प्रेमाची आग मनाला लावून घेत दिवा विझला होता काळजात. जेव्हा कॉलेजच्या रोमँटिक दिवसात ती काहीच न बोलता निघून गेली होती. त्याला ब्रेकअप म्हणायचं नव्हतं. आयुष्यात कधीच म्हणणार नव्हतो. कारण तिथे फक्त माणूस निघून जातो, आठवणींशी मात्र कधीच ब्रेकअप होत नाही. त्यांना स्वाभिमान नसतो. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाचा तो काळ, त्यामुळे मित्रांच्या मौज मस्तीत ‘गेली तर गेली उडत’ म्हणून सिगारेट हातात घेतली, खूप फिरायला शिकला, कितीतरी दर्दी गाणी ऐकली, रडरड रडला, स्वतःला दोष दिले, दुसऱ्या मुलींमध्ये मन रमवून पाहिलं, अरिजित सिंग जवळचा केला, नको ते अनेक उद्योग केले, तिचं निघून जाणं काळजाला लागून घेतलं, दुःखाचा डोंगर कोसळला एवढा त्रास करून घेतला. पण हळूहळू महिना सहा महिन्याने मनाला ती नसण्याची सवय झाली. पण आठवणी थांबल्या नाही. रोजच्या उशाला असायच्या. पण त्रासाची तीव्रता कमी झाली. तो माणसात आलो. सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न करू लागलो. लोकांचे सल्ले घेऊ लागलो. आपल्या लव्ह स्टोरीला लागलेला घोडा पाहून पुन्हा कुठल्याच लव्ह स्टोरीवर विश्वास ठेवला नाही. प्रेम म्हटलं की तिथून रस्ता बदलायचा, ठरलेलं.
पण एक दिवस तिने येऊन पुन्हा जुन्या जखमा उघड्या केल्या… थंडीच्या त्या कडकडीत दिवसात पुन्हा कठोर हृदयाला स्पर्श केला, तिच्या येण्याने. कालपर्यंत हेच हवं असणारा तो आता पुन्हा शून्यात गुंतला. कारण आता तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला नव्हता. त्याच्या अंगावर घराचा भार आला होता. घराला त्याच्याकडून अपेक्षा होत्या. कॉलेजातला मुलगा तो आता पुरुषाच्या भूमिकेत प्रवेश करत होता. आता अरिजीत ऐकून त्याची दमछाक होतेय. उनाड कॉलेजच्या कपलला पाहून त्याची झालेली भावनिक अवस्था आठवतेय. नकळत पुन्हा तीच आठवतेय. मग एखाद्या अचानक पडलेल्या भयाण स्वप्नासारखी मनात लागलेली आग कोणी बघत नसल्यासारखं विझविण्याचा प्रयत्न तो कायम ठेवतोय. पण ती पुन्हा आलीय.तो गोंधळून गेला आहे. मनात एकच विचार चालू राहिला, “एकदा निघून गेलेली व्यक्ती पुन्हा कधीही निघून जाऊच शकते. तिला जाण्याचा मार्ग आणि निघून गेल्यावर वाटणाऱ्या भावनेशी ओळख झालेली आहे. पण मागे राहिलेल्याचं झुरणं कधीच थांबणार नसतं, मग ती व्यक्ती कितीही वेळा निघून जावो! “
त्याने धाडसाने नाकारलं. त्याचं तिच्याकडे ओढल जाणं… त्याने पुन्हा तिला आयुष्यात घ्यायला नकार दिला. तिच्या नावाची शेवटची सिगारेट विझवत त्याने शेवटी तिला सांगत सांगत स्वतःलाही सांगितलं, कर्ज उधार पड़े हैं जिम्मेदारियों के मुझ पर, इश्क करने की फुरसत नहीं अब। परेशानियां हंस रही हैं मुझ पर, मैं फिर अगर तुम पर मर जाऊंगा तो, फिर तुम्हारे छोड़ जाने की नई परेशानी मेरी परेशानियां बढ़ा देगी। मुझ पर एक मेहरबानी करना, इश्क अधूरा छोड़ कर मुझे आजाद कर देना। -पूजा ढेरिगे