कलाकार म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. माणूस म्हणून मला तो रुचत नाही. आमच्यात मतभेद आहेत म्हणून नाही. पण एकंदर माणूस म्हणून माझं त्याच्याशी पटत नाही. पण त्याच्यावर कलेचा वरदहस्त आहे. तो एक महत्त्वाचा कलाकार आहे.
त्याला माणूस म्हणून टाळले तर मला दुःख होणार नाही. गिल्ट येणार नाही. पण त्याची कला मी टाळू शकत नाही. आज मला कळत होतं माणूस आणि त्याच्यातला कलाकार हे दोन्ही वेगवेगळे व्यक्ती असतात. त्याची कला समंजस आहे. पण माणूस असलेलं त्याचं मन आणि शरीर दुसऱ्या कुणाला आधार देत नाही. त्याच्यात माणुसकीची जाण नाहीये.
त्याची कला मात्र निस्वार्थ आहे. तो स्वार्थासाठी कलेची निर्मिती करतो, पण कलेत तो गुण नाही. ती आधार बनते तिला अनुभवणाऱ्यांचा.
कला निर्जीव असते. पण जिवंत होऊन आधार देते. तो सजीव आहे. पण तो माणूस म्हणून कृतीतून कुणालाच आधार देत नाही. मान्य, त्याची कला त्याचीच निर्मिती पण तो जर भुकलेलेल्या भाकरी आणि रडणाऱ्याला खांदा देऊ शकत नसेल तर हा त्याच्यातल्या माणसाचा दोष. कला आजही तिचं अस्तित्व टिकवून आहे. त्यामुळे माणूस आणि त्याच्यातला कलाकार हे दोन्ही वेगवेगळे व्यक्ती वाटतात.
- पूजा ढेरिंगे
सध्याच्या परिस्थितीत लागू होते….नथुराम गोडसे…त्यांची भूमिका साकारणारे नट…यातील वादावर प्रकाश टाकणारे आहे….