तो; तुझ्या बांधलेल्या केसांपेक्षा तुझ्या जड डोळ्याचं अर्धवट उघडणे मला अनुत्तरित करतं.
ती; याचा अर्थ काय? मला अर्थ नाही लागत.
तो; तू मला कधीतरी स्वयंपाक करत असताना आठवून पाहिलंय? या जगात स्वयंपाक घरापेक्षा पवित्र जागा नसते. ज्यासाठी मनुष्य धडपडत असतो, त्या भुकेला शमवणारे ठिकाण खरेच किती निर्मोही आहे, निस्वार्थ आहे.
मी स्वयंपाक बनवताना तुझी आठवण काढतो, मग आठवणीतून हळूहळू तुला सत्यात घेऊन येतो, तुला काही त्रास आहे का विचारतो. पण तू तरीही अशी अर्धवट डोळे जड पडल्यावर कस वाटतं तशी भासते मला.
मी जेव्हाही तुझा विचार करतो, तेव्हा मला तू झाडांच्या पारंब्यांच्या कोपऱ्यात दबून गेलेला पक्षी वाटते.
तुझे पंख कुठे आहेत?
ती; कोणीतरी घेऊन गेलंय. तो येण्याची वाट बघतेय.
तो; खूप खास होता का? म्हणजे जसं मी स्वयंपाक घरात असल्यावर कल्पना करतो की, तू माझी आठवत काढत असेल, आठवताना लाजत असेल, हळूहळू का होईना तू माझ्या विचारात रमून जाऊन सुखावत असेल. कदाचित तू आतापर्यंतच्या आयुष्यात कुणाशी दोन शब्दाहून जास्त बोलली नसेल, त्यामुळे तोंडाने बोलण्यापेक्षा, तू साडीचा पदर कमरेला खोचून वही पेन हातात घेऊन ओट्यावर सगळ्या मसाल्यांच्या गर्दीत मला एक पत्र लिहायला घेशील. तुझ्या अर्धवट मिटलेल्या जड डोळ्याचं गुपित नाही का सांगेना पण आपल्या दोघांबद्दल लिहशील.
पण… बोलता बोलता तिचे शब्द आठवून त्याने जड आवाजाने विचारलं,
तो खरंच इतका खास होता का?
ती; त्याचं आयुष्य माझं समजून जगत होते, इतका.
हे डोळे अर्धवट जड आहे, कारण या पाखराला ज्याने प्रेम नावाचं स्वप्न दाखवलं होतं, तो त्या गोडगोजिर्या स्वप्नाच्या आशेवर ठेऊन गेला आहे. मला आशा आहे, या दबलेल्या पंखांचा आणि माझ्या या जड डोळ्यांचा त्याला पत्ता मिळेल. तू देशील? त्या बदल्यात मी तुला पत्र लिहिल. तू जसं पत्र म्हणतो तसचं सेम!
आज तिने दुःखाने नाही तर आशेने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या डोळ्यांत पाहण्याचा मूर्खपणा पुन्हा करणार नव्हता. पण त्याच्या आसवांनी घाई केली आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याचं डोळ्यातलं पाणी तिच्या डोळ्यांच्या आशेवर तरंगल. त्याने स्वतःला सावरत विचारलं.
हो देईल ना पत्ता, पण तू पत्रात काय लिहशिल, ते सांग?
ती;
तुझं नाव, कंसात लिहेल, (डोळ्यांमध्ये जीव ओतणारा)
मग माझं नाव, (जड डोळ्यांची एक मुलगी)
मग तुझं माझ्या आयुष्यात येणं,
त्याची उत्सुकता वाढू लागली. प्रेमाचा एक ऋतु तिच्या पत्रातून आपल्यासाठी यावा, या ओढीने तो ऐकु लागला.
ती बोलू लागली,
तुझ्या येण्याने माझं कोणीतरी आहे, याची जाणीव होणं, माझा दबलेला आत्मविश्वास पुन्हा जागा होऊन माझ्या स्वप्नाकडे झेप घेणं…
तुझं स्वप्न, तुझं स्वप्न आणि तुझंच स्वप्न. माझं स्वप्न तर तुझ्या स्वप्नाने एका झटक्यात पूर्ण राख करून टाकले, तो मनातल्या मनात बोलत राहिला.
मनात बोलल्यामुळे त्याने तिचं मधलं बोलणं मिस केलं…
आणि…
शेवटी लिहेल,
तुझीच सखी.
तो ‘सखी’ शब्दाने शांत झाला.
तिने प्रश्न केला, माझं स्वप्न माझा प्रियकर आहे. तसं तुझं स्वप्न कोण आहे?
तिच्या डोळ्यात एकेकाळी तिला दिलेला आत्मविश्वास स्वतःमध्ये आणून तो म्हणाला,
“माझं स्वप्न मैत्री या नात्यात बांधलं गेलं आहे. अशा मैत्रीवर हक्क नसण्याच दुःख राहील.”
मैत्रीत हक्क असतो उलट, ती चटकन म्हणाली.
तो; नसतो. मित्र तिच्या आयुष्यात दुसरा परपुरूष असतो. पहिला पुरुष हा प्रियकर असतो. म्हणून हक्काचा प्रियकर बनण्याचे स्वप्न बंधिस्त झालंय मैत्रीत.
©Pooja Dheringe