य या दोन वर्गात मुलींचे वर्गीकरण होते. मग त्याचे उप-प्रकार, बाह्य सुंदरता असलेली मुलगी प्रेयसीच्या वर्गात, तर मनाने सुंदर पण समाजाच्या चौकटीत कुरूप असलेली मुलगी फ्रेंडझोनच्या वर्गात.

हळूहळू प्रेयसी न होण्याच्या अपयशामुळे मनाने सुंदर असणारी ‘ती’ कॉम्प्लेक्स घेऊन समाजाने घालून दिलेल्या ‘सौंदर्याच्या’ सो कॉल्ड चौकटीत स्वतःला बसवण्याचा निरर्थक प्रयत्न सुरु करते. त्यात मुलींना वेगळ्या पद्धतीने न्याहाळणं, तिच्यात हि गोष्ट आहे, माझ्यात नाही त्यासाठी प्रयत्न घेणं, बाहेरच्या केमिकलने भरलेल्या कॉस्मेटिकस लावणं, मग लॅकमे-मेबलीन-नीविया-केरोटीन फ्री शाम्पू या आणि अशा अनेक क्रिमचा सातत्याने भडिमार करून चेहऱ्याला अनुरूप नसलेली उत्पादने, लोकल/ ब्रँडेड म्हणत प्रत्येक ब्रँडची लाली, लिपस्टिक, पावडर, कॉम्पॅक्ट, कंसिलर वापरून तरीही गोरं किंवा आकर्षक न दिसल्यामुळे असलेल्या नैसर्गिक त्वचेवर पूर्वीपेक्षा अधिक पुरळ, खद्रे वाढवून घेऊन हळूहळू याचं रूपांतर स्पर्धा, ज्येलसी आणि स्वतःवरच्या प्रचंड रागात होणं. स्वतःला जन्मजात मिळालेल्या शिल्पाकृतीला खाचा पाडून पाडून, तिची नैसर्गिकता डावलून बाकीच्यांसारखं दिसण्याचा अट्टाहास करून समाजाच्या खोट्या, बनावट चौकटीत बसवणं जेव्हा सुरु होतं, तेव्हा बदल काही होत नसला तरी नकारात्मकता वाढत जाते. त्यामुळे आतून ती स्वतः मात्र कुठेच उरत नाही.
अशावेळी तिचं मन होऊन मला काही प्रश्न विचारावे वाटतात, तू कोणासाठी हे सगळं करतेयस ? तू शारीरिक प्रेम मिळवण्यासाठी हे करतेयस ? कि मग तुला मानसिक, भावनिक आधार हवाय म्हणून तू हे करतेयस.? आणि जर तुला भावनिक आधार हवाय तर भावनिक आधार मिळवण्यासाठीची सुरुवात तू स्वतःच्या शरीरावर मेहनत घेऊन करतेयस.?

तुझ्याकडे आहे ते सौंदर्याचं रोपटं तू लोक म्हणतात म्हणून नष्ट करून टाकतेस.? स्वतःच्या अस्तित्वाचा भाग असलेल्या या जन्मजात सौंदर्याचा क्षणभरही विचार न करता.? लोकं काय म्हणतील म्हणून स्वतःकडे असलेला समाजाच्या चौकटी बाहेरचा सुंदर खजिना तू स्वतःच्या हाताने विद्रूप करत नष्ट करत जाते. का.?

चल, जर प्रेमासाठी हे सगळं करतेय तर पुरुषाच्या मानसिकतेच्या काही शक्यता पडताळून पाहू… जगातला कोणता पुरूष स्त्रीच्या सुंदरतेवर भाळत नाही..? अपवाद असतातच पण ९० टक्के तरी असे आहेत.? उम्म्म्म ठीके ९० जास्त होतात … ८० टक्के …? मग राहिल्या २० टक्के पुरुषांमध्ये जर तू तुझं भावनिक प्रेम शोधत असशील तर तो तुला तुझ्या बघण्यावरून जवळ करेल खरंच ?… तुझं उत्तर तुझ्याकडे आहे… मग ही उठाठेव कोणासाठी.? आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यात तुला तुझं शरीर साथ देतय का? कदाचित नाही किंवा बहुतांशी हो. पण तुला हे सतत केमिकल, किंवा उत्पादनांच्या गराळ्यात राहणं आवडतेय का.? याची उत्तरे तुझी तू शोधावी… आणि नसेलच जर हे काही आवडत मग तरी तू तुझ्या निर्णयावर का ठाम असते ….बाहेरच्यांसाठी.? स्वतःला सुंदर ठेवणं, स्वतःची काळजी घेणं या गोष्टी गरजेच्या आहेत. कुणाला वाटत नाही आपण सुंदर दिसावं, आकर्षक दिसावं किंवा लोकांनी आपल्याला अटेंशन द्यावं, पण आपल्या शरीराला कितपत सहन होईल हे पारखणं आपल्याच हातात आहे नं .
यात मुुळात पुरुषांचा दोष नाहीचे, समाजाने सौंदर्याची व्याख्याच अशी बनवली आहे.

तू कुरूप आहेस, तू हे नको घालूस, तू बारीक आहेस, तू काळी आहेस, तू गोरी असूनही तुझी स्माईल अशी का ?, तू सर्जरी करून घे ना, तिचं चालणं किती विचित्रए, ईई तिचा चेहरा किती विद्रुप आहे किळस येते एकदम ……. हे आणि बरेचशे प्रकार मुली-मुलींच्या संभाषणातच आढळतात. का.? इथे कुठे आहे तुमचं महिला सशक्तीकरण .? याकरिता आधी विचारांचे आणि मनाचे सशक्तीकरण व्हायला हवे!

एकदुसरी बोलत असताना तिला दुजोरा देण्यापेक्षा सौंदर्याला आहे तसं स्वीकारत आपण अशावेळी उठून म्हणायला हवं, ती कुरूप आहे पण सुंदर आहे. ती बारीक आहे पण सुंदर आहे. ती काळी आहे पण सुंदर आहे. तिची स्माईल छान नाही पण, ती सुंदर आहे. ती जाड आहे पण, ती सुंदर आहे …
ती सुंदर आहे, कारण ती स्वतःची फेवरेट आहे. कारण ती जशी आहे तशी स्वतःला स्वीकारते आणि स्वतःवर प्रेम करते.
लोकांच्या परिभाषेनुसार स्वतःच नैसर्गिक सौंदर्य चव्हाट्यावर आणत नाही. कारण सुंदर तर कोणीही दिसू शकतं पण वेगळं नि उठून दिसणारे व्यक्तिमत्व फार थोडी असतात. कारण फिजिकल अट्रॅक्शन, इमोशनल अटॅचमेन्ट, बॉन्डिंग, शेअरिंग या गोष्टी व्यक्तीच्या मानसिकतेवर अवलंबून असतात.

मुळात या अशा व्याख्येपर्यंत तुला पोहोचावं लागतंय आणि तुला स्वतःच्या दिसण्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतंय, हि बाबच तुझा मूर्खपणा जाहीर करतेय …. का एखाद्याने यावं नि तुला सिम्पथी द्यावी ? कारण तू स्वतःसाठी स्टॅन्ड नाही घेऊ शकत म्हणून ?
म्हणून सांगते उठ make yourself as much strong, so that any boy i repeat any boy will willing to catch you.
Don’t workout on your outer beauty couse one day will come and it fades away by age but your mind, your thinking and your soul language will remains…..

त्यामुळे स्वतःला फिट कपड्यात बसवण्यापेक्षा, चेंजिंग रूममध्ये ट्राय करण्यापेक्षा आरशात ट्राय कर. सुंदर ड्रेस तर घाल पण त्याचबरोबर तुझी खूबसूरत प्राईजलेस मौल्यवान स्माईल घाल आणि तू पे करण्यापेक्षा लोकांना पे करायला भाग पाड. कारण जेव्हा तू स्वतःवर प्रेम करशील तेव्हाच तू एक धीट स्वतंत्र आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणून उठून दिसशील .
सौंदर्याची व्याख्या म्हणजे तुझा आत्मविश्वास आहे आणि त्यासाठी तुला एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. कारण तुझा स्वतःवरचा आत्मविश्वासच तुझ्या दिसण्याची व्याख्या चमकवतो.

क्योंकि दिखाऊ खुबसूरती अकसर बिक जाती है शराबियों के मैफिलों में।
चमकना हैैं तो खुद के भरोसे को हथियार बना,
लोग पूछेंगे भी नहीं सुंदरता क्या है ॥

Please follow and like us:
error

2 thoughts on “सौंदर्याचा बाजार !”

  1. गोवर्धन

    शेवट लय दर्जा… सुपर लिहिलंय तू झक्कास 🖤🖤🖤

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *