समाजातल्या लग्नाची गोष्ट!

लग्न हा मुला, मुलीच्या आयुष्यातला दुसरा जन्म असतो. ज्याप्रमाणे आयुष्याचे पंचवीस तीस वर्षे ते अविवाहित म्हणून जगताना शिकत असतात तसाच अनुभव लग्नानंतर येणार असतो… ज्याप्रमाणे आईच्या पोटातून जन्मल्यानंतर त्यांना एक कुटुंब मिळतं आणि त्या कुटुंबातून अनेक दिशा आणि आधार मिळत जातात. लग्नानंतर सुद्धा नवं कुटुंब, नवी नाती जुळत जातात. बदल एवढाच होतो की अचानक वयाच्या काही वर्षांनंतर नवे चेहरे आयुष्यात येतात. जे नकळत आपल्या आयुष्यात बदल घडवणार असतात.

काही मुलं, मुली तितके परिपक्व नसल्यामुळे बहुतांश वेळा कुटुंब हे त्यांच्या आयुष्यात प्रमुख भूमिका निभावतात. ज्याचे चांगले, वाईट परिणाम त्या जोडप्याला भोगावे लागतात. बऱ्याचदा समाजातल्या इतर मुलींना पाहून त्यांच्यासारखं आपल्या घरी येणाऱ्या मुलीने वागू नये या भीतीने बंधनांची लिस्ट थोपवली जाते. तसचं बऱ्याचदा समाजाने मुलाला ‘ बायकोच्या हाताखालचा बैल’ हा शब्द वापरू नये म्हणून स्वतःच्या बायको पासून चार हात दूर ठेवलं जातं. नाहीतर लग्नाआधी नोकरी, शिक्षण करणाऱ्या मुलीला धुणी, भांडी, स्वयंपाकात बळजबरीने ढकलले जाते. मुलाला त्याच्या बायकोशी निश्चिंत कम्युनिकेशनची मुभा दिली जात नाही. लग्नानंतर अस्तित्व विसरून जगावं लागेल असं मुलींनी जगू नये. तो काळ गेला असं म्हणत असलो तरी भारतात ९९% घरांत आजही मुलगी घरेलु दबावाखाली जगते आणि मुलांना कौटुंबिक आणि सामाजिक नजरेत पुरुषाची गादी अबाधित ठेवायची म्हणून भावनाशून्य आयुष्याचे धडे दिले जातात. त्या दोघांच्या जगण्यावर बंधनं लादू नये.

कुटुंब हे बहुतांश वेळा समाजाच्या दृष्टीने निर्णय घेतं. कारण त्यांची त्या जोडप्याबरोबर तेवढी इमोशनल बाँडींग नसते. नवरा बायको मात्र एकमेकांसोबत नाही म्हटलं तरी स्पर्शाने अजाणतेपणी बोललेले असतात, फील केलेलं असतं आणि हो, स्पर्श खूप जास्त बोलतो. त्यामुळे त्यांना जे एकदुसऱ्यासाठी वाटतं ते खूप आत्मीयतेने आलेलं असतं. कुटुंबाने एकतर येणाऱ्या सुनेला समाजाने आखून दिलेल्या नियमावलीत अपेक्षित केलेलं असतं आणि मुलाला बायको आल्यानंतर सुद्धा बायकोला दुय्यम वागणूक देणारा आणि आईचं ऐकणारा या अपेक्षेने पाहिलेलं असतं. कुटुंबाचा हा अपेक्षांचा खेळ संपायला हवा. त्या दोघांच्या आयुष्यात लग्नामुळे होणाऱ्या मोठ्ठ्या बदलाचा त्यांनी विचार करायला हवा. कोवळी पोरं उपरत्या वयातून निघून लग्नासारखा मोठा निर्णय घेतात तेव्हा त्या दोघांची वेगवेगळी स्वप्न असतात. त्यांना समजून घ्यायला हवे. बदलणाऱ्या पिढीनुसार बदलून त्या दोघांना सपोर्ट करायला हवा. जर तसं करत असाल तर स्वतःचा अभिमान वाटून घ्या आणि एक खरी शाबासकी द्या! कारण समाज हा पाहून पाहून शिकत असतो, घडत असतो आणि तो बदल घडवण्याचं पुण्य तुम्ही केलेलं असतं!

इवन नवरा बायकोने सुद्धा एकमेकांशी वागताना स्वतःची मालमत्ता असल्यासारखं वागायला नको. ज्यातून चुकीचा आदर्श मांडला जाईल… दोघांनी एकमेकांच्या जन्माचा आदर करायला हवा. ती स्त्री आहे की तो पुरुष याची पर्वा न करता समान आदर एकमेकांना द्यायला हवा. जसं लग्नापूर्वी एकमेकांची सकारात्मक वाढ होत असते, त्यात भर पडून ते आयुष्य एका व्यक्तीसोबत अजून एक व्यक्ती जोडल्याने बहरायला हवे. त्यासाठी एकमेकांची individuality (व्यक्तिमत्व) जपायला हवी, त्यांनी दोघांनीही आणि त्यांच्या कुटुंबियांनाही!

उद्या जाऊन मनात ही पडझड नको व्हायला की “मी लग्नाआधी किती गोष्टी करत होते/ होतो. माझी वाढच खुंटली. माझं करिअर पूर्ण झालं नाही. मला हे शिकायचं होतं राहून गेलं. मला व्यवसाय करायचा होता राहून गेला. ” हे सगळं जर अपूर्ण राहत असेल तर ते हेल्दी मॅरेज म्हणजेच निरोगी लग्न नाहीये. लग्नाने आयुष्याला कसला आजार नको जडायला. उलट जगण्याचं बळ यायला हवं! याचं शिक्षण खरतर सुरू करायला हवं.
कारण हे दोन्ही जन्म आयुष्याचा मार्ग ठरवत असतात. एक आयुष्याला मध्यावर आणून ठेवत असतं तर दुसरा जन्म त्याला गती देण्याचे काम करत असतं. नक्कीच विवाहित आयुष्य हे आव्हानात्मक ठरतं कारण तिथे आपण घडणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी प्रथम कारणीभूत असतो. इतके दिवस आपल्या आयुष्याचा ब्लेम कुणावर तरी टाकत असतो नाहीतर कुणीतरी घेत असतो. मात्र लग्नाच्या टप्प्यानंतर आपण खऱ्या अर्थाने आयुष्याशी फ्रंट फुटवर येऊन भिडू लागतो. त्यामुळे एकमेकांना या जगण्यासाठी ताकद देऊन घडत असलेल्या गोष्टीत अजून भर घालून आयुष्याला नवी दिशा मिळायला हवी. एका जन्मात वाट्याला येणाऱ्या या दोन्ही जन्माच सार्थक व्हायला हवं.

-पूजा ढेरिंगे

Please follow and like us:
error

2 thoughts on “समाजातल्या लग्नाची गोष्ट!”

  1. पूजा दिदी खुप विचार करण्यासारखी गोष्ट लिहीली आहेस…नक्कीच असा बदल घडून येईल…💭💫

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *