स्पर्धेतून बाहेर पडू, एकटे पडू ही भीती आयुष्यभर कवटाळून जगू लागतो माणूस.
म्हणून गुलामीची लक्तरे स्वीकारू लागतो माणूस,
त्याला बऱ्याचदा माणूसपणाचं ओझं होतं.
पण माणूस बनण्याचं लालच आपल्याला तसूभर पाठ टाकू देत नाही.
आपण वाहवत जातो, करपत जातो, जळत जातो, नष्ट होत जातो…
कर्ज काढतो,
हफ्ते भरतो,
अपेक्षांची ओझी वाहत तडजोडीच्या दबावाखाली भरडले जातो.
मरतो ना बाबा रोज रोज…
पैसा कमावतो, हक्काच्या माणसाची सुद्धा रोजच मन धरणी करत बसतो…
तत्वे स्वतःपेक्षा मोठी करतो, नि जाळतो रोज स्वतःच्या अंशाला…
दुसऱ्यांच्या नजरा जपत, खपत जातो आयुष्यभर !
दुसरा येतो, सहज आपल्या तत्वांचा गैरफायदा घेऊन टपली मारून जातो.
शेज लावतो आपल्यालाच!
आपल्याला तरी अंदाज येत नाही, खरचं आंधळे होऊन जातो आपण विश्वासाला !
मग आंधळ्या डोळ्यांसमोर एक दिवस बाजार उठतो आपल्या भावनांचा…
शेवटी विकत घ्यायला आपण स्वतः सुद्धा उरत नाही.
हीच व्यथा दारोदार सांगत फिरतो नि पुन्हा निघतात त्याचेही धिंडवडे!
भावनांचा भुकेला म्हणत हिनवू लागतात सगळेच!
इतकं का व्हावं आपण परावलंबी ? फक्त भावनेसाठी!
घात करावा स्वतःचाच ‘आपल्या’ म्हटलेल्या माणसामुळे?
तो माणूस मिठीत येतो, नि जीव घेऊन निघून जातो. आपलं संपणं तिथेच!
माणसानेच दुसऱ्या माणसाच्या मनाला मारलेल्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल होत नाहीत…
डोळस विश्वास ठेवणं जमत नाही आपल्याला…
नात्यात वाहिलेला माणूस बहरून येतो…
पण चुकीची माणसं भेटली की मग मात्र वाहणाऱ्या पाण्यात दगडाला ठेच लागून मृत्यू होतो …
या घटना थांबाव्यात…
- पूजा ढेरिंगे