मृगजळ प्रेमाचं!

  • by

मृगजळ कसं दिसत असेल? हा प्रश्न कधी पडला तर त्याला प्रेम नावाची मधमाशी दाखवून द्यायची…
हो, प्रेम मृगजळच वाटतं मला. 
ज्याला मृगजळची ओढ असते, तो प्रेमात पडतो… आणि मृगजळ हातात पकडण्याचा अक्षम्य प्रयत्न करतो. मृगजळ म्हणजे फार काही नाही जे असल्याचा भास होत असतो, पण ते प्रत्यक्षात नसतं.
पण याचा अर्थ प्रेम नसतं असा आहे का?
तुम्हाला अस झालंय का माहित नाही. पण प्रेमात पडायच्या आधी तुम्ही प्रेमाची स्वप्न पाहत असतात. माझा जोडीदार म्हणून त्याची रफ स्केचिंग मनात करत असतात. पण जेव्हा तो समोर येतो, तेव्हा तुम्ही सगळ्या कल्पना खोडून मनात नवा कागद रंगवायला घेतात. त्यात खरा माणूस जसाच्या तसा रेखाटून त्याच्या विशिष्ट सवयींना अधिक मोहकपणे पाहू लागतात. किंबहुना तुमच्या नकळत तुम्ही या मोहात अडकतात, हा मोह जरी प्रेम असला तरीही, मृगजळाची पहिली सुरुवात होते जेव्हा जोडीदाराच्या चुकीलाही तुम्ही हाऊ क्यूट म्हणून पाहू लागतात.

मग एकदा का प्रेमाच्या मृगजळावर विश्वास बसू लागला की तुम्ही आयुष्यभर स्वतःला प्रेमात असल्याचा भास करून देत राहतात. काहींची मृगजळ वर्षात जळून जातात.. विश्वासाचा भाग असतो की अंधश्रध्देचा? तरीही तुम्ही आयुष्यभर स्वतःला या आशेवर कायम ठेवतात की, आपण केलेलं प्रेम खूप लायक आणि जगापेक्षा वेगळं आहे. ते खरंच असतं का?
तुम्ही तुमच्या लायक व्यक्ती शोधून तिचं आपल्यावर प्रेम आहे हे स्वतःला सांगणं, किंवा त्या व्यक्तीच्या सवयींमध्ये प्रेम शोधणं हे मृगजळ नाही तर दुसरं काय आहे?

लैला मजनूचे बरच झालं, प्रेम अस अर्धवट राहिलं की त्याला अमरत्वाची उद्गारवाचके लागत जातात. मृगजळ फुटून डिव्होर्स नाहीतर ब्रेकप होतात. माणूस या बडबुड्यात खुश होत राहतो, नि एक तीन वर्षाच्या ऋतु चक्राने पुन्हा सगळे ऋतु सारखे नि नेहमीचे वाटू लागतात. मृगजळाचे आकर्षण कधीच मागे पडते नि हातात येतो स्वतःच्या आयुष्यात आलेला नवा व्यक्ती.
तुम्हाला झेपणार का तो व्यक्ती?
या प्रश्नाचे उत्तर मृगजळ फुटल्यानंतर मिळते. घाई करून मृगजळ आपलं करायला गेला की तुमच्या हातात येते नात्यांची राख…
वेळ एवढीच एक गोष्ट आहे, जी तुम्हाला समोरचा माणूस कसा आहे ते सांगते. वेळेनुसार व्यक्तीचा मुखवटा गळू लागतो.
प्रेमाला पहिल्या भेटीत मिठीत घेऊन आयुष्यभर टिकण्याची अपेक्षा मला पोकळ वाटते.
कारण आयुष्यभर सोबत राहणं म्हणजे त्या व्यक्तीवर दिवसरात्र प्रेम करत राहणं नसतं. प्रेमाबरोबर चालून जबाबदाऱ्या येतात, ज्यामध्ये एकमेकांसोबत राहताना न पटणाऱ्या सवयी, खाण्या पिण्याच्या चवी, मुव्ही, संगीत ऐकताना असणारे वेगवेगळे चॉईसेस, एकमेकांच्या हॉबिमध्ये रमणे, कामाची वेळ, सवयी, मेकअपमध्ये रमणे, मॅचेस बघणं, फुडी असणं, शोपिंगची ओढ असणं, पुस्तक वाचताना एकटं राहणं आवडणं,  किशोर कुमार तिच्या आवडीचे, त्याला अदनान सामीचे जुने गाणे आवडणं… त्याला आवरलेल घर आवडणं, तिला पसारा असलेल्या घराला घरपण असल्याची भावना असेल, एखाद वेळी त्याला प्रेम करावं वाटणं, तिला सेक्सची ईच्छा असणं,

प्रेम खोटं नसतं, जर तुम्ही मृगजळाचा भाग होत नसाल तर… कारण पहिल्या काही दिवसांत प्रेमाच्या सौंदर्यापलिकडे जगच दिसत नसतं… ही मोहिनी उतरू दिली नि मृगजळाच खरेपण समोर आलं की मग आयुष्यभरासाठी ही प्रेमाची साथ टिकेल का कळतं.
तुमचं मृगजळ तुम्हाला आयुष्यभराची साथ देते की भग्न स्वप्नाचा अनुभव, तुमच्या हातात असतं…
प्रेमात आंधळ होणं स्वाभाविक आहे, उतावीळ होऊन पहिल्या भेटीत आयडीयल जोडीदाराची साथ शोधणं म्हणजे, पौर्णिमेच्या रात्री दिसणाऱ्या चंद्राला मागणी घातल्यासारख असतं. तो चंद्र त्याच्या सवयी आणि त्याचा स्थायी भाव सोडत नाही, त्यामुळे प्रेम म्हणजे केवळ चंद्राचं पौर्णिमेच्या रात्री रसभरा नि मोहक दिसणं असं कधीच नसतं. त्याचं वर्षभरात कमी जास्त होणं, कुरूप नि सुंदर दिसणं, त्याचं काम करत राहणं हे लक्षात घ्यायला हवं. त्याचा खरा स्वभाव जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत प्रेमावरच आवरण निघून जाऊन प्रेमाबरोबर आयुष्य व्यतीत करण्याची क्षमता कळणार नाही…
चंद्र मृगजळ असू शकतो, आपल्याला इथून दिसतोय तो तितका मोहक असेलही, किंवा नसेलही. प्रेमाचं तसचं असतं, ते काही कालावधीसाठी असेल नाहीतर आयुष्यभरासाठी. खरं प्रेम बघायला आंधळं बनून चालत नाही.
हर रिश्ते का अपना नसीब होता है,
कुछ इश्क अधूरे सही पूरे होते हैं,
कुछ पूरे होकर अर्धांगिनी बन जाते हैं।

©Pooja Dheringe

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *